मुंबई : NIA च्या मनसुख हिरण आणि अॅन्टेलिया प्रकरणातील तपासातून अनेक नवीन खुलासे होताना दिसत आहेत. एका सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून असं समोर आलं होतं की मनसुख हिरणने आपली स्कार्पिओ गाडी विक्रोळीमध्ये थांबवली आणि तो सीएसटी आला होता. त्यानंतर त्याची आणि सचिन वाझे यांची एका काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये नऊ मिनीटे चर्चा झाल्याची बाब समोर आली आहे.
या काळ्या रंगाच्या गाडीतून नऊ मिनीटांनी मनसुख हिरण बाहेर पडतो आणि रस्त्यापलीकडे जाऊन एक टॅक्सी पकडतो आणि या परिसरातून निघून जातो. ही सर्व माहिती सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून उघडकीस आली आहे.
आता या गाडीमध्ये सचिन वाझे आणि मनसुख हिरण यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपास NIA करत आहे. वाझेंच्या सांगण्यावरुनच मनसुख हिरणने आपली स्कार्पिओ विक्रोळीत थांबवली आणि त्याची चावी वाझेंना दिली का याचा तपास आता NIA करत आहे.
यावेळी सचिन वाझे यांनी मनसुख हिरणला काय ऑफर दिली होती की ज्यामुळे मनसुख हिरण असं करण्यास तयार झाला हेही NIA जाणून घ्यायचं आहे. यानंतर मनसुख हिरण यांने आपली स्कार्पिओ चोरीला गेली आहे अशी खोटी तक्रार नोंदवली होती.
घटनाक्रम असा आहे
NIA च्या सूत्रांच्या मते, 17 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजून 30 मिनीटांनी मनसुख हिरण आपल्या दुकानातून क्रॉफर्ड मार्केटकडे निघाला. संध्याकाळी 7 वाजायच्या दरम्यान तो विक्रोळी येथे पोहोचला आणि त्याने त्या ठिकाणी आपली कार उभी केली. त्यानंतर 7 वाजून 10 मिनीटांनी तो ओला कॅबच्या माध्यमातून सीएसटीकडे निघतो.
रात्री 8 वाजून 25 मिनीटांनी मनसुख डीसीपी झोन-1 कार्यालयापाशी पोहोचतो, त्या ठिकाणच्या सिग्नलवर सचिन वाझे आपल्या मर्सिडीज गाडीमधून येतात. रात्री 8 वाजून 26 मिनीटांनी मनसुख त्या गाडीच्या पुढच्या सीटवर बसतो. त्यानंतर ती गाडी जीपीओच्या जवळ पोहोचते आणि नऊ मिनीटे तिथेच थांबते.
त्यानंतर 8 वाजून 35 मिनीटांनी मनसुख गाडीमधून बाहेर येतो आणि रस्त्यापलिकडच्या एका टॅक्सीत बसतो आणि निघून जातो.
संबंधित बातम्या :