समीर वानखेडेंच्या समर्थनात, भाजपा मैदानात!
Sameer Wankhede : समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे आता समीर वानखेडे यांच्या निमित्ताने भाजप विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना रंगेल.
मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात कारवाईनंतर वादात सापडलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर विविध आरोप होत आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी तर त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आता समीर वानखेडे यांच्या समर्थनात भाजपा मैदानात उतरणार आहे. भाजप उद्या मुंबईत निदर्शनं करणार आहे. भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नरेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निदर्शनं होणार आहेत.
समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे आता समीर वानखेडे यांच्या निमित्ताने भाजप विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना रंगेल.
समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी घेतली किरीट सोमय्या यांची भेट
आज भाजप नेते किरीट सोमय्यांची भेट समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर, ज्ञानदेव वानखेडे, यास्मिन वानखेडे यांनी घेतली. वांद्रे येथे ही भेट झाल्याची माहिती आहे. या भेटीसंदर्भात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटही केलं आहे. 'नवाब मलिक जे आरोप करत आहेत त्यामुळे आम्ही व्यथित झालो आहोत. नवाब मलिक यांनी केलेल्या ट्विट्सचा, या कुटुंबीयांच्या बदनामीचा मी तीव्र निषेध करतो' असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.
क्रूझ ड्रग्ज पार्टी आणि एकंदरीत समीर वानखेडे यांच्यावर जे एकापाठोपाठ आरोप होत आहेत त्या आरोपांचा तपास एनसीबीचे वरीष्ठ अधिकारी करत असताना या समांतर चौकशीची गरजच काय? असा सवाल उपस्थित करत याप्रकरणी आलेल्या तक्रारींचा तपास सीबीआय अथवा अन्य केंद्रीय तपासयंत्रणेकडे सुपूर्द करण्याची मागणीही वानखेडेंकडने हायकोर्टात करण्यात आली. तसेच राज्य सरकारमधील एक मंत्री आपले वैयक्तिक हेवेदावे चुकते करण्यासाठी आपल्याला जाणूनबूजून लक्ष्य करत असल्याचा आरोपही वानखेडेंनी या याचिकेतून केला.
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी यांनी बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांच्या या आरोपांनंतर समीर वानखेडे यांनी त्यांचे वडील आणि त्यांचे कास्ट सर्टिफिकेट जारी केले आहे. कास्ट सर्टिफिकेटमध्ये समीरचे वडील मेहर जातीतील आहेत. जे SC मध्ये येते. समीर वानखेडे यांनी कास्ट सर्टिफिकेट, वंशावळ, जन्म दाखला, कोतवाली रजिस्टर प्रत, कौटुंबिक फोटो शेअर केले असून त्यांनी कोणत्याही कागदपत्रात छेडछाड केली नसल्याचे सांगितले आहे.