(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marathwada Water: मराठवाड्यातील धरणं अजूनही तुडुंब भरलेली, रब्बीला होणार मोठा फायदा
Aurangabad : यंदा धरणे भरलेली असल्याने पिकांना शेवटपर्यंत पाणी पुरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Marathwada Dam Water Level: यावर्षी मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे यावेळी मराठवाड्यातील धरणे तुडुंब भरली असल्याचे पाहायला मिळाले. विशेष मराठवाड्यातील आठ मोठी धरणे अजूनही शंभर टक्के भरलेली आहेत. तर विभागातील छोठी-मोठी आणि मध्यम धरणात आजघडीला 94.23 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे रब्बी खरीपातील पिकांना याचा मोठा फायदा होणार असून, शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे.
यावर्षी सुरवातीपासूनच दमदार पाऊस झाल्याने नदी नाले ओसंडून वाहत होते. त्यातच परतीच्या पावसाने देखील जोरदार हजेरी लावल्याने धरणाच्या पाणीपातळीत देखील मोठी वाढ झाली. त्यामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असले तरीही मात्र रब्बीत मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. कारण शेवटच्या टप्प्यात रब्बीच्या पिकांना अनेकदा पाण्याची कमतरता भासल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावर होत असतो. मात्र यंदा धरणे भरलेली असल्याने पिकांना शेवटपर्यंत पाणी पुरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धरणातील पाणीसाठा...( 18 नोव्हेंबरपर्यंतची आकडेवारी)
धरण | टक्केवारी | पाणीसाठा |
जायकवाडी | 100 टक्के | 2171 दशलक्ष |
येलदरी | 100 टक्के | 810 दशलक्ष |
माजलगाव | 100 टक्के | 312 दशलक्ष |
मांजरा | 100 टक्के | 177 दशलक्ष |
ऊर्ध्व पेनगंगा | 100 टक्के | 964 दशलक्ष |
निम्न तेरणा | 100 टक्के | 91 दशलक्ष |
विष्णुपुरी | 100 टक्के | 81 दशलक्ष |
सीना कोळेगाव | 100 टक्के | 89 दशलक्ष |
यंदा जायकवाडीतून 209 टीएमसी पाण्याचा विसर्ग ...
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जुलै महिन्यातच जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. जायकवाडी धरणाच्या मुख्य दरवाज्यातून यावर्षी तीन वेळा पाणी सोडण्यात आले. जायकवाडी प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी एकूण 103 दिवसांत जायकवाडी धरणातून 5925.64 दलघमी म्हणजेच 209.24 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तर धरणात अजूनही 100 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.