Nashik Trakkers Death : दोन गिर्यारोहकांचा मृत्यू, दुर्देवी घटना कशामुळे घडली?
Nashik Trakkers Death : नाशिक जिल्ह्यातील मनमाड जवळील हडबीची शेंडी डोंगरावर गिर्यारोहणासाठी गेलेल्या दोघांचा खोल दरीत कोसळून मृत्यू झाला आहे.
Nashik Trakkers Death : नाशिक जिल्ह्यातील मनमाड जवळील हडबीची शेंडी डोंगरावर गिर्यारोहणासाठी गेलेल्या दोघांचा खोल दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झालाय. अनिल वाघ, मयूर मस्के अशी मृतांची नावं आहेत. तर प्रशांत पवार असं जखमीचं नाव आहे. उर्वरित 12 जणांना स्थानिकांनी सुखरुप खाली उतरवलं आहे. दोघांचा दुर्देवी मृत्यू घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पण या दोघांचा मृत्यू कसा झाला, यामागची कारणे काय आहेत..?
अहमदनगर येथील इंद्रप्रस्थ ट्रेकर्स या ग्रुपने बुधवारी ट्रेकिंगचे नियोजन केलं होतं. मनमाड लगत असलेला हडबीचा सुळका हा गिर्यारोहकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरला आहे. आणि त्यावर चढाई करण्यासाठी अनेक दूरदूरचे गिर्यारोहक येत असतात. हा थंब सारख्या (अंगठ्याच्या) आकाराचा सुळका चढताना खिळ्यांच्या साहाय्याने रोपवे बांधला होता. मात्र त्यासाठी प्रशिक्षित ट्रेनर लागतात. नगरच्या या ग्रुपने बुधवारी या सुळक्यावर यशस्वी चढाई केली, ज्यात कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांचा समावेश होता. या सर्वांनी या सुळक्यावर पायथ्यापासून यशस्वी चढाईला सुरुवात केली. त्यानंतर ट्रेनर मयुर म्हस्के आणि अनिल शिवाजी वाघ या दोघांनी जून्या बोल्डिंगवर रोप लावला. आणि शेंडीच्या डोंगरावर चढत यशस्वी चढाई सुध्दा केली. संध्याकाळी पुन्हा याच रोप वरुन मुल खाली उतरले,मात्र शेवटी राहिलेल्या मयुर आणि अनिल यांनी बोल्डिंग मधून रोप काढत उतरत असताना वरच्या बोल्डिंग मधून दगड ठिसूळ असल्याने हे दोघे खाली पडले आणि त्यांचा त्यात मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेला प्रशांत पवार हा जखमी झाला. शेंडीच्या डोंगरा लगत असलेल्या कातरवाडी, रापली येथिल गावक-यांना याची माहिती मिळताच त्यांनी खोलदरीत पडलेल्या या दोघांना बाहेर आणले.
हा सुळका सर्वांना आकर्षित करत असला तरी तो अनेक वर्ष उन-वारा पाऊस यामुळे खिळखिळा झाला आहे. साधारण 20 वर्षापूर्वी या ठिकाणी गिर्यारोहण करणा-यांनी येथे बोल्टिंग केले आहे. ते खूप जूने झालेले असल्याने दगड ठिसूळ होऊन ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता मनमाडमधील काही ट्रेकर्सनी सांगितले.