राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
पाच दिवसांत सोन्याच्या दरात 1200 रुपयांची घट, जीएसटीसह एक तोळा सोन्याचा दर...
मागील काही दिवसात सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊन सोन्याचे दर जीएसटीसह 64 हजार 200 रुपये इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले होते. मात्र गेल्या पाच दिवसात सोन्याच्या दरात 1200 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. जळगावमधील सुवर्णनगरीत एक तोळा सोन्याचा जीसीएसटीसह दर हा 63 हजार रुपये इतका आहे. वाचा सविस्तर
पक्ष विरहित संस्कृतीच्या नात्याने फडणवीस माझ्याकडे आले होते : आशिष देशमुख
काँग्रेसमधून निलंबित असलेल्या आशिष देशमुख यांची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. एक तास चाललेल्या या भेटीनंतर फडणवीस आणि बावनकुळे काहीही बोलले नसले तरी आशिष देशमुख यांनी ही सदिच्छा भेट होती, फडणवीस हे विदर्भाचा विकास घडवणारे एकमेव नेते आहेत आणि पक्ष विरहित संस्कृतीच्या नात्याने ते माझ्याकडे आले होते अशी प्रतिक्रिया दिली. मात्र या भेटीमागे शुद्ध राजकारण असून नागपूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या दोन माजी मंत्र्यांना शह देण्यासाठी भाजप आशिष देशमुख यांच्या माध्यमातून राजकीय खेळी खेळत असल्याचं या भेटीमागून दिसून येत आहे. वाचा सविस्तर
शंभर वर्षे जुनी परंपरा मोडीत काढू नये, त्र्यंबकेश्वरमधील गावकऱ्यांनी निर्णय घ्या; राज ठाकरे यांचा सल्ला
'शंभर वर्षे जुनी परंपरा मोडीत काढू नये, त्र्यंबकेश्वरमधील प्रथा थांबवणे योग्य नाही'. त्याचबरोबर बाहेरच्यांनी यात पडायचं काय कारण नाही. गावच्या लोकांनी हा निर्णय घ्यायचा आहे. या माध्यमातून कुणाला दंगली हव्या आहेत का? ज्या गोष्टी चुकीच्या घडतील, तिकडे प्रहार करणे गरजेचे असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. वाचा सविस्तर
बारावी भौतिकशास्त्राच्या 372 उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर; चौकशी समितीचा अहवाल
बारावीच्या परीक्षेच्या भौतिकशास्त्र पेपर तपासणीमध्ये तीनशेहून अधिक विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती. तर चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होताच एचएससी बोर्डासह शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली. कारण भौतिकशास्त्राच्या तब्बल 372 उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे याबाबत तातडीने राज्य शिक्षण मंडळास कळविण्यात आले आहे. तर परीक्षेतील हा एक मोठा घोटाळा समजला जात आहे. वाचा सविस्तर
लातूर-जहीराबाद महामार्गाची दूरवस्था; एकाच वर्षात महामार्गाला भेगा, अपघाताचे प्रमाण वाढले
लातूर-जहीराबाद या महामार्गाचे काम वेगात करण्यात आले आहे. काही दिवसात अपूर्ण कामही करण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र अनेक ठिकाणच्या अपूर्ण कामाला एक वर्ष झाल्यानंतर सुद्धा गतीच मिळत नाही. जे काम झालेलं आहे ते असून अडचण नसून खोळंबा अशासारख्या स्थितीत आहे. लातूर-जहीराबाद महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्या आहेत. हे कमी होते का काय आता अनेक ठिकाणी खड्डे ही पडले आहेत. काही ठिकाणी पुलाची अपूर्ण काम, रस्त्याची अपूर्ण कामं, पडलेल्या भेगा आणि खड्डे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाचा सविस्तर