Gold Price Today : मागील काही दिवसात सोन्याच्या दरात (Gold Rate) मोठी वाढ होऊन सोन्याचे दर जीएसटीसह 64 हजार 200 रुपये इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले होते. मात्र गेल्या पाच दिवसात सोन्याच्या दरात 1200 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. जळगावमधील (Jalgaon) सुवर्णनगरीत एक तोळा सोन्याचा जीसीएसटीसह दर हा 63 हजार रुपये इतका आहे.


... म्हणून सोन्याचे दर कमी झाले!


जागतिक पातळीवर अमेरिकन फेडरल बँकेच्या व्याजविषयक धोरणामुळे गुंतवणूकदारांनी बँकांमध्ये गुंतवणूक न करता सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. परिणामी सोन्याच्या मागणीत मोठी वाढ निर्माण होऊन सोन्याचे दर हे जीएसटीसह 64 हजार 200 रुपये इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले होते. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून जागतिक पातळीवर घडलेल्या अनेक घडामोडींचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी काही प्रमाणत शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. यामुळे सोन्याच्या मागणीत काही प्रमाणात घट झाल्याने त्याचा परिणाम सोन्याचे दर कमी होण्यावर झाला आहे.


सोन्याचे दर जीएसटीसह 63 हजारांवर


गेल्या पाच दिवसांपूर्वी दहा ग्रॅम शुद्ध सोन्यासाठी जीएसटीसह 64 हजार 200 रुपये मोजावे लागत होते. आता हेच दर 63 हजार रुपयांवर आले आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात 1200 रुपयांची घट झाली असल्याचं पाहायला मिळत असल्याचं सोने व्यावसायिकांनी म्हटलं आहे.


दर आणखी कमी होण्याची ग्राहकांची अपेक्षा


दुसरीकडे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या दृष्टीने सोन्याचे दर कमी झाल्याने आनंद झाला असला तरी तो आनंद व्यक्त करता येईल एवढे सोन्याचे दर कमी झालेले नाहीत. सोन्याच्या दरात अजून घट व्हायला पाहिजे होती अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली आहे.


तुमच्या शहरातील सोन्याचे दर असे तपासा! 


तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 


खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :


तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.