Aurangabad: महिना उलटूनही मुख्यमंत्र्यांच्या सभेला परवानगी मिळेना; सभेसाठी फक्त सहा दिवस शिल्लक
शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी एक महिन्यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळावी म्हणून अर्ज दाखल केले होते.
Chief Minister Meeting In Aurangabad: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची येत्या 8 जूनला औरंगाबाद शहरात जाहीर सभा होणार आहे. मात्र सभेला अजूनही परवानगी मिळाली नाही. विशेष म्हणजे या सभेच्या परवानगीसाठी शिवसेनेकडून पोलिसांना अर्ज करून एक महिना उलटला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी कधी मिळणार याची चर्चा पाहायला मिळत आहे. तर परवानगी मिळणारच असा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 1 मी रोजी औरंगाबाद शहरात जाहीर सभा घेतली होती. राज यांनी ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली, त्याच मैदानावर उद्धव ठाकरे यांची 8 जून रोजी सभा होणार आहे. सभेला अवघ्या सहा दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. मात्र अजूनही पोलिसांकडून या सभेला परवानगी मिळालेली नाही. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी 2 मे रोजीच सभेला परवानगी मिळावी म्हणून, पोलीस आयुक्तांकडे अर्ज दाखल केला होता. मात्र महिना उलटून सुद्धा उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळाली नाही. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या सभेला मात्र आठ दिवसात परवानगी देण्यात आली होती.
दानवे म्हणतात...
उद्धव ठाकरेंच्या सभेला अजूनही परवानगी मिळाली नसल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना आमदार म्हणाले, उद्धव ठाकरे यांची ज्याठिकाणी सभा होणार आहे त्या जागेची परवानगी संबधित संस्थेकडून मिळाली आहे.पोलिसांच्या परवानगीसाठी सुद्धा प्रस्ताव आम्ही सादर केला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त यांनी लवकरच परवानगी देण्याबाबत कबूल केलं आहे. पोलिसांच्या परवानगीसाठी काही अडचण येणार नाही, असे दानवे म्हणाले.