मुंबई: अंगावर कुर्ता, डोळ्यांवर फुल फ्रेम चष्मा, तेजस्वी वाणी, रुबाबात चालणं आणि फटकळ बोलणं...,इतकं म्हटलं की एकमेव व्यक्ती डोळ्यासमोर येते ती म्हणजे राज ठाकरे...राज श्रीकांत ठाकरे, बॉलिवूड स्टाईलनं सांगायचं झालं तर नाम ही काफी है...राज ठाकरे यांचं नाव जरी घेतलं तरी अनेकांना धडकी भरते. पण याच राज ठाकरेंना एकदा पोलिसांनी रात्री 02:45 वाजता अटक केली होती. ते ही थेट रत्नागिरीच्या गेस्ट हाऊसवरून. आज मनसेचा 16वा वर्धापन दिवस आहे.


शाळेत असल्यापासून काकांच्या म्हणजे बाळासाहेबांच्या मार्मिकमध्ये व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे आपल्या काकांसारखंच होतील असं कुणाला ही वाटलं नसेल. बाळासाहेबांसारखाच स्पष्टवक्तेपणा, तीच भेदक नजर आणि तीच स्टाईल. 2006 साली मनसेची स्थापना झाली आणि आपल्या काकांसारखंच राज ठाकरेंनी सुद्धा रान पेटवलं.


राज्यात 1995 साली सेनेची सत्ता आली. पण काही कारणास्तव राज ठाकरे राजकरणापासून दूर झाले होते. त्यानंतर 2003 साली एक मोठी घडामोड घडली. उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षापदी निवड करण्यात आली. जिथं सर्वांना वाटत होत की बाळासाहेबांचा उत्तराधिकारी राज ठाकरेच होतील तिथे उद्धव यांची निवड झाली आणि राज ठाकरेंसोबत महाराष्ट्राला धक्का बसला. या नंतर दोनच वर्षात म्हणजे नोव्हेंबर 2005 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आणि 18 डिसेंबर 2005 रोजी थेट शिवसेनेलाच जय महाराष्ट्र केला.


मनसेची स्थापना
आता पुढे काय? मराठी जनतेच्या या प्रश्नाचं उत्तर होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना. सेनेला राम राम ठोकल्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा केला आणि परत येताच 9 मार्चला 2006 रोजी मनसेची स्थापना केली. मनसेची स्थापना ही सुद्धा शिवसेनेसारखीच मराठीच्या मुद्द्यावर झाली. फरक इतकाच होता की शिवसेनेच्या रडारवर दक्षिण भारतीय होते तर मनसेच्या रडारवर उत्तर भारतीय.


मनसेची स्थापना होताच राज ठाकरे यांनी देशभर आपली हवा केली. आंदोलनं...तोडफोड...मारझोड...खळ्ळ खटॅक ही पक्षची भाषा होती. मनसे, मराठी माणसांच्या मनात तर अमराठी जनतेच्या डोक्यात जाऊन बसली. मनसेनं सुरूवातीच्या काळात अनेक आंदोलनं केली. पण त्यांचं एक आंदोलन मजबूत पेटलं आणि त्याचे पडसाद देशभर उमटले.


रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्रात रेल्वे नोकर भरतीची परिक्षा घेण्यात आली होती. देशभरातून अनेक जण या परीक्षेसाठी मुंबईत दाखल झाले होते आणि यात सर्वात जास्त संख्या होती उत्तर भारतीयांची. तेव्हा लालू प्रसाद हे रेल्वे मंत्री होती. या परीक्षांमध्ये केंद्र सरकारने मराठी तरुणांना नाकारल्याचा आरोप मनसे आणि शिवसेनेनं केला. राज्यात मराठी तरूणांना संधी मिळावी ही मनसेची मागणी होती. मराठी तरुणांचे फॉर्म नाकारले तर काहींना हॉल तिकीट मिळाली नसल्याचं घटना समोर आल्या. हा वाद चिघळला आणि राज ठाकरेंचं कार्यकर्ते उत्तर भारतातून आलेल्या परिक्षार्थींवर तुटून पडले.


परीक्षा सेंटरमध्ये घुसून मनसे कार्यकर्त्यांनी सर्वांना बेदम मारहाण केली. घडलेली घटना ही वाऱ्या सारखी पसरली. राज्यभारत आंदोलनं झाली. मुंबईच्या गल्लीतला आवाज अनेक वर्षांनी थेट दिल्लीत गेला होता. संसदेत देखील या मारहाणीवर चर्चा झाली अन सगळीकडे एकच सूर होता तो म्हणजे राज ठाकरेंना अटक करा.


पाहा व्हिडिओ : Raj Thackeray: …जेव्हा राज ठाकरेंना रात्री पावणे तीन वाजता अटक झाली, जाणून घ्या काय आहे किस्सा



राज ठाकरेंना अटक
राज ठाकरेंवर कारवाई करण्याचा मागणीने जोर धरला. कधीही काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि अखेर तो क्षण आला. कोर्टाने आदेश काढला...अटक वॉरंट निघालं. अन् राज ठाकरेना 21 ऑक्टोबर रोजी रात्री 02:45 वाजता मुंबई पोलिसांनी रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहातून अटक केली.


रात्रीच्या अंधारात झालेल्या अटकेमुळे वातावरण चांगलच तापलं. शांत झालेला महाराष्ट्र पुन्हा पेटला. ठिकठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड अन् जाळपोळ केली. हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि कडक सुरक्षेत राज ठाकरे यांना वांद्रे कोर्टात हजर केलं. त्यावेळी राज यांनी एक रात्री मानपाडा पोलीस ठाण्यात देखील घालवली होती आणि दुसऱ्या दिवशी त्यांना कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं होतं. 


सुनावणी दरम्यान राज ठाकरेंना 14 दिवसांची न्यायालयीन कस्टडी देण्यात आली. परंतु काही क्षणात एक बातमी समोर आली, ती बातमी होती राज यांच्या सुटकेची. न्यायालयीन कस्टडी मिळाल्यानंतरही राज यांना जामीन मंजूर झाला होता.


मनसेला आज सोळा वर्ष पूर्ण झाली आणि मागे वळून पाहिलं तर 2008 साल हे मनसेसाठी महत्त्वाचं ठरलं. याच आंदोलन आणि अटकेमुळे राज यांना 2009 सालच्या विधानसभेत फायदा झाला आणि एकाच फटक्यात 13 आमदार निवडून आले. मनसेची पुढची वाटचाल कशी असेल माहीत नाही. पण सध्यातरी राज ठाकरे यांनी कंबर कसली आहे.


संबंधित बातम्या: