Maharashtra Breaking News LIVE Updates: औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
26 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार, भाजप नेत्या पंकजा मुंडेंची घोषणा
राज्यात सध्या नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच केंद्रीय मंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे सर्व बडे नेते निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. भाजप नेत्यांनी सभांचा सपाटा लावला आहे. देवेंद्र फडणवीसांची गोंदियात सभा तर पंकजा मुंडेंची बीडमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बीडमधील आष्टीत पंकज मुंडे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. राज्यात होऊ घातलेली नगरपंचायतीची निवडणुक काळी निवडणूक असल्याची टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. तर 26 जानेवारीपासून ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
महाविकास आघाडीमध्ये आमचं नुकसान होतेय, शिवसेना खासदार हेमंत पाटलांनी व्यक्त केली नाराजी
महाविकास आघाडीत असल्यामुळे शिवसैनिकांचे 100 टक्के नुकसान होत आहे, अशी खंत शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्ती केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील आपली होत असलेली घुसमट व्यक्त करताना हेमंत पाटील म्हणाले की, 'राज्यातील या आघाडीमध्ये आमचा वापर करून घेतला जात असल्याची भावना आमच्या मनात निर्माण झाली आहे. याबाबत आम्ही वरिष्ठांच्या कानावर काही बाबी घातल्या आहेत.' यावेळी बोलताना खासदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांनाही प्रत्युत्तर दिलं आहे. हेमंत पाटील आज नांदेड मध्ये बोलत होते. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री नसले असले तर तुम्ही कुठे असता? असा सवाल करत खासदार हेमंत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. आम्ही आहोत म्हणून सरकार आहे असा कुणीही गर्व करु नये. अशी टीका शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली. चव्हाण यांनी आम्ही आहोत म्हणून सरकार आहे असं म्हटलं होतं, त्याला पाटील यांनी प्रतिउत्तर दिलेय. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये आमचं शंभर टक्के नुकसान होत आहे. आमचा वापर केला जात असल्याची खंत व खदखद शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलीय. या बाबी वरिष्ठांच्या कानावर घातल्या आहेत. केवळ उध्दव ठाकरे यांचे आदेश आहेत, त्यामुळे सगळं सहन करत असल्याचं वक्तव्य पाटील यांनी केलंय.
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण करण्यात आली आहे .बुलढान्याच्या नगराध्यक्षा नजमुनींसा यांच्या मुलीचं लग्न आज औरंगाबाद येथे होतं. बिडबायपास वरील एका मंगल कार्यालयात सायंकाळी या लग्नासाठी एमआयएम खासदार इम्पियाज जलील हे लग्नठिकाणी गेले असता तिथं बुलढाणा नगराध्यक्षा यांचे पती मोहम्मद सज्जाद यांनी इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण केली . सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरलाय.
पिंपरी चिंचवडमध्ये आढळला ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण शहराबाहेरील असून दुबईहून आलेला आहे. या रुग्णाला 14 डिसेंबरला काही लक्षणं आढळली. हा रुग्ण मुंबईवरून थेट पिंपरी चिंचवडमध्ये आला होता. आज त्याचा ओमयक्रोन रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. शहरात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या अकरा रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यापैकी दहा रुग्ण निगेटिव्ह झाले आहेत.
अमित शहांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिकृतीचे अनावरण
पुणे महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आणि छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भुमीपुजनासाठी आयोजित कार्यक्रमासाठी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा पोहचले.
माफी मागा अन्यथा कर्नाटकच्या बसेस महाराष्ट्रात येऊ देणार नाही
नागपूर - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना केल्याच्या कर्नाटकच्या घटनेचा निषेध सर्वत्र केला जात आहे. याचे पडसाद उपराजधानी नागपुरात उमटले आहे. शहराच्या गांधी गेट परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर युवा सेना प्रमुख विक्रम राठोड याच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटकमधील भाजप सरकारच्या मंत्र्यांनकडून या घटनेच्या विरोधात कारवाई करण्याऐवजी शुल्लक घटना म्हणत केलेला अपमान सहन करणार नाही म्हणत नारे देत घोषणा देण्यात आल्या. कर्नाटक सरकारने माफी मागावी अन्यथा कर्नाटकमधून बसेस महाराष्ट्रात येऊ देणार नाही, आल्यास तोडफोड करू असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार सदाशिवनगर बंगळूर इथे घडला होता . या घटनेचा निषेध राष्ट्रवादी शिवसेनेकडून करण्यात आला .याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून महाराजांना दुधाचा अभिषेक करण्यात येत आहे. कल्याणमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला.