(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: सत्तांतरानंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच औरंगाबाद दौऱ्यावर; मेळाव्यालाही लावणार हजेरी
Aditya Thackeray: युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे 22 जुलैपासून दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहे.
Aditya Thackeray on Aurangabad Tour: गेल्या महिन्याभरात राज्यात बऱ्याच काही घडामोडी घडल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान या सर्व सत्तांतरानंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच 22 जुलैपासून दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहे. या काळात ते औरंगाबादच्या विविध भागात जाऊन शिवसैनिकांशी सवांद साधणार आहे. तर औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यालाही हजेरी लावणार आहे.
असा असणार आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा...
येवला येथून एक तासाचा प्रवास करून आदित्य ठाकरे 22 जुलैला दुपारी 2 वाजून 45 मिनटाला वैजापूर येथे पोहचणार आहे. वैजापूर येथे शिवसैनिकांकडून त्यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यांनतर वैजापूर येथून औरंगाबाद असा दोन तासांचा प्रवास करून आदित्य ठाकरे संध्याकाळी 5 वाजता शहरात दाखल होणार आहे. त्यांनतर ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.
दुसऱ्या दिवशी 23 जुलैला आदित्य ठाकरे हे सकाळी साडेदहा वाजता औरंगाबादहून पैठणच्या दिशीने जाणार आहे. पैठणमध्ये त्यांचे स्वागत केले जाणार. त्यांनतर पैठणहून गंगापूर आणि गंगापूरहून नेवासा असा आदित्य ठाकरेंचा प्रवास असणार आहे. दरम्यान ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून त्यांचे स्वागत केले जाणार आहे.
शिवसेनेची नवीन फळी होतेय तयार...
औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल आणि रमेश बोरनारे हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांचे समर्थक सुद्धा त्यांच्यासोबत गेले आहे. त्यामुळे या सर्व आमदारांच्या मतदारसंघात आता शिवसेनेकडून नवीन फळी उभी केली जात आहे. पक्षासोबत निष्टा कायम ठेवणाऱ्या शिवसैनिकांना चांगल्या पदावर संधी दिली जात आहे.