(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NCP Political Crisis : अजित पवारांनी बंड केल्याचं शरद पवारांकडून मान्य, म्हणाले...
Maharashtra NCP Political Crisis : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना सोबत घेऊन बंड केल्याचे शरद पवार यांनी मान्य केले.
Maharashtra NCP Political Crisis : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना सोबत घेऊन बंड केल्याचे शरद पवार यांनी मान्य केले. अजित पवार यांनी आज राजभवनावर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याशिवाय आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षावर दावा केला होता. तसेच पक्षातील वरिष्ठांच्या आशिर्वादानेच आम्ही सरकारमध्ये सामील झाल्याचे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आता शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी शरद पवार यांनी अजित पवारांनी बंड केल्याचे मान्य केले. तसेच उद्या (सोमवारी) कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे, असेही यावेळी शरद पवार यांनी सांगितले.
सहा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलवली होती. पण त्याआधीच काही जणांनी वेगळी भूमिका घेतली. कुणी पक्षावर दावा केला तरी आम्ही लोकांमध्ये जाणार आहे. आमची खरी शक्ती सामान्य माणूस आणि कार्यकर्ते आहेत, असे शरद पवार म्हणाले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्री केले. भाजपने राष्ट्रवादीला भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त केले, असे शरद पवार म्हणाले.
विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्याचे आता समजले, असे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे बडे नेते सोडून गेले याची चिंता नाही, त्यांच्या राजकीय भविष्याची चिंता वाटते. अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही सहकारी संपर्कात आहेत, असेही शरद पवारांनी यावेळी सांगितले. तसेच आजचा प्रकार माझ्यासाठी नवा नाही. जे घडले त्यामुळे मी चिंतेत नाही. याआधीही 1980 असा प्रकार घडला होता. मी फक्त काही जणांचाच नेता होतो. पक्ष पुन्हा बांधला होता. त्यावेळी पक्ष सोडून गेलेले सर्व पराभूत झाले होते, राज्यातील मतदारांवर माझा विश्वास आहे, असे म्हणत पुन्हा पक्ष बांधणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे...
ईडीच्या चौकशीमुळे काही आमदार अस्वस्थ होते. मोदींच्या वक्तव्यानंतर त्यांची अस्वस्थता आणखी वाढली.
देशातील सर्व महत्वाच्या नेत्यांचे फोन आले. उद्धव ठाकरे यांच्याशीही फोनवर चर्चा झाली.
शपथविधी समारंभात अनेकांचे चेहरे चिंताजनक होते.
पक्ष फुटला असे मी कधीच म्हणणार नाही
आम्ही न्यायालयात जाणार नाही, जनतेत जाणार आहोत.
तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करणार
राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांच्या राजकीय भविष्याची काळजी
महाविकास आघाडी एकत्र काम करणार
जे घडले त्याची चिंता नाही.