Local Body Election : सिंधुदुर्ग नगरपंचायत निवडणूक; थंडीमुळे मतदानाला सकाळच्या सत्रात अल्प प्रतिसाद
Maharashtra Local Body Election : कडाक्याच्या थंडीचा परिणाम मतदानावरही होत असून सिंधुदुर्गातील 4 नगरपंचायतीच्या मतदानाला सकाळी मतदारांनी अल्प प्रतिसाद दिला.
Local Body Election Updates : सिंधुदुर्ग 4 नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाच्या सकाळच्या सत्रात थंडीमुळे मतदानास अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे मतदारांना मतदानांसाठी आवाहन करताना कार्यकर्त्यांना कसरत करावी लागत आहे. दुपारच्या सत्रात मतदारांच्या रांगा लागतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. जिल्ह्यातील होत असलेल्या नगरपंचायतीच्या मतदानावर सकाळच्या सत्रात परिणाम झाला आहे. त्यामुळे मतदानाला अल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील पहिल्या दोन तासातील सरासरी ७.३० ते ९.३० पर्यंत वाभवे वैभववाडी नगरपंचायतीत १६.८४ टक्के, कुडाळ नगरपंचायतीत १३.५१ टक्के, कसई-दोडामार्ग नगरपंचायतीत १५ टक्के, देवगड-जामसंडे नगरपंचायतीत ८ टक्के मतदान झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायत निवडणुकीत भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे तर शिवसेनेचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक निवडणूक प्रचार रणांगणात होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायत पैकी ३ नगरपंचायत राणेंकडे आहेत तर एक शिवसेनेकडे आहे. मात्र यावेळी चारही नगरपंचायत भाजप जिकेल असा विश्वास नारायण राणेंना आहे. तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीनेही कंबर कसली असून चारही नगरपंचायत आपल्या ताब्यात घेण्याच्या मनसुभ्याने आघाडीचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे काँगेस मात्र स्वबळावर लढत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील निवडणूका या तिरंगी होत आहेत.
कुडाळ नगरपंचायत मध्ये मात्र भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना तिकीट नाकारल्याने भाजप कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. मूळ भाजप विरुद्ध राणे समर्थक असं चित्र काही प्रभागात आहे. त्यामुळे भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी बंडखोरी करणाऱ्यावर कारवाई होणार असून ज्यांनी त्यांना बंडखोरी करायाला भाग पाडलं त्यांना सुद्धा सोडणार नसल्याचा सज्जड दम दिला आहे. त्यामुळे कुडाळ नगरपंचायतमध्ये राजकीय कलगीतुरा पहायला मिळत आहे.
वाभवे-वैभववाडी आणि देवगड जांभसंडे या दोन्ही नगरपंचायत मध्ये स्थानिक आमदार नितेश राणे स्वतः लक्ष घालून आहेत. राणेंच्या होम पिचवरील या दोन्ही नगरपंचायत मध्ये चुरशीच्या लढती पहायला मिळणार आहेत. तर कसई-दोडामार्ग नगरपंचायत मध्ये भाजपने आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने जोर लावला आहे. तर काँग्रेसचाही दोडामार्गात जोर आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायतीच्या ५२ जागांसाठी १५४ उमेदवार रिंगणात आहेत. तर जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळपासून निवडणूक शांततेत व निर्भीड वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असून, दंगल नियंत्रण पथकांसह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि भयमुक्त वातावरणात मतदान व्हावे, यासाठी चारही नगरपंचायत क्षेत्रातील मतदान केंद्रांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देवगडमध्ये ६२ अधिकारी, कर्मचारी व ११४ पोलिस, कुडाळमध्ये ६५ अधिकारी, कर्मचारी व ११६ पोलिस, दोडामार्गमध्ये ५२ अधिकारी, कर्मचारी व १०० पोलिस तसेच वैभववाडीत ७५ अधिकारी, कर्मचारी व ५३ पोलिस; शिवाय होमगार्ड, दंगल नियंत्रण पथके तैनात आहेत.