मुंबई : मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवल्याप्रकरणी एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली होती. अटकेनंतर एनआयएच्या हाती त्याच्याविरोधातील  बरेच महत्वाचे पुरावे लागले आहेत. दक्षिण मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सचिन वाझे यांनी तब्बल 100 रात्रींचा मुक्काम केल्याची गोष्ट एनआयएने उघडकीस आणली आहे. सचिन वाझे कामातील आपला बहुतेक वेळ मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये घालवायचे. सचिन वाझे आठवड्यातील 4 ते 5 दिवस ट्रायडंट हॉटेलमध्ये राहत होते. एनआयएच्या तपास पथकाने ट्रायडंट हॉटेलमध्ये जाऊन शोध घेत तेथील अनेक सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केल्या आहेत. याच तपासणी दरम्यान सचिन वाझे बनावट ओळखपत्र तयार करुन या ट्रायडंट हॉटेलमध्ये राहत असल्याचे उघड झाले आहे.


आता तपासात आता एका संशयित महिलेचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. ही संशयित महिला ट्रायडंट हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या महिलेची ओळख पटवण्यासाठी एनआयए प्रयत्न करत आहेत. या महिलेच्या हातात नोटा मोजण्याची मशीन असल्याचं निदर्शनास आलं आहे. पण या महिलेने मास्क घातल्यामुळे तिची ओळख पटवणे कठीण जात आहे.


मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेरील स्कॉर्पिओमध्ये ठेवलेलं जिलेटिन कमी तीव्रतेचं


लॉबी, लिफ्ट पासून ते रुमपर्यंत जवळपास 35 ते 40 सीसीटीव्ही डीव्हीआर एनआयएने जप्त केल्या आहेत. पण एकदाही या संशयित महिलेने मास्क काढलेला नसल्याचं आढळून आलं. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचा पोलीस खात्याशी कोणताही संबंध नसल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. एनआयएला संशय आहे की, या महिलेचे मनसुख हिरण हत्या प्रकरणातील आरोपी विनायक शिंदे यांच्याबरोबर जवळचे संबंध असल्याने ती सचिन वाझेसाठी देखील काम करत असवी.


लवकरच एनआयए याविषयी विनायक शिंदे यांचीही चौकशी करु शकते आहे. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला गुजरातमधील असल्याचा संशय आहे. 16 फेब्रुवारीला सचिन वाझे आणि ही महिला एकाच कारमधून हॉटेलमध्ये आले होते. पण आधी वाझे हॉटेलच्या आत आले आणि नंतर महिलेने आत प्रवेश केला. यासंबधीतील चौकशीत सचिन वाझे यांनी या महिलेला ओळखण्यास आणि तिच्याबरोबर हॉटलमध्ये असण्यास नकार दिला आहे.


मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये सचिन वाझेंचा तब्बल 100 रात्रींचा मुक्काम!