धक्कादायक! समृद्धी महामार्गावर आता चोरांची दहशत; वाहनांवर तुफान दगडफेक, महिला जखमी
Samruddhi Mahamarg News: आता समृद्धी महामार्गावरून रात्रीचा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Samruddhi Mahamarg News: मोठा गाजावाजा करत सुरु करण्यात आलेला समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आधीच अपघातांच्या मालिकांमुळे चर्चेत आलेल्या समृद्धी महामार्गावर आता चोरांची दहशत पाहायला मिळत आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर सोमवारी रात्री वाहनांवर तुफान दगडफेक (Stone Throwing) करण्यात आली आहे. या दगडफेकीत एक महिला जखमी झाली आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरून रात्रीचा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जांबरगावजवळील समृद्धी महामार्गावरील धावत्या प्रवासी वाहनावर अज्ञात व्यक्तींनी तुफान दगडफेक केली आहे. सोमवारी रात्री 9.40 वाजता ही घटना घडली आहे. या दगडफेकीत वाहनातील (एमएच 33 वाय 9916) एक महिला प्रवासी गंभीररित्या जखमी झाली आहे. त्यांच्यावर वैजापूरहून आलेल्या रुग्णवाहिकेतील वैद्यकीय पथकाने उपचार केले असून, पुढील उपचारासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर गाठले.
धावत्या कारवर अचानक दगडफेक
याबाबत अधिक माहिती अशी की, चार चाकी वाहनातून (एमएच 33 वाय 9916) रितू राठी (वय 40 वर्षे, रा. नागपूर) शिर्डीहून नागपूरकडे प्रवास करत होत्या. दरम्यान त्यांची कार छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारातील समृद्धी महामार्गावर येताच धावत्या कारवर अचानक दगडफेक सुरु झाली. ज्यात रितू राठी जखमी झाल्या. दरम्यान त्यांच्या वाहनाच्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विशाल शेळके यांच्या वाहनावर देखील दगडफेक झाली. त्यामुळे त्यांनी वाहन थांबवून जखमी महिलेला मदत केली. तसेच याची तात्काळ स्थानिक पोलीसांना दूरध्वनीवरुन माहिती दिली. पण पोलिसांना येण्यासाठी उशीर होत असल्याने जखमी झालेल्या महिलेसह त्यांच्या नातेवाईकांनी छत्रपती संभाजीनगर शहर गाठून, पुढील उपचार केले.
समृद्धी महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे ज्या जांबरगाव शिवारात हा सर्व प्रकार घडला आहे, त्याच जांबरगाव येथील पथकर नाक्याजवळ समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली होती. पण आता त्याच ठिकाणी चालत्या वाहनावर तुफान दगडफेक करुन प्रवाशांना जखमी केल्याचा प्रकार घडल्यामुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर आता समृद्धी महामार्गावरुन रात्रीचा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Acid Attack : छत्रपती संभाजीनगरातील दोघांवर अॅसिड हल्ला; सुरक्षारक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या