Marathwada Weather: मराठवाड्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; गारपिटीचा जोर अधिक असण्याचा अंदाज
Marathwada Weather: मराठवाड्यात (Marathwada) आज पुन्हा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Marathwada Weather: राज्यात ऐन उन्हाळ्यात अनेक भागांत गेल्या दीड महिन्यापासून अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) वातावरण पाहायला मिळत आहे. तर राज्यातील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसासह गारपीट झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. अशात मराठवाड्यात (Marathwada) आज पुन्हा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 27 एप्रिलपर्यंत मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे गारपिटीचा जोर अधिक असण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्यात 25 आणि 26 एप्रिल रोजी पुन्हा अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा जोर अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या दीड महिन्यापासून ऐन उन्हाळ्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय. तर मराठवाड्यात देखील अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात आज देखील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे 27 एप्रिलपर्यंत मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे. मात्र वातावरणात सतत होणाऱ्या बदलामुळे अंदाज देखील बदलत असतात.
पावसाचा अंदाज...
- तर 25 एप्रिल रोजी लातूर, परभणी, बीड व धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना होईल.
- तर 26 एप्रिल रोजी लातूर, धाराशिव, बीड, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना होईल.
- तर 27 एप्रिल रोजी लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना होईल.
'या' भागात गारपिटीची शक्यता
- तसेच 26 एप्रिल रोजी लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.
- तर 27 एप्रिल रोजी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.
यामुळे उन्हाळ्यातही अवकाळी...
पूर्वमोसमी (मार्च ते मे) हंगामात वारा खंडिततेचा नॉर्मल पॅटर्न यावेळी नाही. तर हा पॅटर्न पूर्व किनारपट्टी समांतर भूभागावर झारखंड ते दक्षिण चेन्नईपर्यंत समुद्रसपाटीपासून एक ते दीड किमी उंचीवर असतो. मात्र यंदा तो उत्तर महाराष्ट्र ते दक्षिण चेन्नईपर्यंत दोलायमानात फिरत राहिल्याने, द्वीपकल्पात 15 ते 20 अंश अक्षवृत्तादरम्यान हवेच्या उच्च दाबाचे क्षेत्र दोन समुद्रांच्या बाजूला टिकून राहिला आहे. त्यामुळे जमिनीवर वारा खंडितता आणि हवेचा निर्वात दाबाच्या आसनिर्मितीमुळे गेल्या दीड महिन्यापासून अवकाळी पावसाचे वातावरण असल्याचे, हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: