Maharashtra Breaking News 28 June 2022 : राज्यातील घडामोडीची प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Jun 2022 06:15 PM
पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांचा ताबा सीबीआयकडून ईडीकडे

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांचा ताबा सीबीआयकडून ईडीकडे गेला आहे. 5 जुलैपर्यंत ईडीच्या कस्टडीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कस्टडीसाठी ईडीनं भोसलेंना आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं होतं. येस बँक आणि डिएचएफएल  घोटाळा प्रकरणात आता ईडी अविनाश भोसलेंची चौकशी करणार आहे. 

जून महिना ओलांडला तरीही पेरण्या झाल्याच नाही, हिंगोली जिल्ह्यात फक्त तीन टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण
Hingoli News : पाऊस न पडल्याने यावर्षी पेरण्या उशिरा होण्याची शक्यता आहे. जून महिना ओलांडला तरी हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमधील पेरण्या शिल्लक आहेत. म्हणावा तसा पाऊस न झाल्याने बळीराजाने पेरणी करायचे टाळले आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये फक्त 14हजार180 हेक्टर शेत जमिनीवर पेरणी झाली आहे. म्हणजेच फक्त तीन टक्के जमिनीवर पेरणी झाल्याची प्रशासकीय माहिती आहे. तर मोठ्या प्रमाणामध्ये पिकांमध्ये ही बदल होण्याची शक्यता आहे. या वर्षी हळद लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे तर सोयाबीन आणि कापूस या पिकांच्या लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. कापसाला आणि सोयाबीनला यावर्षी चांगला भाव होता तोच भाव पुढील वर्षी राहिल, यामुळे या पिकांना शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. परंतु त्या अगोदर वरुणराजाने कृपा करावी आणि शेतकऱ्यांचा पेरण्या पूर्ण व्हाव्यात अशीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करु लागले आहेत
Maharashtra Rain : पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस

पिंपरी चिंचवड शहरात पावसाने हजेरी लावली आहे. विविध भागात पावसाची संतरधार सुरू आहे.  

पुढील 3 ते 4 दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज
Maharashtra Rain : पुढील 3 ते 4 दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून मुंबईत उद्या संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढणार आहे. परिणामी उद्यापासून मुंबई, ठाण्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याकरता उद्यापासून पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकणात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
 


याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यातील घाट माथ्यावर आज मुसळधार पावसाची शक्यता आहे तर कोल्हापूर, सातारा, सांगली भागातील घाट माथ्यावर उद्या आणि परवा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

 

तसंच उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. तर मराठवाड्यातही काही मोजक्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
डाॅलरच्या तुलनेत रुपया नव्या निच्चांकी पातळीवर

डाॅलरच्या तुलनेत रुपया नव्या निच्चांकी पातळीवर आलाय. आज शेअर बाजार उघडताच डाॅलरच्या तुलनेत रुपया 40 पैशांनी खाली घसरलं. रुपया 78.73 वर सध्या बाजार करतोय. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या भावातील उसळी आणि देशातून बाहेर जात असलेली परकीय गंगाजळीमुळे रुपयावर प्रचंड दबाव निर्माण झालाय.

Akola : अकोल्यात पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला

Akola : अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील सोनखास येथे जलस्वराजच्या विहीरी लगत नदीच्या काठावर पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला. या वाघाचा वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा वन्यप्रेमींचा आरोप आहे. वाघाच्या मृत्यूचं कारण सध्या अस्पष्ट आहे.

Amaravati : अमरावती कारागृहातून तीन कैदी फरार झाल्याने खळबळ

Amaravati : अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून रात्री 3 वाजता कैदी फरार झाल्याने खळबळ उडाली आहे. रोशन गंगाराम उईके, धारणी, सुमित धुर्वे, धारणी आणि साहिल अजमल कासेकर, रत्नागिरी अशी फरार कैद्यांची नवे आहेत. या तिघांनीही बंदी गृहाच्या दाराचे गज वाकवून बाहेर निघाले. त्यानंतर ब्लॅंकेट आणि चादरीच्या साहाय्याने त्यांनी भिंत ओलांडली आणि पसार झाले. या घटनेमुळे कारागृह प्रशासन हादरले असून फ्रेझरपुरा पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहे..

नाशिक जिल्ह्यात घरपोच लसीकरणाला वेग

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी लसीकरण मात्र सुरूच आहे. आता हर घर दस्तक या मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास दीड लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती निवळली असली तरी लसीकरण मात्र अद्यापही सुरु आहे. कोरोनासोबत पावसाळ्यात येणाऱ्या जलजन्य आजारांचे आव्हान महापालिकेसमोर असून हर घर दस्तक सारख्या अभियानातून सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना महाराष्ट्र कोविड टास फोर्सने केली आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा 

पंतप्रधान मोदी जर्मनीहून यूएईसाठी रवाना, प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादानंतरचा दौरा महत्त्वाचा

PM Modi in UAE : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जर्मनीहून (Germany) संयुक्त अरब अमिरातीसाठी (UAE) रवाना झाले आहेत. युएईमध्ये पंतप्रधान मोदी संयुक्त अरब अमिरातीचे माजी राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधनाबद्दल वैयक्तिक शोक व्यक्त करतील. याशिवाय पंतप्रधान मोदी नवे राष्ट्रपती आणि अबुधाबीचे शासक म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन करतील. त्यानंतर 28 जून रोजीच रात्री पंतप्रधान मोदी संयुक्त अरब अमिरातीहून भारतासाठी रवाना होतील.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

Shivsena : रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते एकवटले

Shivsena : रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते एकवटले. महेंद्र दळवी यांना पाठींबा देण्यासाठी कार्यकर्ते एकवटले. अलिबाग येथील कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांचा महेंद्र दळवी यांना पाठींबा असल्याचे समजत आहे. 

अवैध सावकार राजेंद्र बंबने विमा पॉलिसीतून मिळवलं पाच कोटीचं कमिशन, स्वत:सह कुटुंबियांच्या नावे 125 मालमत्ता

धुळे : धुळे शहरातील अवैध सावकार राजेंद्र बंब याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्याची विविध मालमत्ता ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. याच तपासाचा एक भाग म्हणून राजेंद्र बंब आणि त्याच्या कुटुंबियांनी तब्बल 125 ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याने 5 हजाराहून अधिक नागरिकांच्या विमा पॉलिसी काढल्या असून त्याचे त्याला पाच कोटी 40 लाख रुपयांचे कमिशन मिळाल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला विमा कंपनीने दिले आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

मुंबईत लसीकरणाशिवाय रुग्णांचा मृत्यू कोविडपेक्षा अधिक; BMC चा रिपोर्ट

मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) नागरिकांना पुन्हा एकदा लसीकरणासाठी आवाहन करत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जिनोम सिक्वेन्सिंग रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की, ज्या रुग्णांनी लसीकरण केले नाही. त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कोविडच्या मृत्यूपेक्षा अधिक आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

नाशिक महापालिकेच्या सहाही विभागात ऑटोमॅटिक रेनगेज, पावसाची अचूक माहिती मिळणार

नाशिक (Nashik) शहराला पूर परिस्थिती काही नवीन नाही. मात्र याच पार्श्वभूमीवर आयुक्त रमेश पवार पाणी सहाही विभागात प्रत्येकी एक असे सहा पर्जन्यमापक यंत्र (Rain Gauge) बसविण्याचा निर्णय घेतला असून या यंत्रामुळे महापालिकेला पावसाचा अचूक अंदाज येणार असून पावसाचा जोर वाढल्यास पुढील उपाययोजना करणे सोपे जाणार आहे. दरवर्षीं नाशिक शहराला पुराच्या पाण्याचा (Nashik Flood) फटका बसतो. शहरातून जाणाऱ्या गोदावरी नदीला हमखास पूर येतो. त्यामुळे नदीकाठच्या वस्त्याना पुराचा सामना करावा लागतो. त्यामुळे सदर परिसरात मोठे नुकसान होते हे नुकसान टाळण्यासाठी नाशिक मनपाने हे पाऊल उचलले आहे. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

पेट्रोल-डिझेलचे दर आज किती बदलले? झटपट चेक करा दर

Petrol Diesel Price Today 28 June 2022 : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. आज पेट्रोल (Petrol) -डिझेलचे (Diesel Price) देशातील दर स्थिर असून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण, आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सातत्यानं चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 116.3 डॉलर आणि WTI ची किंमत 110.6 डॉलरवर पोहोचली आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

'धर्मवीर' मधील डायलॉगवर कात्री; 'शिवसेनेनं डायलॉग काढायला लावला', अमेय खोपकरांचा आरोप

आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारित असणारा 'धर्मवीर' (Dharmaveer) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता हा चित्रपट ओटीटीवरुन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटामधील एक व्हिडीओ शेअर करुन मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी एक शिवसेनेवर आरोप केले आहेत. या चित्रपटामधील एक डायलॉग काढून हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे, असं अमेय खोपकर यांचे मत आहे. अमेय खोपकर यांनी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये धर्मवीर चित्रपटातील अखेरच्या सीनचे दोन व्हिडीओ दिसत आहेत. यामधील एका व्हिडीओमध्ये चित्रपटगृहात रिलीज झालेला सीन आहे तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये ओटीटीवर रिलीज झालेला सीन आहे. यामध्ये एका डायलॉग एडिट केला असल्याचा आरोप अमेय खोपकर यांनी केला आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्ती वापरण्यावर घातलेल्या बंदीचा निर्णय योग्यच, उच्च न्यायालयाकडून स्पष्ट

प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) च्या गणेशमूर्तीवर राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) दिलेल्या बंदीच्या निर्णायाला दिलेलं आव्हान सोमवारी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावलं. हरित लवादाने यासंदर्भात दिलेले आदेश योग्यच असल्याचं निरीक्षण नोंदवत हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. शाडूची माती ही पीओपीपेक्षा पर्यावरणासाठी घातक असून कोणताही शास्त्रोक्त अभ्यास न करता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं पीओपीच्या वापरावर बंदी घातली आहे. याशिवाय बंदीत मार्गदर्शक तत्त्वाद्वारे कशी काय घातली जाऊ शकतात? असा प्रश्नही याचिकाकर्त्यांचे वकील संजय गुंजकरांनी उपस्थित केला होता. मात्र हा निर्णय शास्त्रशुद्ध अभ्यासाअंतीच घेण्यात आल्याचं प्रदूषण मंडळाकडून हायकोर्टाला सांगण्यात आलं. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

Buldhana Rain Update : जिल्ह्यातीळ अनेक भागात मुसळधार पाऊस, नदी, नाल्याना पूर

Buldhana Rain Update : जिल्ह्यातीळ अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय. पावसाने शेतकरी समाधानी झाले आहेत. अनेक भागात नदी, नाल्याना पूर आला आहे. शेगाव तालुक्यातील कालखेड भागात मुसळधार पावसाने पेरलेली शेती गेली वाहून गेली असल्याचं समजतंय, शेतकऱ्याचं नुकसान झालंय

Maharashtra Political Crisis : येत्या 2 ते 4 दिवसात भाजपा सरकार राज्यात येईल - खासदार प्रताप पाटील

Maharashtra Political Crisis : येत्या 2 ते 4 दिवसात भाजपा सरकार राज्यात येईल. आषाढी एकादशीला विठोबाची मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस महापूजा करतील. असे विठोबाला साकडे घातले. शिंदे यांच्या स्वतंत्र गटाला मान्यता मिळेल. एकनाथ शिंदे साहेब मुंबईत येतील. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. सेनेचे बारा खासदार भाजपाच्या संपर्कात आहेत. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची पंढरपूरात माहिती दिली. प्रताप पाटील हे पंढरपूरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी आल्यावर त्यानी पत्रकारांशी  साधला संवाद

कोकणासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस

Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रात आठवड्याची सुरुवात पावसाने झाली आहे. कोकणासह मराठवाड्यात जोरदार पावसानं सोमवारपासूनच हजेरी लावली आहे. ठाणे, मुंबईसह उपनगरात मंगळवारी पहाटेपासूनच पावसानं हजेरी लावली आहे. तर मंगळवारीही रत्नागिरीत चिपळूण, दापोलीत पावसानं दमदार हजेरी लावली. तर दुसरीकडे मराठवाड्यात औरंगाबाद, बीड भागात मुसळधार पाऊस पडत आहे. बीडमध्ये जोरदार पावासमुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसानं हजेरी लावली आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

नाशिक मनपा निवडणूक मतदार यादीवर 28 हरकती दाखल, 74 नागरिकांकडून मतदार यादीची खरेदी

आगामी नाशिक महापालिका निवडणूक (Nashik Municipal Election) मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासून आतापर्यंत 28 हरकती दाखल झाल्या असून सर्वाधिक हरकती या नवीन नाशिक या विभागातून करण्यात आल्या आहेत. तर अद्यापही 01 जुलैपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. नाशिक महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली असून त्या संदर्भातील मतदार याद्या 23 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. सदर मतदार याद्या प्रसिध्द केल्यानंतर नागरिकांनी हरकती आणि सूचना नोंदवण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले होते. त्यानुसार आजपर्यंत एकूण 28 हरकती महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्याची माहिती महापालिकेचे प्रशासन उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस

अकोला जिल्ह्यात रात्री सर्वदूर जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे गांधीग्राम येथील पुर्णा नदीच्या पुलावर पाणी आल्यानं लोणाग्रा-आगर रस्त्यावरील बांधकाम सुरू असलेल्या छोट्या पुलावरील भराव वाहून गेला. बाळापूर तालूक्यातील मांजरी गावात पुराचं पाणी अनेक घरांत घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.






 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


महाविकास आघाडी सरकारविरोधात कधीही अविश्वास प्रस्ताव येऊ शकतो


सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आता महाविकास आघाडी सरकारविरोधात कधीही अविश्वास प्रस्ताव येऊ शकतो. राज्यपाल स्वतः उपसभापतींना ठराविक मर्यादेत बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश देऊ शकतात. महाविकास आघाडीला सध्या सर्वाधिक 116 आमदारांचा पाठिंबा आहे, तर शिंदे गटाचे आमदार मतदानाला गैरहजर राहिले तरी भाजपकडे 128 आमदारांचा पाठिंबा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशाने ठाकरे सरकारचा पराभव निश्चित झाल्याचे भाजपच्या सूत्रांचे मत आहे. 


गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसन ब्लूचे बुकिंग 5 जुलै पर्यंत वाढ


गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसन ब्लूचे बुकिंग 30 ते 5 जुलैपर्यंत वाढवण्यात आले आहे. गरज भासल्यास बुकिंगची तारीख आणखी वाढवण्यात येईल.  


भाजपच्या आमदारांना मुंबईत थांबण्याच्या सूचना


भाजपने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत राहण्यास सांगितले असून, येत्या एक-दोन दिवसांत रणनीती ठरवली जाईल.


संजय राऊत यांना आज ईडीसमोर हजर राहावे लागणार


शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना आज ईडीसोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. परंतु, संजय राऊत आज ईडीसमोर हजर राहणार नाहीत. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी  ईडीने संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. ईडीने आज सकाळी 11 वाजता संजय राऊत यांना हजर होण्यास सांगितले आहे.  मात्र, संजय राऊत यांनी सांगितले की, अलिबागला जाण्यासाठी मीटिंग असल्याने मंगळवारी आपण ईडीसमोर जाऊ शकत नाही. त्यामुळे ईडीकडून संजय राऊत हे दुसरी वेळ मागून घेऊ शकतात. 


उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आंदोलनं, सभा, बैठका 
 
उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यात विविथ समर्थन रॅली काढण्यात येत आहेत. काल कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे एका शिवसैनिकाला राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावर यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. याचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता आहे.  


आम्ही सध्यातरी 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत, भाजपच्या बैठकीनंतर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया


महाराष्ट्रातल्या राजकीय सत्तासंघर्षाचा  फायदा उचलून भाजप(BJP) बंडखोर आमदारांसोबत सत्तास्थापन करेल अशी चर्चा सुरु असताना याबाबत भाजपच्या कोअर कमिटीत नेमका काय निर्णय झाला, याबद्दल भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप सध्यातरी वेट अँड वॉच या भूमिकेत असून अद्याप सरकार स्थापनेचा किंवा कोणत्या पक्षासोबत जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच शिंदे गटाकडून कोणताही प्रस्ताव भाजपला आला नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. नुकत्याच झालेल्या भाजपच्या कोअर कमिटी बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार बोलत होते. 


आजपासून जीएसटी परिषदेची बैठक   


जीएसटी परिषदेची बैठक आजपासून सुरू होत आहे. चंदीगडमध्ये होणाऱ्या बैठकीत काही वस्तूंच्या करातील दर बदलले जाऊ शकतात. याशिवाय, राज्यांना नुकसानभरपाई प्रणाली आणि छोट्या ई-कॉमर्स पुरवठादारांच्या नोंदणी नियमांमध्ये दिलासा, या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली GST परिषदेची 47 वी बैठक 28-29 जून रोजी होणार आहे. सहा महिन्यांनी परिषदेची बैठक होत आहे.


पंतप्रधान मोदी आज संयुक्त अरब अमिराती दौऱ्यावर


UAE- G7 शिखर परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर पंतप्रधान मोदी आज संयुक्त अरब अमिराती (UAE) दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे ते संयुक्त राष्ट्राचे माजी अध्यक्ष महामहिम शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांच्या निधनाबद्दल वैयक्तिक शोक व्यक्त करतील.  


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा देशव्यापी प्रचार आजपासून सुरू होणार आहे. 


भारत आणि आयर्लंड  यांच्यात दुसरा टी20 सामना


भारत आणि आयर्लंड  यांच्यात पहिला टी20 सामना भारताने जिंकल्यानंतर आज दुसरा सामना पार पडणार आहे. 


हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता


बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातचा काही भाग, राजस्थान, मध्य प्रदेशचा उर्वरित भाग आणि उत्तराखंडमध्ये येत्या 2 ते 3 दिवसांत मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. 
पुढील 24 तासांत, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, कोकण आणि गोवा,  गुजरातच्या काही भागात हलक्या ते मध्यम पावसासह मुसळधार पाऊस पडू शकतो, असा  हवामान विभागाचा अंदाज आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.