कोल्हापूर : कोल्हापूर दूध संघाच्या म्हणजे गोकुळच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. विरोधकांनी उघड उघड ताकद दाखवायला सुरुवात केल्यानंतर सत्ताधारी देखील आपली वेगळी चाल चालत आहेत. गोकुळमध्ये गेली 25 वर्षे सत्तेत असलेल्या महादेवराव महाडिक यांनी इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेतली. साधारण एक तास चाललेल्या बैठकीत महादेवराव महाडिक यांनी गोकुळ दूध संघाच्या संदर्भात आवाडे यांच्याशी चर्चा केली.


आज सकाळीच महादेवराव महाडिक हे आमदार प्रकाश आवाडे यांच्या घरी बैठकीसाठी पोहोचले. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाआण्णा आवाडे देखील उपस्थित होते. आतापर्यंत आमदार प्रकाश आवाडे यांनी कधीही गोकुळमध्ये सक्रिय राजकारण केलं नाही. पण आज आप्पांनी आवाडे यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं आहे. आज जरी महादेवराव महाडिक यांनी भेट घेतली असली तर विरोधक देखील नक्कीच आवाडे यांच्याशी संपर्क साधू शकतात. कारण दोन्ही बाजूंनी निवडणुकीचं तगडं नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळं एका-एका ठरावाला इथं महत्व असणार आहे.


आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी विरोधकांनी देखील फोनवरुन संपर्क साधला असल्याची माहिती मिळत आहे. पुढच्या दोन दिवसात प्रकाश आवाडे कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार आहेत. त्यामुळं अजून तरी आवाडे यांची मदत कुणाला मिळणार हे स्पष्ट झालं नाही.



आमदार प्रकाश आबिटकर काय करणार?


गोकुळ निवडणुकीच्या निमित्तानं आमदार प्रकाश आबिटकर यांचं नाव देखील चर्चेत राहिलं आहे. आमदार प्रकाश आबिटकर नेमकं कुणाच्या सोबत जाणार याबाबत जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मात्र अद्याप प्रकाश आबिटकर यांनी भूमिका आत्तापर्यंत स्पष्ट केली नाही. प्राथमिक बोलणी झाल्यानंतर प्रकाश आबिटकर हे विरोधकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला देखील उपस्थित नव्हते. त्यामुळं ते सत्ताधारी गटासोबत जाणार की विरोधकांसोबत असणार आहेत ते अजून स्पष्ट झालं नाही. येत्या दोन दिवसांत प्रकाश अबिटकर हे कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपल्या निर्यण जाहीर करणार आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :