नागपूर :  नागपूरच्या क्वेटा कॉलनी येथे  पाच ते सहा अर्भक कचऱ्यात फेकल्याची घटना समोर आली आहे अर्भक फेकलेल्या ठिकाणी रुग्णालयाचे बायो मेडिकल वेस्ट देखील आढळलंय. त्यामुळे हे अर्भक कुणी फेकलं हा आता चिंतेचा विषय बनला आहे.


पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनीही घटनास्थळावरून कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून तीन विकसित तर काही अविकसित भ्रूण आढळल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.  घटनास्थळी एक मानवी किडनी आणि काही मानवी हाडे सापडल्याची माहिती  राजमाने यांनी दिली आहे. आजूबाजूला अनेक रुग्णालय आणि नर्सिंग होम असून त्या ठिकाणातील बायोमेडिकल वेस्टमध्ये हे भ्रूण या ठिकाणी फेकण्यात आलेत का याचा तपास पोलीस करतील असं राजमाने म्हणाले. दरम्यान हे अवैध गर्भपाताचे प्रकार आहे का याचाही तपास केला जाईल अशी माहिती राजमाने यांनी दिली.


दुपारी चारच्या सुमारास स्थानिक नागरिकांनी सर्वात पहिले कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बायोमेडिकल वेस्टसह तीन विकसित तर  इतर अविकसित भ्रूण पाहिले होते. त्यानंतर घटनेची सूचना पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्याठिकाणी सुमारे सहा भ्रूण, काही हाडे आणि इतर मानवी अवयव पाहिल्यानंतर फॉरेन्सिक टीम आणि डॉक्टरांना बोलवण्यात  आले


डॉक्टरांनी देखील घटनास्थळी फेकण्यात आलेल्या बायोमेडिकल वेस्टमध्ये तीन विकसित भ्रूण इतर अविकसित भ्रूण, काही मानवी हाडे आणि एक किडनी असल्याला दुजोरा दिला. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील आर्वी मधील कदम हॉस्पिटलच्या आवारात ही अनेक भ्रूण आणि हाडे सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर नागपुरात पुन्हा तसाच प्रकार समोर आल्यामुळे हेही अवैध गर्भपाताचे प्रकार आहे की निष्काळजीपणाने बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर फेकल्याचे प्रकार आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


वर्धा गर्भपात प्रकरण: डॉ. नीरज कदमला अटक, आतापर्यंत सहाजण ताब्यात, 12 कवट्या अन् 54 हाडं जप्त



धक्कादायक! वर्ध्यातल्या रुग्णालयातील 'दफनभूमी'; रुग्णालयाच्या आवारात गर्भपात केलेल्या अर्भकांचे अवशेष