Maharashtra Corona Guidelines: महाराष्ट्रात संपूर्ण नाही मात्र विकेंड लॉकडाऊन, उद्यापासून कडक निर्बंध! काय सुरु, काय बंद?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन केला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र 30 एप्रिलपर्यंत काही कडक निर्बंध आणले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. लॉकडाऊन नसला तरी नियम मात्र कडक केले आहेत.
Maharashtra Lockdown: राज्यात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन केला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र 30 एप्रिलपर्यंत काही कडक निर्बंध आणले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. लॉकडाऊन नसला तरी नियम मात्र कडक केले जाणार आहेत. मंत्री नवाब मलिकांनी सांगितलं की, कोरोनाला रोखण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले. काही कडक निर्बंध राज्यात घालण्यात आले आहेत. शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. तसेच नाईट कर्फ्यू देखील लागू असेल असं त्यांनी सांगितलं.
काय सुरु, काय बंद
- शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊन
- लोकल ट्रेन सुरू राहणार
- जिम बंद होणार
- अत्यावश्यक सेवांना परवनगी
- रेस्टॉरंट, मॉल टेक अवे सर्व्हिस सुरु राहणार
- अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच गाडी चालण्याची परवानगी
- रात्री केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
- धार्मिक स्थळांवर निर्बंध असतील
- सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णत: बंद
- गार्डन, मैदाने बंद
- जिथे केसेस वाढतायेत तेथील निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला
- सिनेमा, मालिकांचे शुटींग मोठ्या संख्येनं करता येणार नाही
- रिक्षा- ड्रायव्हर + 2 लोक
- बसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईल
- टॅक्सीत मास्क घालावा
- कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या सूचना
- मंत्रालय, महत्वाचे ठिकाणी व्हिजिटर्स बंदी
- चित्रपट शूटिंगला परवानगी आहे, पण गर्दी करू नये, लढाई, आंदोलन असे सीन असतील त्या शूटिंगला बंदी
- बाजारपेठांमध्ये मर्यादित संख्येनं सोडलं जाईल
- शाळा कॉलेज बंद, इंडस्ट्री चालू राहतील
- प्रतिबंधित क्षेत्र तयार करा
- सोसायटीच्या बाहेर बोर्ड लावायचा अन्यथा दंड आकारणार
- 20 लोकांना अंत्यविधींसाठी परवानगी
- लग्नसमारंभांबाबत लोकांची संख्या मर्यादित
- विमान प्रवासाबाबत कोणतेही बदल नाहीत मात्र, टेस्टिंग कडक करणार
गेल्या काही दिवसांपासून रोज 40 हजारांच्या वर रुग्ण समोर येत आहेत. आधीपासूनच राज्यातील पुण्यासह अनेक शहरांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे. आज लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संवादात येत्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं.
Maharashtra New Corona Guidelines: ..तर राज्यात लॉकडाऊन लागणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्र्यांनी केला राज ठाकरे, देवेंद्र फडणवीसांशी संवाद
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांशी चर्चा केली. त्यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी देखील चर्चा केली. राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना फोनवरील संवादात केलं. तर राज्यातील वाढती कोरोना परिस्थिती पाहता काल मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. राज्यातील कोरोना स्थिती पाहता कडक निर्बंध लावावे लागतील याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. मुख्यमंत्र्यांनी सरकार जे निर्णय घेतील त्याबाबत विरोधी पक्षांकडून सहकार्य मागितले होते. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांचे उद्योग जगताला आवाहन
वाढता कोविड प्रादुर्भाव पहाता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत, प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती त्यांनी करावी, जिथे वर्क फ्रॉम होम करणे शक्य आहे तिथे ते केले जावे, जो कामगार कोविड बाधित होईल त्या कामगाराच्या भले ही तो कंत्राटी कामगार असेल त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांची रोजीरोटी चालू राहील याची काळजी घ्यावी असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड विरोधात लढतांना एका कुटुंबाप्रमाणे आपण एकत्रितरित्या या संकटाला सामोरे जाऊ आणि त्यावर मात करू असे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देतांना उद्योग जगत शासन आणि मुख्यमंत्री यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि राहील अशी ग्वाही उपस्थितांनी दिली. सध्या लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य असल्याने शासन जो निर्णय घेईल त्याला सहकार्य करण्याची उद्योग जगताची तयारी असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
...तर लॉकडाऊन अटळ आहे : मुख्यमंत्री
राज्यात परिस्थिती आणखी बिघडली तर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ पहाता काही दिवसांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येईल, त्यामुळे इच्छा नसताना निर्णय घ्यावा लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते. आपण मधल्या काळात गाफील झालो. आता कोरोनाशी लढताना आपण परिस्थितीत पाय घट्ट रोवून उभे राहुया. विरोधकांना विनंती करतो, की जनतेच्या आरोग्याशी खेळू नका. लॉकडाऊन जाहीर करत नाही, पण मी इशारा देत आहे. दृश्य स्वरुपातील परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय लवकरच घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. महाराष्ट्र राज्य सरकार हे खंबीर आहे. आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू देणार नाही. सर्वांच्या सहकार्याचीच मी अपेक्षा करतो. सणांवरही निर्बंध आणावे लागतील. नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा करत कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी सिद्ध व्हा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी देत राज्यात कठोर निर्बंध लागणार असा इशारा दिला होता.
राज्यात काल पुन्हा विक्रमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात काल तब्बल 49 हजार 447 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. काल नवीन 37821 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2495315 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 401172 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.49% झाले आहे.