Maharashtra Breaking News 24 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Aug 2022 09:31 PM
Supreme Court : सुप्रीम कोर्टात उद्याच्या सुनावणीबद्दल पुन्हा अनिश्चितता

Supreme Court : सुप्रीम कोर्टात उद्याच्या सुनावणीबद्दल पुन्हा अनिश्चितता आहे. आत्तापर्यंत कामकाजाच्या दोन लिस्टमध्ये उद्या महाराष्ट्राचं प्रकरण समाविष्ट नाही. आता उद्या सकाळी ऐनवेळी हे प्रकरण सुनावणीस येणार का याची प्रतीक्षा आहे. उद्या पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ गठीत होऊन निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबद्दल निर्णय देणे अपेक्षित होतं पण अद्याप या घटनापीठाची रचना नाही

Nashik News : नाशिक महानगरपालिका वाजविणार ढोल, 15 सप्टेंबरपासून मनपाच्या वसुली मोहिमेला होणार सुरूवात

Nashik News : नाशिक महापालिकाच्या थकबाकीदाराच्या घरासमोर ढोल वाजवून वसुली करणार आहे. 15 सप्टेंबरपासून मनपाच्या वसुली मोहिमेला सुरूवात होणार आहे. 3245 बड्या थकबाकीदारच्या घरासमोर ढोल वाजवून वसुली होणार आहे. उत्पन्न वाढीसाठी महापालिकेनी ही मोहीम सुरू केली आहे. कोरोनानंतर मनपाची घरपट्टी, पाणीपट्टीची थकबाकी शेकडो कोटींच्या घरात गेल्यानं मनपा वसुली मोहिम राबविणार आहे.

आरबीआयनं द मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेवरील निर्बंध पुन्हा 3 महिने वाढवले

आरबीआयनं द मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेवरील निर्बंध पुन्हा 3 महिने वाढवले आहेत. आरबीआयनं आपल्या अखत्यारीत येणाऱ्या कलम 35 अ च्या अंतर्गत येणाऱ्या अधिकारांचा वापर करत बॅंकेला आर्थिक स्थिती सुधारण्याचे सांगितले आहे. मात्र आर्थिक स्थिती न स्थिरावल्यानं बॅंकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 च्या कलम 56 अंतर्गत 24 नोव्हेंबर 2021 पासून बॅंकेचा व्यवसाय बंद केला होता. बॅंकेला आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वेळोवेळी वेळ देण्यात येत आहे, ज्यात पुन्हा तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आलाय. 


24 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा एकदा आर्थिक स्थिती सुधारण्याचे बॅंकेला निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, बॅंकेवर निर्बंध जरी असले तरी बॅंकेचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही, त्यामुळे निर्बंधांसोबत बॅंक व्यवहार करु शकते. ज्यात ठेवी काढणे किंवा स्विकारण्यावर बॅंकेला मर्यादा आहे. 

मुंबईतील ललित हॉटेल उडवून देण्याची धमकी देणाऱ्या दोन आरोपीला अटक

मुंबईतील प्रसिद्ध ललित हॉटेल उडवून देण्याची धमकी देऊन पाच कोटींची मागणी करणाऱ्या दोन आरोपीलाला सहार पोलिसांनी अटक केली आहे. धमकी देणाऱ्याला मुंबई सहार पोलिसांनी गुजरात-वलसाड येथून अटक केली. तर या मुख्य आरोपीला सिम कार्ड पुरवणारा दुसरा आरोपीला वापी मधून अटक केली आहे. 


 


 

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा

राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण हे शुक्रवार,‍ दि.26 ऑगस्ट 2022 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. 


सकाळी 7 वाजता पनवेल येथे आगमन व मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्ती कामाची पाहणी. सकाळी 8:45 वाजता कासू, जि.रायगड येथे आगमन व मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्ती कामाची पाहणी. सकाळी 9:45 वाजता नागोठणे, जि.रायगड येथे आगमन व मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्ती कामाची पाहणी. सकाळी 11:15 वाजता वाकड फाटा येथे आगमन व मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्ती कामाची पाहणी. दुपारी 12:30 वाजता खांब, जि.रायगड येथे आगमन व मुंबई-गोवा महामार्गाची दुरुस्ती कामाची पाहणी. दुपारी 1:30 वाजता वरसगाव फाटा, जि.रायगड येथे आगमन व मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्ती कामाची पाहणी. दुपारी 2 ते 2:30 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3:30 वाजता इंदापूर, जि.रायगड येथे आगमन व मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्ती कामाची पाहणी व त्यानंतर रत्नागिरीकडे प्रयाण.

परमबीर सिंह यांच्याशी संबंधित खंडणी प्रकरणातील खटल्याला स्थगिती देण्याची विनंती कोर्टानं स्वीकारली

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी संबंधित खंडणी प्रकरणातील खटल्याला स्थगिती देण्याची विनंती कोर्टानं स्वीकारली आहे. यासाठीचा  सीबीआयनं मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात अर्ज केला होता. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानंतर हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. 


माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, बांधकाम व्यावसायिक संजय पुनमिया, निरीक्षक नंदकुमार गोपाळे, आशा कोरके आणि व्यापारी सुनील जैन यांच्याविरोधात 15 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र मार्चमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर परबीर यांच्याविरोधातील इतर केसेससह हे प्रकरणही सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं होतं. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एम.आर.ए. शेख यांनी हा अर्ज अखेर मंजूर केला. श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे.

सीएसएमटी-बदलापूर एसी लोकल गुरुवारपासून रद्द

सीएसएमटी-बदलापूर एसी लोकल गुरुवारपासून रद्द करण्यात आली आहे, प्रवाशांच्या आंदोलनाला 3 दिवसानंतर यश

Solapur News : शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर, सोलापूर जिल्हाप्रमुख म्हणून मनिष काळजे, अमोल शिंदे यांची नियुक्ती

Solapur News :  शिंदे गटाच्या बंड आणि राज्यात सत्तास्थापननंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या घोषित करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा प्रमुख म्हणून मनिष काळजे, अमोल शिंदे यांची नियुक्ती तर सोलापूर शहर प्रमुख म्हणून मनोज शेजवाल यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यया आदेशानुसार एक वर्षासाठी नियुक्ती करत असल्याचे स्थानिक नेत्यांना पत्र देण्यात आले आहे. 



Pune : चोरीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेल्या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू

रेल्वे पोलिसांनी तरुणाला चोरीच्या संशयावरून पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना पुणे रेल्वे स्टेशनला घडली आहे. नागेश पवार असं त्या मृत 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याच्या वडिलांना आणि त्याला चोरीच्या गुन्ह्याखाली 15 ऑगस्टला अटक केली आणि न्यायालयाने सहा दिवसाची पिसीआर दिला होता. आता पोलीस कोठडीत असताना नगेशचा मृत्यू झाला आहे. पुणे ससून रुग्णालयात त्याचा मृतदेह आणला आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर अट्रोसिटी ॲक्ट 302 अंतर्गत कार्यवाही झाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबाने घेतली आहे. 

Mumbai Crime : 50 लाखाची रोख रक्कम आणि दागिने चोरी करणाऱ्या नोकरास 24 तासात अटक

खार पश्चिमेला राहणारे गांधी कुटुंबीय परिवारासोबत कौटुंबिक कार्यक्रमासाठी उदयपूर येथे गेले असताना त्यांचा नोकर राहूल कामत याने घरातील 50 लाख रुपये आणि दागिन्यांवर डल्ला मारून फरार झाला. गांधी कुटुंबीय मुंबईत परत आल्यानंतर चोरीची घटना निदर्शनास आली.यानंतर खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर खार पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला भुसावळ येथून अटक केली. चोरी गेलेले दागिने आणि 50 लाख रुपये आहे.पोलिसांनी आरोपीकडून सर्व हस्तगत केले असून खार पोलीस पुढील तपास करत आहेत.

Rahul Shewale : सावरकरांवर आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या महिलेविरोधात कारवाई करा; राहुल शेवाळे यांची केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांकडे मागणी

भारतीय स्वातंत्र्यासाठी जुलमी इंग्रजी राजवटीविरोधात लढलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी एका महिलेने केलेल्या आक्षेपार्ह ट्वीट प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सदर महिलेविरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना लोकसभा गटनेते, खासदार राहुल शेवाळे यांनी गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी संबधित यंत्रणांना आदेश देऊन हे आक्षेपार्ह ट्वीट त्वरित हटवण्याची मागणीही खासदार शेवाळे यांनी केली आहे. गृह राज्यमंत्र्यांची भेट घेऊन सादर केलेल्या निवेदनात खासदार शेवाळे यांनी ही मागणी केली आहे.

शहापूर - शेणवे मार्गावर भरधाव दुचाक्यांची समोरासमोर जोरदार धडक; अपघात एकाचा मृत्यू

Thane Accident :  शहापूर तालुक्यातील  शहापूर - शेणवे मार्गावरील  धसई गावाजवळ दोन भरधाव जाणाऱ्या दुचाकींमध्ये  समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील एक चालकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील चालक गंभीर जखमी झाला आहे. राहुल काशिनाथ विशे (वय 25) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.  


 

दोन महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट उद्यापासून वाहतुकीस 24 तास राहणार खुला
दोन महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट उद्यापासून  वाहतुकीस 24 तास खुला राहणार.

 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याप्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दरड प्रवण क्षेत्र असल्यामुळे परशुराम घाटातील वाहतूक रात्रीची होती बंद होती. मंत्री उदय सामंत यांच्या सुचनेनंतर प्रशासनाने परशुराम घाटाची पाहणी करत घाट 24 तास खुला करण्याचा घेतला निर्णय.

 

 
युती सरकारच्या येत्या मंत्रीमंडळ विस्तारात आठवले गटाला एक मंत्रीपद देण्याचे फडणवीस यांचे आश्वासन, रामदास आठवले यांची माहिती

Ramdas Athwale : युती सरकारच्या येत्या मंत्रीमंडळ विस्तारात आठवले गटाला एक मंत्रीपद देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले असल्याचे केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांने सांगितले. तसेच काही महामंडळाचे अध्यक्षपद आणि सदस्य पद देण्याचेही फडणवीसांनी आश्वासन दिले असल्याचे आठवले यांनी सांगितले. ते वांद्रे येथे आदिवासी कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी बोलत होते 

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचा दोषमुक्तीसाठी मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात अर्ज

Mumbai News : पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचा दोषमुक्तीसाठी अर्ज


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला या प्रकरणी झाली होती अटक


मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केला अर्ज, लवकरच सुनावणी अपेक्षित


मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने राज कुंद्रासह त्याच्या कंपनीचा माहिती- तंत्रज्ञान प्रमुख रायन थोर्प यालाही याप्रकरणी गेल्या वर्षी जुलै महिन्यात झाली होती अटक

साहित्य अकादमीच्या 'बाल साहित्य पुरस्कारां'ची घोषणा, मराठी भाषेसाठी लेखिका संगीता बर्वे यांच्या पियूची वही या कादंबरीस साहित्य अकादमीचा वर्ष 2022 साठी बाल साहित्यपुरस्कार आज जाहीर

साहित्य अकादमीच्या 'बाल साहित्य पुरस्कारां'ची घोषणा, मराठी भाषेसाठी लेखिका संगीता बर्वे यांच्या पियूची वही या कादंबरीस साहित्य अकादमीचा वर्ष 2022 साठी बालसाहित्यपुरस्कार आज जाहीर झाला आहे. 


देशातील एकूण २२ भाषांसाठी पुरस्कार जाहीर.

Igatpuri News : मोठी बातमी! इगतपुरीत विषबाधा झाल्याने दोन मतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू

Igatpuri News : इगतपुरी येथील मतिमंद विद्यार्थ्यांच्या आश्रम शाळेत उलट्या होऊन दोन मतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर इतर चार जण गंभीर जखमी असून त्यांना इगतपुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे इगतपुरीसह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

ED : ईडीला कोर्टाचा मोठा दणका, पीएमएलए प्रकरणातून दोन आरोपींची दोषमुक्ती

ED : ईडीला कोर्टाचा मोठा दणका. पीएमएलए प्रकरणातून दोन आरोपींची दोषमुक्ती


ओमकार ग्रुपच्या बाबूलाल वर्मा आणि कमलकांत गुप्ता यांचा दोषमुक्तीचा अर्ज मान्य


मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाचा निर्णय


सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निकालाच्या आधारावर दोघांना काही दिवसांपूर्वीच मंजूर झाला होता जामीन

पतीच्या आत्महत्या प्रकरणी पत्नीवर गुन्हा दाखल, बीडमधील माजलगावातील घटना
Beed News : बीडच्या माजलगाव शहरामध्ये एका 25 वर्षीय तरुणाने बायकोच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी आता मृत तरुणाच्या पत्नी विरोधात माजलगावात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश सुरेश मुळे (वय 25 वर्ष) असं या तरुणाचा नाव असून त्यांन उजव्या कालव्यात एका लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांने एक व्हिडीओ तयार केला होता आणि मी माझ्या पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्याने या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं.
गणेशोत्सवाच्या काळात बीड जिल्ह्यात शांतता राहावी म्हणून दोन हजार गुन्हेगारांवर हद्दपारची कारवाई
Beed News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा पोलीस दल अलर्ट झालं असून या काळात शांतता राहावी यासाठी बीड जिल्ह्यात यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या तब्बल 2 हजार  गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. या गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली जाणार असून गणेशोत्सवाच्या काळात जे कोणी नियम मोडतील त्यांच्यावर देखील थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश बीडच्या पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. यावर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार असून गणेश मंडळांनी कोणाकडूनही आग्रह धरुन किंवा बळजबरीने वर्गणी जमा करु नये, अशा सूचना देखील बीडच्या पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत.
Traffic Updates: गणेशोत्सवानिमित्त मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीवर निर्बंध; 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान अवजड वाहतूक बंद

Traffic Updates: गणेशोत्सवानिमित्त  मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.. 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान अवजड वाहतूक बंद राहणार आहे. 

Maharashtra Monsoon Assembly Session : आज पाचव्या दिवशी संघर्ष तीव्र होणार! आतापर्यंत काय काय घडलं?

Maharashtra Monsoon Assembly Session : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) 17 ऑगस्टपासून सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. काल शेतकऱ्यांच्या मदतीसह वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. आता अधिवेशनाचे केवळ दोनच दिवस उरले आहेत. या दोन दिवसात सत्ताधारी कामकाज उरकून घेण्याच्या प्रयत्नात असेल तर विरोधक आपल्या मागण्यांवरुन आक्रमक होण्याची चिन्हं आहेत.  17 आणि 18 ऑगस्ट रोजी दोन दिवस कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या होत्या. त्यानंतर काल चौथ्या दिवशी अधिवेशनात बरंच काही घडलं. आज पाचवा दिवस असून उद्या अधिवेशनाची सांगता होणार आहे.  हे शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आहे. आज अधिवेशनात राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, रस्त्यांची दुरावस्था, राज्यातील कायदा सुव्यवस्था यासह अन्य मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Petrol-Diesel Price : तुमच्या शहरांतील दर झटपट चेक करा

Petrol-Diesel Price Today 24th August 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत आहेत. असं असलं तरीही देशांतर्गत बाजारात मात्र पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) मात्र स्थिर आहेत. महाराष्ट्राव्यतिरिक्त देशातील इतर राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये 22 मेपासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 22 मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) दरांवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. तेव्हापासून देशात पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल 7 रुपये प्रति लिटरनं स्वस्त झालं आहे. आज सलग 94व्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. 


राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकारनं 14 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपयांची कपात केली होती. तेव्हापासून राज्यातही पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. राज्यात गेल्या 41 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. असं असलं तरीही देशासह राज्यांत अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बदलापुरात आदिवासी मुलीवर बलात्कार करुन गर्भपात करण्याचा प्रयत्न; दोघांना अटक, तर मुख्य आरोपी पसार

Badlapur News : एका आदिवासी तरुणीवर बलात्कार करुन तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कुळगांव बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. शमशाद अन्सारी आणि पीडित तरुणी हे एकाच कारखान्यात कामाला होते. याच दरम्यान पीडित तरुणीच्या जेवणात गुंगीचा औषध मिसळून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या अन्सारी यांनी तिच्यावर अत्याचार केले. दरम्यान अत्याचाराचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत तो पीडित तरुणीवर चार महिने अत्याचार करत होता. यानंतर गर्भवती राहिल्याने अन्सार याचे मित्र सागर कदम आणि मुकेश दिनगर यांनी तिचा रुग्णालयात येऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. या संबंधीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बलात्कार, गर्भपात करण्याचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. सध्या मुख्य आरोपी अन्सारी हा अजूनही फरार आहे, तर गर्भपात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Baramati News : बारामती शहरातील एका महीलेचा पुण्यात H1N1 स्वाईन फ्ल्युमुळे मृत्यू

Baramati News : बारामती शहरातील 52 वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लू (H1N1) ने पुण्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 4 ऑगस्ट रोजी या महिलेचा मृत्यू पुण्यातील केईएम रुग्णालयात झाला आहे. पंधरा दिवस उलटून देखील, प्रशासनाने ही माहिती अंधारात का ठेवली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बारामती शहरातील अशोकनगर येथे राहणाऱ्या महिलेला 25 जुलै पासून सर्दी, पडसे, खोकला, अंगदुखी याचा त्रास सुरू होता. संबंधित महिलेला त्रास होण्याआधी ती महिला 23 जुलैला महाबळेश्वरला फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्या महिलेला संसर्ग झाला असावा अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी सांगितले. त्यानंतर  महीलेने बारामती शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी विविध तपासण्या देखील केल्या होत्या.  खाजगी डॉक्टरांमार्फत या महिलेला औषधे देखील सुरू करण्यात आली होती. त्यानंतर या महिलेला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने, बारामती शहरात स्वाइन फ्लूची तपासणी नसल्याने, पुणे येथील केईम हॉस्पिटल मध्ये स्वाईन फ्लू ची तपासणी केली असता,  तीन ऑगस्ट रोजी स्वाइन फ्लूची तपासणी पॉझिटिव्ह आली. या महिलेवर केईम हॉस्पिटलमध्ये आयसीयुमध्ये उपचार सुरू होते. परंतु, याच दरम्यान चार ऑगस्ट रोजी या महिलेचा मृत्यू झाला आहे. सध्या बारामती शहरात एकही स्वाइन फ्लूचा रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी दिली. 

Prophet Muhammad Row : भाजप आमदार टी. राजा यांची जामीनावर सुटका

Prophet Muhammad Row : इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हैदराबादमधील आमदार टी. राजा सिंह (MLA T Raja Singh)  यांना न्यायालयाने जामीन मंजूर करण्यात आला. त्यांना तात्काळ सोडण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले होते. त्यानंतर पोलिसांकडून टी. राजा यांना सोडून देण्यात आलं. तेलंगणा पोलिसांनी काल (मंगळवारी) टी. राजा यांना अटक केली होती. त्यानंतर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पक्षानं त्यांना निलंबित केलं. यासोबतच त्यांची पक्षातून हकालपट्टी का करू नये, अशी विचारणा करत पक्षानं त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.


दरम्यान, त्याच्या अटकेची मागणी करत हैदराबादमध्ये अनेकांनी धरणं आंदोलन केल्यावर वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरण चर्चेत आलं. या प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर सिंह यांना आधी ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर अटक करण्यात आली.

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..











सर्वोच्च न्यायालयात आरे कारशेड प्रकरणी सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात आज आरे कारशेड प्रकरणी सुनावणी होणार आहे. एकूणच कारशेड प्रकरणातील याचिका निकालात निघण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती उदय लळित यांच्या खंडपीठासमोर याचिका आहे. आरे कारशेड परिसरातील काम थांबवावे आणि वृक्षतोड न होण्यासाठी याचिका दाखल आहे. याआधी प्रकरण 10 ऑगस्ट रोजी लिस्ट झालं होतं. मात्र वेळेअभावी सुनावणी झाली नव्हती. आज सकाळी 11.30 पर्यंत सुनावणी सुरु होऊ शकते. पर्यावरणप्रेमींकडून ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन आणि प्रशांत भूषण याचिकाकर्त्यांची बाजू मांडतील.










औरंगाबादमध्ये ख्रिश्चन महासंघाचं भोंदूबाबाच्या बातमीविरोधात आंदोलन
एबीपी माझानं औरंगाबादमधील ख्रिश्चन बाबाचा भोंदूपणा उजेडात आणला होता. या बातमीनंतर भोंदूबाबा बाबासाहेब शिंदेवर कारवाई करण्याची मागणी होत होती. याचा निषेध करण्यासाठी ख्रिश्चन महासंघाच्या वतीनं आज आंदोलन करण्यात येणार आहे.


समर्थांच्या मंदिरातील चोरी प्रकरणी गावकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन
जालन्यातील जांब समर्थ येथे श्रीराम मंदिरात झालेल्या मूर्ती चोरी प्रकरणी निषेध म्हणून ग्रामस्थ सकाळपासून संध्याकाळपर्यत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. पोलीसांनी लवकरात लवकर आमच्या मूर्तीचा शोध लावावा असे अवाहन गावकऱ्यांनी केलंय.


पंतप्रधान मोदी बुधवारी हरियाणा आणि पंजाब दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा आणि पंजाबचा दौरा करणार आहेत. त्या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते दोन महत्त्वाच्या आरोग्य उपक्रमांचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 11 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते हरियाणातील फरिदाबाद येथे अमृता रुग्णालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोहालीला जातील आणि दुपारी 02:15 वाजता मुल्लानपूर, न्यू चंदीगड, साहिबजादा अजितसिंग नगर जिल्हा (मोहाली) येथे ‘होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र’ राष्ट्राला समर्पित करतील.


आज बिहारमध्ये नव्या सरकारची बहुमत चाचणी 
बिहारमध्ये नितीश कुमार यांनी राजकीय भूंकप घडवत भाजपला धक्का दिला. त्यानंतर राष्ट्रीय जनता दलासबोत सत्ता स्थापन केली. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता या महागठबंधनच्या सरकारसमोर सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचं आवाहन आहे. आज आणि उद्या विधीमंडळाचे अधिवेशन होणार आहे. आज नवीन सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.