(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: मराठवाड्यात पावसाची हजेरी; कृषी विभागाने केलं 'हे' आवाहन
औरंगाबाद-जालना आणि बीड जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी पावसाने हजेरी लावली आहे.
Aurangabad News: राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष पावसाकडे लागले असून, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी पावसाने हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. औरंगाबाद,जालना आणि बीड जिल्ह्यातील काही ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. सोबतच जालना जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यामुळे मोठ नुकसान झालं आहे. तसेच अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर उशिराने पाऊस झाल्यास पेरणी वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे लगेचच शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत असे आवाहन कृषी विभागाने केलं आहे.
गुरुवारी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, कन्नड आणि पैठणसह इतर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात काही भागात आणि अंबाजोगाई परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. याचप्रमाणे जालना जिल्ह्यातील रोहीलागड परिसरातील किनगाव येथे जोरदार पाऊस झाला आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान...
मान्सूनच्या सुरवातीलाच आलेल्या पहिल्याच पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचा पाहायला मिळाला. जालन्यातील किनगाव येथील पंचवीस ते तीस घरावरील पत्रे उडाले असून अनेकांचा निवारा पावसाने हिरावला आहे. तर लातूरच्या किल्लारीसह परिसरामध्ये बुधवारी झालेल्या पावसात वीज पडून एका मेंढपाळसह दोनशेळ्या दगावल्याची घटना घडली. तर एक मेंढरू जखमी झाले.
शेतकऱ्यांची तयारी पूर्ण...
जून महिन्याच्या आधीच शेतकरी पेरणीपूर्वी तयारीला लागतात. त्यानुसार पेरणीची तयारी शेतकऱ्यांकडून पूर्ण झाली आहे. सोबतच बी-बियाणे आणि खतांची सुद्धा खरेदी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता अपेक्षा फक्त चांगल्या पावसाची लागली असून, दमदार पाऊस झाल्यास बळीराजा सुद्धा पेरणीला लागतील.
फसवणूक टाळण्याचे आवाहन...
पेरणी काळात शेतकऱ्यांची बी-बियाणे खरेदीसाठी लगबग पाहायला मिळते. त्यामुळे अशा काळात कृषी केंद्र चालकांकडून बी-बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक केल्या जाण्याची शक्यता असते. तसेच खते आणि बियाणे एमआरपी पेक्षा अधिक दरांनी विकले जाण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे बी-बियाणे घेतांना कंपनीची आणि दरांची खात्री करूनच खरेदी करावी असे आवाहन सुद्धा कृषी विभागाने केलं आहे.