मुंबई: अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी रात्री वांद्रे येथील निवासस्थानी घरात शिरलेल्या चोराने जीवघेणा हल्ला केला होता. या चोराने सैफच्या अंगावर धारदार सुऱ्याने सहा वार केले होते. सुऱ्याचे पाते सैफच्या पाठीत रुतून बसले होते. तसेच त्याच्या मानेवर खोल जखम झाली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. सैफ अली खानसारख्या सेलिब्रिटीवर हल्ला झाल्याने मुंबई पोलिसांची अनेक पथकं कामाला लागली होती. पोलिसांनी त्यांच्या खबऱ्यांचे नेटवर्क आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून अक्षरश: सुतावरुन स्वर्ग गाठला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
सैफवरील हल्ल्याची घटना समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने त्याची इमारत आणि आजुबाजू्च्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. मात्र, त्यामधून कोणताही महत्त्वाचा धागा सापडला नव्हता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सैफ अली खानवर हल्ला होण्यापूर्वी 10 ते 15 दिवस आधीचे सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले. हे फुटेज स्कॅन करण्यात आले तेव्हा अंधेरीच्या डीएन नगर परिसरात एक बाईक दिसून आली होती. या बाईकवरुन एका व्यक्तीला ड्रॉप करण्यात आले होते. या व्यक्तीचा चेहरामोहरा हा सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीशी मिळताजुळता असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांना या बाईकची नंबरप्लेट तपासली आणि तिथून याप्रकरणाचे धागेदोरे उलगडत गेले, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफउल इस्लाम शहजाद (वय 30) या व्यक्तीला शनिवारी रात्री ठाण्यातून ताब्यात घेतले. मोहम्मदने सैफच्या घरात चोरीच्या उद्देशाने गेल्याची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याला आता वांद्रे येथील सुट्टीकालीन न्यायालयात हजर करुन त्याची पोलीस कोठडी घेतली जाईल. यानंतर त्याच्या चौकशीतून सैफ अली खानवरील हल्ल्याचा आणखी तपशील समोर येईल, अशी शक्यता आहे.
त्या फोन कॉलमुळे मोहम्मदचं लोकेशन पोलिसांना समजलं
मुंबई पोलिसांकडून सैफवरील हल्लाप्रकरणाचा तपास सुरु असताना आरोपी मोहम्मद शरीफउल इस्लाम शहजाद याने केलेली एक चूक फायदेशीर ठरली. सैफवर हल्ला केल्यानंतर मोहम्मद दादरला गेला, तिथून त्याने हेडफोन विकत घेतले. त्यानंतर तो मध्य रेल्वेच्या दिशेने जाताना दिसला. यानंतर पोलिसांनी या भागातून आरोपीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तपासावेळी आरोपीच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन ठाणे दाखवलं.
सुरुवातील आरोपीकडे मोबाईल फोन नाही, असे पोलिसांना वाटत होतं. कारण त्याचा मोबाईल नंबर सापडत नव्हता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री सापडलेल्या फुटेजमध्ये आरोपी फोनवर बोलताना दिसला. यानंतर पोलिसांनी हल्ल्याच्या रात्री वेळी त्या भागात असलेला मोबाईल फोनचा डेटा काढला. मध्यरात्रीची वेळ असल्याने त्या भागात जास्त लोक नसल्याने मोहम्मदचा मोबाईल नंबर शोधणे पोलिसांसाठी सोपे झाले.
सैफच्या घरातून बाहेर पडल्यावर आरोपीचं कुणासोबत तरी फोनवर संभाषण झालं, त्यानंतर त्याने फोन बंद केला आणि सकाळी दादर रेल्वे स्टेशनला पोहोचल्यावर फोन चालू केला आणि कॉल केला. त्यानंतर पुन्हा आरोपीने फोन बंद केला. यावेळी त्याचे शेवटचे लोकेशन ठाणे होते. यावरुन पोलिसांना आरोपी ठाण्यात लपून बसल्याचा अंदाज आला.
आणखी वाचा