बीडमध्ये नामांकित क्लासेस चालकाच्या आत्महत्येने खळबळ, दोन दिवसांपूर्वीच केले क्लासेसचे उद्घाटन, नैराश्य की आणखी काही?
Beed News : एका रात्रीतच असं काय झालं? की त्यांनी अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली. याचा तपास पोलिस करत आहेत.
Beed News : बीड शहरात नामांकित क्लासेस चालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचे वृत्त समजताच परिसरात खळबळ माजली आहे. माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वीच क्लासेसचे उद्घाटन केले होते. ही घटना नैराश्यातून घडली की आणखी काही कारण आहे? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
गेल्या वीस वर्षांपासून खासगी क्लासेस चालवत होते
बीड शहरातील नाथसृष्टी भागात राहणारे राजाराम धस (वय 40) असं आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून ते गेल्या वीस वर्षांपासून खासगी क्लासेस चालवत होते मूळचे केज तालुक्यातील सारणी गावचे राजाराम धस वडील पोलिसांत असल्यामुळे बीड शहरात वास्तव्याला आले. काही वर्षे शहरातील जिज्ञासा करिअर अकॅडमी मध्ये शिक्षक म्हणून काम केल्यानंतर गेल्या आठ वर्षापासून शहरातील अंकुश नगर भागात ते स्वतःच ब्राईट स्पर्धा परीक्षा केंद्र चालवत होते.
रात्री कुटुंबीयांसोबत जेवण केलं, अन्......
रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास राजाराम धस यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत जेवण केलं आणि त्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी आपापल्या खोलीत गेले, मात्र तीन वाजता त्यांचा लहान भाऊ उठला असता एका बंद असलेल्या खोलीचा दरवाजा त्याला उघडा दिसला आणि त्याने आत जाऊन पाहिले असता राजाराम धस यांनी गळफास घेतलेल्याच त्यांच्या निदर्शनास आलं, त्यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले आणि राजाराम यांचा मृतदेह बीडच्या जिल्हा रुग्णल्यात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला
आत्महत्येचं कारण कळले नाही
राजाराम धस यांनी आत्महत्या का केली याचं कारण मात्र अद्याप कळलेलं नाही. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं आणि आई वडील असा त्यांचा परिवार आहे. दोन दिवसांपूर्वीच धस यांनी शहरांमध्ये एका नवीन खासगी क्लासेसच्या शाखेचे उद्घाटन केलं होतं, वीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी स्वतः जागा घेऊन हे क्लासेस उभे केले, मात्र एका रात्रीतच असं काय झालं? की त्यांनी अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली. याचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेनंतर मात्र जिल्हा रुग्णालयात विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली आणि धस सरांबद्दल आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
संबंधित बातम्या :
Amazon : अॅमेझॉनवर गर्भपाताच्या औषधांची विक्री, अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई
Kolhapur News : कोल्हापूरात अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; अंनिसचे स्टिंग ऑपरेशन, डॉक्टरांची नावंही उघडकीस
धक्कादायक! नागपूरच्या क्वेटा कॉलनीजवळ पाच ते सहा भ्रूण कचऱ्यात, अर्भक फेकलेल्या ठिकाणी रुग्णालयाचे बायो मेडिकल वेस्ट