(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Mumbai Rains LIVE : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळली
Maharashtra Rain : सध्या राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात चांगलाच पाऊस झाला.
LIVE
Background
Maharashtra Mumbai Rains LIVE : सध्या राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात चांगलाच पाऊस झाला. जूनमध्ये उघडीप दिलेल्या पावसाचा जुलैमध्ये जोर वाढल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई बरोबरच कोकणात देखील पावसाचा जोर वाढला आहे. सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. यामुळं वाहतुकीसाठी महामार्ग बंद करण्यात आला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच राज्याच्या इतर भागात चांगला पाऊस झाला. धुळे, जळगाव, पालघर या जिल्ह्यात पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं
बुलढाणा जिल्ह्यात पावसाची हजेरी
गेल्या चार दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यात आज पुन्हा आगमन केलं आहे. जिल्ह्यातील लोणार, मेहकर, सिंदखेडराजा परिसरात दुपारपासून जोरदार पावसानं आगमन केलं आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात अजूनही खरीप पेरणी मोठ्या प्रमाणात सुरु असून या पावसानं मात्र शेतकरी आनंदात असल्याचं चित्र आहे.
Buldhana : बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी
Buldhana : बुलढाण्यातील खामगाव, नांदुरा, शेगाव, संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. खरिपाच्या पेरणीनंतर तीन दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेले असताना आजच्या या पावसाने शेतकऱ्यांची पेरणी यशस्वी झाल्याची भावना आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहेत. गेल्या तीन तासांपासून या परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी,नाल्यांना पूर आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाच्या सरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाच्या सरी येत आहेत. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नागपुरात दमदार पावसाला सुरुवात
नागपुरात सध्या दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या एक तासापासून पाऊस सुरु असून, अनेक सखल भागात रस्त्यावर पाणी साचल्याचे दिसून येत आहे. नागपूरच्या कळमना भागात रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून येत आहे.
परशुराम घाटात कोसळली दरड, वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरु
रत्नागिरी जिल्ह्यात सोसायट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात सोसायट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु आहे. चिपळूनमध्येही जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळं बळीराजा शेतीकामात गुंतला आहे. पुढचे तीन दिवस कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गतवर्षीच्या महापुराचा आढावा घेऊन पावसामुळे होणाऱ्या अपघाताच्या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज झालं आहे.