Solapur News : तारण ठेवलेली साखरेची परस्पर विक्री करून सोलापूर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याने सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याचे तत्कालिन अध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्यासह उपाध्यक्ष, संचालक व कार्यकारी संचालकांसह 23 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोदामामध्ये 11 कोटी 44 लाख 76 हजार रुपये किंमतीची साखरेच्या पोत्यांची बँकेला माहिती न देता विक्री केली होती. वरिष्ठ शाखा निरीक्षक अरविंद श्रीमंत काळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्वामी समर्थ साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाविरुद्ध  गुन्हा


दरम्यान, सोलापूर जिल्हा बँकेकडून साखर तारण ठेऊन 61 कोटी रुपये कर्ज घेतल्यानंतर तारण साखरेची परस्पर विक्री करून बँकेला 46 कोटी 37 लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अक्कलकोट तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाविरुद्ध दहा वर्षांनी गुन्हा दाखल झाला आहे. कारखान्याचे अध्यक्ष, भाजपाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील आणि संचालक असलेले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार यांच्यासह 24 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


238 कोटींच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करून वसूली होणार 


अलीकडेच आमदार दिलीप सोपल यांच्याशी संबंधित बार्शी तालुक्यातील आर्यन साखर कारखान्याविरुद्ध फौजदारी कारवाई झाली असून, त्या पाठोपाठ आता अक्कलकोटच्या स्वामी समर्थ साखर कारखान्यावरही फौजदारी कारवाई झाली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 238 कोटींच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करून बँकेच्या तत्कालीन संचालक व अधिकाऱ्यांसह 32 जणांविरोधात व्याज व दंडासह नुकसान भरपाई वसूल करण्याची कारवाई सुरू झाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या