बीडमध्ये कोरोनास्थिती गंभीर, एकाच चितेवर आठ जणांवर अंत्यसंस्कार
बीडमधील कोरोना स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अंबाजोगाई शहरात काल आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आणि नगरपालिकेने एकाच सरणावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
बीड : मागच्या दोन ते तीन आठवड्यापासून बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्ण संख्या जशी वाढते तसे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सुद्धा वाढताना पाहायला मिळत आहे. अंबाजोगाईमध्ये एकाच दिवशी आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आणि नगरपालिकेच्या वतीने एकाच सरणावर आठ रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालय आणि लोखंडी सावरगावच्या कोविड सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या पॉझिटिव्हचा रुग्णांचा आकडा दररोज शंभरच्या पुढे वाढत असताना मृत्यूचा दर देखील झपाट्याने वाढत आहे. स्वाराती रुग्णालयात सात आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमधील एक अशा एकूण आठ कोविड मृतांवर नगरपालिका प्रशासनाने मांडवा रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर अग्निडाग दिला.
यापूर्वी मागील वर्षी 6 सप्टेंबर रोजी अंबाजोगाईत याच ठिकाणी आठ मृतांवर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. बरोबर सात महिन्यानंतर पुन्हा तीच दुर्दैवी वेळ आली आहे.
अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये परळी, केज, धारुर, गंगाखेड, माजलगाव आदी तालुक्यातील रुग्ण कोरोनावरील उपचारासाठी येतात. कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण हे उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसनाचे विकार असे 60 ते 80 वयोगटातील असतात. हे सर्व रुग्ण अंगावर आजार काढून जास्त झाल्यानंतरच रुग्णालय गाठतात, त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढू लागली आहे.
बीड जिल्ह्यात मंगळवारी (6 एप्रिल) 716 जण कोरोना पॉझिटिव्ह
बीड जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांचे लॉकडाऊन करुनही कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. उलट रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मंगळवारी 716 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये बीड 131 आणि अंबाजोगाईत 161 रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले होते. मात्र त्यानंतरही कोरोनाची साखळी तुटली नाही. रुग्णांची संख्या वाढत असल्याने रात्री पुन्हा जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध लावले. कोरोना तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून काल 716 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये 1521 निगेटिव्ह तर एकूण 2 हजार 37 रुग्णांचे स्वॅब तपासण्यात आले होते. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 161, आष्टी 98, बीड 131, धारुर 29, गेवराई 43, केज 64, माजलगाव 34, परळी 88, पाटोदा 31, शिरुर 31 आणि वडवणीमध्ये 6 रुग्ण आढळून आले आहेत.
पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढल्याचे पाहायला मिळाले. बीड जिल्ह्यामध्ये दोन शहरात सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्याचे पुढे येत आहे, त्यात बीड शहर आणि अंबाजोगाई शहराचा समावेश आहे. अंबाजोगाई तालुक्यात चार दिवसामध्ये पाचशेच्या जवळपास रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.