Black Box : मुंबई लोकलमध्ये ब्लॅक बॉक्स बसवणार, अपघातावेळचा तपशील जतन होणार
विमान आणि हेलिकॉप्टरप्रमाणेच रेल्वेमध्येही ब्लॅक बॉक्स लावण्यात येणार आहेत. रेल्वे अर्थसंकल्पात 2.3 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत.
मुंबई : विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये ब्लॅक बॉक्स असतो हे साऱ्यांनाच माहिती आहे. विमान आणि हेलिकॉप्टर अपघाताची कारणं शोधण्यासाठी हे ब्लॅक बॉक्स महत्त्वाचे ठरतात. अपघातावेळी नेमकं काय घडलं होतं? हे ब्लॅक बॉक्समधून समोर येतं. आता विमान आणि हेलिकॉप्टरप्रमाणेच मुंबई लोकलमध्ये ब्लॅक बॉक्स लावण्यात येणार आहेत. रेल्वे अर्थसंकल्पात 2.3 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत.
या सीव्हीव्हीआरएस यंत्रणेमुळे आणीबाणीच्या प्रसंगी मोटरमनच्या कॅबमधील सर्व घटना रेकॉर्ड होण्यास तर मदत होणार आहेच शिवाय ट्रेनसमोरच्या कॅमेऱ्यांमुळे अपघातातील तपशील जतन करणे सोपे होणार आहे. लांब पल्ल्यांच्या इंजिनासह उपनगरीय लोकलच्या मोटरमन व गार्डच्या कॅबमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
सेंट्रल रेल्वे नागपूर डिव्हिजनच्या जवळपास सर्व ट्रेनमध्ये या यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. परंतु सध्या मालगाडीच्या इंजिनमध्ये याचा वापर करत नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच रेल्वेच्या सर्व डिवीजनमधील मालगाड्यांमध्ये हा ब्लॅक बॉक्स बसवण्यात येणार आहे. यामुळे रेल्वेचा अपघात झाल्यास अपघाताचे कारण कळणार आहे. तसेच जर रेल्वेने स्पीडचे मर्यादा ओलांडली तर त्याची देखील नोंद ठेवणार आहे. जर रेल्वेच्या ड्रायव्हरने सिग्नलवर वेगमर्यादेची काळजी नाही घेतली तर त्याची देखील नोंद ठेवण्यास हा ब्लॅक बॉक्स मदत करणार आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या मार्गांसाठी चांगली तरतूद करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या निधीतून नवीन रेल्वे मार्ग, पादचारी पूल, सिग्नल यंत्रणा अद्यावत करणे, रेल्वे यार्डमध्ये बदल आदी कामांचा समावेश आहे. मध्य रेल्वेवरील प्रकल्पांसाठी वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षांसाठी 7251 कोटी मिळाले आहेत. मागील आर्थिक वर्ष 2021-22 च्या तुलनेत यंदाच्या वर्षी जवळपास 50 टक्के अधिक निधी मिळाला आहे.
संबंधित बातम्या :
Budget 2022: मुंबईसह राज्यातील मध्य रेल्वेच्या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तरतूद; 'या' कामांसाठी होणार खर्च
Munbai Local: आज मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर 72 तासांचा जम्बो मेगाब्लॉक; अनेक एक्स्प्रेस, लोकल रद्द