मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचं सत्र पाहायला मिळत आहे. परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडले आहेत. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांची चौकशी करण्याचा महत्त्वाचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला होता. अशातच आता या आरोपांच्या चौकशीसाठी सदस्यिय ‌समिती गठित करण्यात आली आहे. माजी न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती सहा महिन्यात या प्रकरणाचा अहवाल देणार आहे. 


परमबीर सिंह यांनी 20 मार्च रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रातून त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. तसेच गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना 100 कोटींचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एक गाडी आणि त्यात स्फोटकं सापडली आणि त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक झाली तर दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांनी उचलबांगडी झाली.


परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर विरोधक आक्रमक झाले. परमबीर सिंह कोर्टात गेले तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशीच भूमिका मांडली. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी देखील माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्या सारख्या अधिकाऱ्यानं चौकशी करावी असे सुचवले. रिबेरो यांनी चौकशी करण्यास असमर्थता दर्शवली. अखेरीस आज महाविकास आघडी सरकारने निर्णय घेतला की, निवृत्त न्यायमूर्ती या प्रकरणाची चौकशी करतील. त्यासाठी चौकशी आयोग नेमण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यानुसार आज माजी न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली. 


एकीकडे रश्मी शुक्ला यांनी केलेले फोन टॅपिंग याबाबत सरकार आक्रमक होत असताना दुसरीकडे माजी पोलीस आयुक्तांच्या आरोपांची आता चौकशी देखील होणार आहे. एकूणच महाविकास आघाडी सरकारने आता एकत्र येऊन या प्रकरणी सरकारची प्रतिमा सावरण्यासाठी कंबर कसली आहे.


दरम्यान, अँटिलिया प्रकरणी मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर त्यांना पदावरुन हटवण्याची मागणी जोर धरु लागली होती. सचिन वाझे यांना अँटिलिया स्फोटक प्रकरणी 13 मार्च रोजी एनआयएनं ताब्यात घेतलं होतं.  


उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारी रोजी एक संशयित गाडी आढळून आली होती. या गाडीत जिलेटीनच्या काड्या होत्या. याप्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :