Hasan Mushrif : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौऱ्याला निघण्यापूर्वी राज्यातील पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केली. यामध्ये बहुतचर्चित बीड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. सीएम देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरचे पालकमंत्रीपद महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आलं आहे. गडचिरोलीचे पालकमंत्रीपद अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवलं आहे.
कोल्हापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सह पालकमंत्री
दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पालकमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा सरकार स्थापन झाल्यापासूनच सुरू होती. ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडेल अशी चर्चा होती. मात्र, शिवसेनेला कोल्हापूरचे पालकमंत्रीपद खेचण्यामध्ये यश मिळालं आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली असून सह पालकमंत्री म्हणून भाजपच्या माधुरी मिसाळ यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सह पालकमंत्री मिळाले आहेत. मुश्रीफ यांनी यापूर्वी अहिल्यानगर आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवलं होतं. मात्र आता त्यांना थेट वाशिमची जबाबदारी मिळाल्याने एक प्रकारे असा कोणता निर्णय घेण्यात आला की त्यांची थेट वाशिमकडे रवानगी करण्यात आली याची चर्चा रंगली आहे. दरम्यान पालकमंत्री पदावरून मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तिन्ही पक्षांनी मिळून घेतलेला हा निर्णय
वाशिमचे पालकमंत्रीपद मिळाले ठीक आहे. तिन्ही पक्षांनी मिळून घेतलेला हा निर्णय आहे. श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे. आता इलाज नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या अधिवेशनाच्या संदर्भाने बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेने निवडणुकीसाठी आणि पक्षाच्या निवडणुकीसाठी हे शिबिर होत आहे. या माध्यमातून कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळत असते.
पुरावे मिळत नाही तोपर्यंत बोलू नये
धनंजय मुंडे यांच्या बाबत बोलताना त्यांनी जोपर्यंत पुरावे मिळत नाही तोपर्यंत बोलू नये असे म्हणत पाठराखण केली. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल, सत्ता असल्याने कार्यकर्त्यांची काम होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्यावरून चर्चा रंगली आहे. या संदर्भात बोलताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, या गोष्टीचे आम्ही यापूर्वीच खंडन केलं आहे. ज्या महिला अपात्र ठरल्या त्या स्वतःहून अर्ज करत आहेत. अटी पहिल्यापासूनच होत्या. अडीच लाख उत्पन्नाची मर्यादा होती. आता महिला स्वतःहून पैसे नको म्हणत आहेत. ज्या महिला देणार नाहीत, त्यांच्याकडून पैसे घेतले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या