Maharashtra Lockdown, Vaccination, Corona Update LIVE : पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश संवेदनशील आपत्तीचे ठिकाण
Maharashtra corona vaccination lockdown updates : लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात, लसीचा साठाच नसल्याने अनेक राज्यांची लसीकरण करण्यास असमर्थता दर्शवली आहे. कोरोना, लसीकरण आणि लॉकडाऊनसंदर्भातील सर्व अपडेट्स या लाईव्ह अपडेटमध्ये....
इतर ठिकाणाहून राज्यात होणारा कोविड-१९ चा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि राज्य मध्ये त्याच्या अंकुश लावण्यासाठी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांना संवेदनशील आपत्तीचे ठिकाण घोषित करण्यात आले आहे.
राज्य सरकार तर्फे जारी एका आदेशात सदर माहिती देण्यात आली असून १८ एप्रिल २०२१ रोजी जाहीर केलेल्या आदेशात असलेल्या ठिकाणांना व्यतिरिक्त हे दोन ठिकाण त्यात सामील असतील. सदर आदेश निघाल्यापासून जोपर्यंत सदर आदेश परत घेतला जात नाही किंवा कोविड-१९ आपत्ती म्हणून अधिसूचित राहते तोपर्यंत हे दोन्ही ठिकाण संवेदनशील उत्पत्ती चे ठिकाण म्हणून ग्राह्य धरण्यात येतील. संवेदनशील ठिकाणांसाठी आतापर्यंत निघालेल्या पत्रकांत यांच्या माध्यमातून ज्या ज्या स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एस ओ पी) घोषित करण्यात आले आहेत ते सर्व एस ओ पी या दोन ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी लागू असेल.
कोविड-19 साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भारतरत्न लता मंगेशकर यांनी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. कोविड-19 विरुद्धच्या लढाईत राज्य शासनाला आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी, कोविड-19 मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केलं आहे.
नांदेड जिल्ह्यातील व शहरातील ज्या मोजक्या रुग्णालयामध्ये कोविड लसीकरण अत्यंत सुरळीतपणे सुरु होते. मात्र त्या रुग्णालयांना गेल्या तीन दिवसांपासून लस पुरवठा झालाच नाही. परिणामी 45 वर्षापुढील अनेक नागरिकांच्या लसीच्या दुसऱ्या डोसचा खोळंबा झाला आहे. राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक मोहीम सरकारी तसेच निमसरकारी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविताना विविध शहरातील निवडक सुसज्ज खासगी व शासकीय रुग्णालयावर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती.ती सशुल्क असली तरी शहरातील अनेक नागरिकांनी शासकीय लसीकरण केंद्रावर जाण्या ऐवजी खाजगी रुग्णालयांना पसंती दर्शवली होती. गेल्या महिन्यात रुग्णालयांना गरजेपेक्षा कमी लस पुरवठा झाला. पण गेल्या तीन दिवसांपासून शहरातील व जिल्ह्यातील रुग्णालयांना लस पुरवठा न झाल्यामुळे एक वेळा लसीकरण केलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांची लस कोंडी झाली आहे. त्यामळे लसीकरण केंद्राबाहेर लस उपलब्ध नसल्याचे बोर्ड सध्या झळकत आहेत. नांदेड शहरातील श्यामनगर, पौर्णिमानगर, जंगमवाडीसह शहरातील अनेक लसीकरण केंद्र लस अभावी बंद पडल्याचे चित्र आहे. लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात केवळ शासकीय रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. शहरातील आणि जिल्ह्यातील हजारों नागरिकांनी या रुग्णालयातून कोवॅक्सिनचा पहिला डोस घेण्यात आला होता. परंतु आता खासगी आणि शासकीय अशा दोन्ही रुग्णालयात लस उपलब्ध नसल्यामुळे दुसऱ्या डोसचं नियोजन कसं करायचं असा प्रश्न रुग्णांसमोर उभा आहे.
सातारा जिल्ह्यात 2383 नवीन कोरनाबाधितांची भर पडली असून 32 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 1,05,664 बाधित आहेत तर आतापर्यंत 2496 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर 82,375 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आला आहे. सध्या रुग्णालयात 20,793 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज मुंबईतील खाजगी लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद आहे. त्यांच्याकडील लसींचा साठा संपल्यामुळे तसेच राज्य सरकारने आता खाजगी लसीकरण केंद्रांना लस पुरवणार नसल्याचे जाहीर केल्याने या केंद्रांवर आता लस उपलब्ध नाही. त्यामुळे मुंबईतील लसीकरणाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या ज्या नागरिकांना शक्य आहे आणि ज्यांना सरकारी लसीकरण केंद्रांवर जायचे नाही असे नागरिक मोठ्या प्रमाणात खाजगी लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेत होते. मात्र आता या खाजगी केंद्रांना थेट लस बनवणाऱ्या कंपन्यांकडे ऑर्डर द्यावी लागेल आणि जेव्हा त्या ऑर्डरच्या लसी येथील त्याच वेळी लसीकरण पुन्हा सुरु होईल. मुंबईच्या पूर्व उपनगरातील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये देखील लस नसल्यामुळे लसीकरण थांबवण्यात आले आहे.
नाशिकच्या इंदिरा गांधी रुग्णालयात गोंधळ झाला आहे. लस मिळत नसल्याने नागरिक आक्रमक झाले असून महापालिका रुग्णालयात पोलिसांना पाचारण करावं लागलं. कोवॅक्सिन लस उपलब्ध नसल्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्यांना लस मिळत नाही. इंदिरा गांधी रुग्णालयात आज केवळ 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.
औरंगाबाद रेमडेसिवीर चोरी प्रकरणी मनपा मुख्य फार्मासिस्ट रगडे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर कंत्राटी पद्धतीवरील सहायक फार्मासिस्ट प्रणाली कोल्हे यांच्या सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले आहे. महापालिका मुख्य प्रशासक आस्तिक पांडे यांनी हे आदेश दिले आहेत. शिवाय गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. मनपाच्या मॉट्रॉन कोविड केअर सेंटरमधून 48 रेमडेसिवीर इंजेक्शन गायब झाले होते.
बीडच्या जिल्हा रुग्णालयातून पुन्हा एकदा एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गुरुवारी (29 एप्रिल) रात्री नऊ वाजता मृत पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह कोविड वॉर्डमध्येच तसाच रॅप करुन ठेवण्यात आला. जवळपास 20 तास हा मृतदेह तिथेच ठेवल्याचं रुग्णांनी सांगितलं. जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग हॉस्टेलमधील कोविड वॉर्डमधील हा प्रकार घडला. हा मृतदेह या ठिकाणीच ठेवल्याने वॉर्डमधील रुग्णही भयभीत झाले होते. तब्बल 20 तासानंतर हा मृतदेह जिल्हा रुग्णालय प्रशासनाने बाहेर काढला.
बुलडाणा : मलकापूर सामान्य रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित, गेल्या 30 मिनिटापासून विद्युत पुरवठा खंडित , रुग्णालयातील जनरेटर नादुरुस्त. रुग्णालयात 33 कोविड रुग्ण भरती, अतिदक्षता विभागात सुद्धा विद्युत पुरवठा नाही, तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांची माहिती
आज राज्यात 69,710 रुग्ण बरे होऊन घरी,62,919 नवीन रुग्णांचे निदान, आज 828 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद
कोविड-19 चाचणी आणि उपचारांची पद्धत सुचवणाऱ्या याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने फटकार लगावली आहे. तुम्ही वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहात आणि डॉक्टरांना कोणत्या औषधांचा वापर करावा याबाबत सल्ला देताय? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाला विचारला. तसंच तुम्हाला दहा लाखांचा दंड ठोठावू, असं म्हटलं. यावर मी बेरोजगार असून माझ्याकडे केवल एक हजार रुपये आहेत, असं याचिकाकर्त्याने सांगितलं. ठीक आहे, तुम्हाला एक हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात येतो, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं.
नाशिक शहरासह जिल्ह्यात जेमतेम आज आणि उद्या पुरेल एवढा लसींचा साठा आहे, मनपा हद्दीत जवळपास 25 ते 30 केंद्रवर लसीकरण सुरू आहे, तर जिल्ह्यात 175 केंद्रावर लसीकरण केले जात आहे, जशी लस संपते तसे केंद्र कमी होत जातात. आज रात्रीपर्यंत पुन्हा लस उपलब्ध होणार आहे, त्यावर उद्याचे लसीकरण अवलंबून आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यासाठी 7 लाख 34 हजार 753 डोस प्राप्त झाले असून 6 लाख 12 हजार 70 पहिला तर 1 लाख 22 हजार 682 जणांना दुसरा डोस देण्यात आलाय.
लॉकडाऊन सुरू असताना नागरिक मंडईमध्ये मोठी गर्दी करतायेत. यावर अंकुश आणण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ग्राहकांना वेळेचं निर्बंध घातलंय. यासाठी मंडईच्या प्रवेशद्वारावर पोलीस तैनात केलेत. ते ग्राहकांना टोकन देतात, त्यावर वेळ नमूद असते, अर्धा तासापेक्षा उशीर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाते
Maharashtra Lockdown, Vaccination. Corona Update : कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र, तरीही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. परिणामी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. ऑक्सिजन, औषधे, इंजेक्शन यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. 'ब्रेक द चेन' अंतर्गत या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले असून राज्यांतर्गत प्रवासासाठी ई पासची गरज लागणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, फक्त अंत्यसंस्कार, मेडिकल इमर्जन्सी आणि अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवास करता येणार, असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे.
Maharashtra Lockdown, Vaccination. Corona Update : महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात 60 हजारांच्यावर नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. राज्यात गुरुवारी तब्बल 66 हजार 159 नवीन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. दिलासायदायक म्हणजे काल नवीन 68 हजार 537 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 3799266 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 670301 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.69% झाले आहे.
मुंबई : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंधाच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजप्रमाणे या घटकांना तात्काळ लाभ द्यावा. केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनांना दिल्या. आज ते कोविड परिस्थितीसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते.
नवी दिल्ली: देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना आता यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. देशात उद्यापासून म्हणजे 1 मे पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होत आहे. या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या वेळी लोकांना जर लस मिळाली नाही, त्यांना केंद्रावरून परत जावं लागलं तर केंद्रीय आरोग्यमंत्री राजीनामा देणार का असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केला आहे. देशात ऑक्सिजन आणि लसींची कोणतीही कमतरता नाही या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या वक्तव्यावर आपण अस्वस्थ असल्याचं पी चिदंबरम यांनी म्हटलंय.
भारत कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. देशातील अनेक राज्यात मेडिकल ऑक्सिजन आणि बेडचा तुटवडा जाणवत आहे. याचदरम्यान भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. कोरोना संकटात मदतीसाठी सैन्याकडून केल्या जात असलेल्या विविध उपाययोजनांवर त्यांच्यात चर्चा झाली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारताच्या मदतीसाठी जगभरातील 40 हून अधिक देश पुढे आले आहेत. येत्या काही दिवसात भारताला परदेशातून 550 ऑक्सिजन जनेरेटिंग प्लांट, 4000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, 10 हजार 000 ऑक्सिजन सिलेंडर आणि 17 क्रायोजेनिक टँकर मिळतील, असं परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी सांगितलं. येत्या काही दिवसात भारताला परदेशातून 550 ऑक्सिजन जनेरेटिंग प्लांट, 4000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, 10 हजार 000 ऑक्सिजन सिलेंडर आणि 17 क्रायोजेनिक टँकर मिळतील, असं शृंगला यांनी सांगितलं.
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला जबाबदार धरलं असून गेल्या 10 ते 15 महिन्यांपासून तुम्ही काय करताय?, असा सवाल विचारत केंद्र सरकारच्या आतापर्यंतच्या भूमिकेवर उच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत. देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे का? या विषयावर कधी तज्ज्ञांशी चर्चा केली होती का?, असा सवालही मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मद्रास उच्च न्यायालयाने एक सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं आहे.
पार्श्वभूमी
देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा नवा विक्रम, एकाच दिवसात चार लाख नव्या रुग्णांची भर तर 3523 जणांचा मृत्यू
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आता रुग्ण संख्येची त्सुनामी येत असल्याचं दिसून येतंय. गेल्या 24 तासात देशात 4,01, 993 नव्या रुग्णांची भर पडली असून 3,523 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी देशात जवळपास तीन लाख रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्या आधी गुरुवारी देशात 3.86 लाख रुग्णांची भर पडली होती. कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जगभरातील एकाच दिवशी वाढणाऱ्या रुग्ण संख्येपैकी 40 टक्के रुग्णसंख्या ही एकट्या भारतात वाढत असल्याचं समोर आलं आहे.
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात, लसीचा साठाच नसल्याने अनेक राज्यांची लसीकरण करण्यास असमर्थता
देशातील कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे. या टप्प्यात 18 ते 45 वर्षामधील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाचे रजिस्ट्रेशन 28 एप्रिलपासून सुरू झालं असून आतापर्यंत 80 लाखांहून अधिक लोकांनी आपल्या नावाची नोंद केली आहे. असं असलं तरी या देशभर राबवण्यात येणाऱ्या या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या कार्यक्रमासमोर काही अडचणी आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगालसहित देशातील 11 राज्यांमध्ये आजपासून या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करता येणं शक्य नसल्याचं त्या राज्यातील सरकारांनी स्पष्ट केलं आहे. लसींची असलेली कमतरता हे यामागचे कारण सांगण्यात येतंय.
अनाथ मुलांना आता 18 ऐवजी 23 वर्षे पूर्ण होईपर्यंत अनाथ आश्रमात राहता येणार, मंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा
राज्यभरातील 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनाथाश्रमातून बाहेर पडणाऱ्या मुलांची व्यथा 'एबीपी माझा'ने दाखवल्यानंतर आता राज्यभरातून मदतीचा ओघ या मुलांसाठी सुरू झाला आहे. एबीपी माझाच्या बातमीची दखल घेऊन महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील अनुरक्षण गृहांमध्ये पात्र मुलांना अनुरक्षण सेवा पुरविण्यासाठी वयाची अट दोन वर्षांनी शिथिल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे या बालकांना अनुरक्षण गृहांमध्ये अधिकची दोन वर्षे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, प्रशिक्षण आदी सुविधा मिळणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -