Maharashtra Breaking News 12 September 2022 : पुण्यातील भिडे पुलावरील वाहतूक 13 आणि 14 सप्टेंबर या दोन दिवशी बंद राहणार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत... हे खरं असलं तरी... पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक
राज्य मंत्रिमंडळाची आज अकरा वाजता मंत्रालयात बैठक आहे. गणेशोत्सवामुळे तब्बल दोन आठवडे मंत्रिमंडळ बैठक होऊ शकली नव्हती. द्याच्या बैठकीमध्ये राज्य पुनर्वसन धोरणाला मंजुरी मिळणार आहे. तळेगाव दुर्घटना, माळीन दुर्घटना, तीवरे धरण फुटल्यानंतर मदत कशी करायची हा प्रश्न प्रशासनासमोर पडला होता. त्यानंतर समिती गठीत करून पुनर्वसन धोरण राज्याचे नवीन निश्चित केल आहे. त्याला उद्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता मिळणार आहे
आज कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र झाले आहे. त्यामुळं पुढील पाच दिवसात महाराष्ट्रातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह आज आणि उद्या सर्वत्र पाऊस होणार आहे. मराठवाड्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे.
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांच्यावर आज अंत्यसंस्कार
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचं निधन झालंय. मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यात गोटेगाव जवळील झोटेश्वर धाम येथे वयाच्या 99 व्या वर्षी स्वामी स्वरूपानंद यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू अशी त्यांची ओळख होती. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे देश-विदेशात भक्त आहेत. शंकाराचार्य यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने सत्ता काबिज केल्यानंतर आता आपला मोर्चा अन्य राज्यांकडे वळवला आहे. दुसऱ्या राज्यात पक्षाचे स्थान बळकट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत.
बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट असोसिएशनशी संबंधित आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट असोसिएशनशी संबंधित आज (12 सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. बीसीसीआयनं त्यांच्या घटनेत दुरूस्ती करावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेच्या निकालावर विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शहा यांचा कार्यकाळ वाढणार की त्यांना पायउतार व्हावं लागणार? याबाबत निर्णय होईल
वैभववाडीत विजेचा धक्का लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू
सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे मेहबूबनगर मध्ये विजेचा धक्का लागून 15 वर्षीय शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. शाहीदरजा फरास हा आपल्या मामाच्या घरी आला होता. त्यावेळी ही घटना घडली.
Pune News : पुण्यातील भिडे पुलावरील वाहतूक 13 आणि 14 सप्टेंबर या दोन दिवशी बंद राहणार
Pune News : डेक्कन भागातील मेट्रो स्टेशन पर्यंत जाणाऱ्या पादचारी मार्गाचे काम करण्यासाठी भिडे पुलावरील वाहतुक बंद ठेवण्यात येणार. भिडे पुला एवजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याची सुचना पोलिसांकडून करण्यात आलीय. पुण्यातील डेक्कन भागातुन पेठांमधे जाण्यासाठी मुठा नदीवर बांधण्यात आलेल्या भिडे पुलाचा पुणेकर वापर करतात.
यवतमाळ : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचा बैलबंडी मोर्चा
यवतमाळ : यवतमाळच्या दारव्हात काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बैलबंडी मोर्चा एसडीओ कार्यालयावर धडकला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून निघाल्या, खरीप हंगाम वाया गेला तरीदेखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा, गॅस सिलेंडर, इंधन दरवाढ त्वरीत कमी करण्यात यावी, घरकुल योजनेच्या जाचक अटी रद्द कराव्या, दारव्हा शहरातील प्रलंबित नळपाणी पुरवठा योजना त्वरित सुरू करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
Eknath Shinde : मुंबईत मराठी माणसे किती उरली? याची माहिती रोखठोकमधून द्यावी, एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना खुलं चॅलेंज
Eknath Shinde : मुंबईत मराठी माणसे किती राहिली? याची माहिती रोखठोकमध्ये द्यावी, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना खुलं चॅलेंज दिले आहेत. निवडणूक आली की, मराठीचा मुद्दा पुढे करणे हे त्यांचे काम आहे.
Mumbai Pune Expressway Accident : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात नऊ वाहनांचा विचित्र अपघात
Mumbai Pune Expressway Accident : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात नऊ वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने पुढे जाणाऱ्या वाहनांना धडक दिली आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला असून एसटी बस , ट्रक, आणि 7 कारचा अपघात झाला आहे. दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी झाली असून सुदैवाने या अपघातात कुणीही गंभीर जखमी नाही.