मोहाच्या दारूचा गावठी दारू ते फॉरेन लिकर असा नेत्रदीपक प्रवास
Maharashtra News : मोहाची फुलं हा निसर्गाने विदर्भाला भरभरून दिलेला रानमेवा आहे. मात्र मोहफूल नावाचा हा रानमेवा त्यापासून निघणाऱ्या दारूमुळे मोठा बदनाम आहे.
मुंबई : मोहाच्या फुलांपासून बनणाऱ्या दारूला विदेशी दारूचा दर्जा देण्याचा निर्णय मत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याआधी या दारूला देशी दारूचा दर्जा देण्यात आला होता. आता या निर्णयाचा चंद्रपूरसह विदर्भातील जंगलव्याप्त असलेल्या अनेक जिल्ह्यांवर मोठा आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय परिमाण होणार आहे.
मोहाची फुलं हा निसर्गाने विदर्भाला भरभरून दिलेला रानमेवा आहे. मात्र मोहफूल नावाचा हा रानमेवा त्यापासून निघणाऱ्या दारूमुळे मोठा बदनाम आहे. दारू या एका शब्दामुळे आदिवासींसाठी कल्पवृक्ष असलेलं हे झाड व्हाईट कॉलर लोकांमध्ये बदनाम झालं. मात्र राज्य सरकारच्या एका निर्णयामुळे आता मोहफुलाच्या दारूला राजमान्यता मिळाली आहे. मोहफुलाच्या दारूला राज्यसरकारने विदेशी मद्य अशी मान्यता देत त्याच्या व्यावसायिक विक्रीला परवानगी दिली आहे म्हणजे मोहफुलाची दारू आता गावठी दारू ते एकदम फॉरेन लिकर झाली आहे.
आतापर्यंत अवैध म्हणून पोलिसांच्या पायदळी तुडवल्या गेलेली ही मोहफुलाची दारू आता लवकरच दारू दुकानांमध्ये विदेशी मद्य म्हणून विराजमान होणार आहे. मोहाच्या दारूचा हा प्रवास जितका नेत्रदीपक आहे तितकाच विदर्भातील जंगलव्याप्त असलेल्या अनेक जिल्ह्यांवर मोठा आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय परिमाण करणारा आहे.
विदर्भातील ग्रामीण भागातील लोकं त्यातही प्रामुख्याने आदिवासी उन्हाळ्यात आपसूक पडणारी मोहफुलं वेचून-साठवून ठेवतात. सोयीनुसार त्यांचा आहारात, पशुखाद्यात आणि दारू काढण्यासाठी वापर करतात. त्यामुळे या कल्पवृक्षाची आणि पर्यायाने जंगलाचं ते रक्षण करतात. आता तर या कल्पवृक्षामुळे जास्तीचे चार पैसे त्यांच्या हातात पडणार आहे.
काजू आणि मोहाची फुलं यांच्या पासून बनणाऱ्या दारूला विदेशी दारूचा दर्जा देण्याचा निर्णय मत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याआधी या दारूला देशी दारूचा दर्जा देण्यात आला होता. मात्र जास्त विक्री होत नसल्याने अनेक उत्पादकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणारी दारू आता विदेशी दारू च्या दुकानात मिळणार आहे. काजू बोडांची बाजारपेठ ही सहाशे कोटी रुपयांची आहे ती वाढायला मदत हेईल असा राज्य सरकारचा मानस मानस आहे.
आतापर्यंत स्थानिक पातळीवर चोरी-छुपे पध्दतीने मोहाची दारू काढली जायची जी अनेक वेळा अशुध्द आणि हलक्या प्रतीची असायची. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे हा एक ब्रँड तयार होईल आणि आता पर्यंत गरिबांची दारू म्हणून हिणवल्या गेलेल्या मोहाच्या दारूला प्रतिष्ठा प्राप्त होईल यात शंकाच नाही.