Raigad Guardian Minister : रखडलेल्या पालकमंत्रीपदावर अखेर शिक्कामोर्तब झालंय. काही वादग्रस्त जिल्ह्यात कोणाला पालकमंत्रीपद मिळणार अशा यादीत रायगडचा देखील नंबर होता. चौथ्यांदा निवडून आलेले भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि याआधी पालकमंत्रीपद भूषविलेल्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्यात मागील काही दिवसांपासून पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू होती. अखेर पालकमंत्रीपदाची माळ जिल्ह्यात एकमेव राष्ट्रवादीची जागा असलेल्या आदिती तटकरेंच्या गळ्यात पडल्याने भरत गोगावले यांच्यासह समर्थकांमध्ये नाराजी पसरल्याचे चित्र आहे. भरत गोगावले यांचे पुन्हा पालकमंत्री होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने सुनील तटकरे यांनी आपले वजन जिल्ह्यात अधिक असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिलंय.
अगोदरचा सूर आणि आताचा निर्णय!
शिंदे सरकारच्या काळात सरकार स्थापनेपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर वाद सुरू होता. या वादात उदय सामंत यांच्या गळ्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाची माळ पडली होती. आता पुन्हा फडणवीस सरकारमध्ये भरत गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळेल, अशा चर्चा सुरु होत्या. अखेर यावर देखील आता पाणी फिरल्याने या पदासाठी अदिती तटकरे पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदी विराजमान झाल्या आहेत. भरत गोगावलेच पालकमंत्री होतील असा जोरदार दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. मात्र, तटकरे यांची निवड झाल्याने शिंदे गटात नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे.
पुन्हा पालकमंत्री हटावची वेळ शिंदे गटाकडे येणारं का?
महाविकास आघाडी सरकार काळात आमदार म्हणून शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी अदिती तटकरेंच्या विरोधात बंड पुकारून पालकमंत्री हटाव राष्ट्रवादी हटाव मोहीम आखली होती. त्यावेळेपासूनच तटकरे आणि गोगावले यांच्यातील वाद कायम चर्चेत राहिला होता. जिल्ह्यात होणाऱ्या विकासात्मक कामात तटकरे यांच्याकडून शिंदे गटाच्या आमदारांना कमी दर्जा मिळत होता, असा आरोप या आमदारांनी केला होता. या तिन्ही आमदारांनी अदिती तटकरे यांना त्यावेळेस पदावरून पायउतार करण्यास भाग पाडले होते. आता हीच वेळ महायुतीतील या आमदारांवर आली असून पुन्हा अदिती तटकरे यांची वर्णी लागल्याचा स्वीकार करणार की आपली नाराजी कायम ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आता रायगडची समीकरणे कशी असणार?
शुक्रवारी 17 जानेवारीला कर्जतमधील आयोजित महायुती विजयी उमेदवार नागरी सत्कार सोहळ्यात राष्ट्रवादीला डच्चू देण्यात आला होता. यावरून राष्ट्रवादी आणि शिंदे सेना वाद सुरूच असल्याच पाहायला मिळत होतं. आता पुन्हा रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांच्या नियुक्तीला कितपत रायगडच्या युतीतील आमदारांचा पाठिंबा मिळतोय? हे सुध्दा बघावं लागेल. तर दुसरीकडे अदिती तटकरे यांच्या रूपात रायगडच्या विकासाला चालना मिळेल का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. मात्र, या निर्णयामुळे शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय समीकरणे कशी घडतील? हा सर्वात महत्त्वाचा भाग राहील.
आणखी वाचा