Pune MVA Vajramuth Sabha : महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सध्या पाहायला मिळत आहे. त्यासाठी पुण्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे गटातून कामाला सुरुवात झाली आहे. त्यांनी एकत्रित पत्रकार परिषद आयोजित केली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. पवारांच्या या निर्णयाचा परिणाम आता मविआच्या वज्रमूठ सभेवर होणार असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला आणि उन्हाचं कारण देत सभा पुढे ढकलल्याचं मविआकडून जाहीर करण्यात आलं होतं. आता त्याच सभेसाठी तिन्हीपक्षाकडून तयारीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या दोन दिवसात पुढील सभेच्या तारखा निश्चित होण्याची शक्यता आहे.


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'लोक माझे सांगाती' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर अनेक नेत्यांनी राजीनामादेखील दिला होता. अशातच राज्यातील होणाऱ्या तीनही सभा रद्द होणार असल्याचं बोललं गेलं. वज्रमूठ सभा सैल झाल्याचंदेखील विरोधक म्हणाले होते. कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले, आंदोलन केल्यानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला. छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि नागपूर या तिन्ही शहरात वज्रमूठ सभा पार पडली होती. त्यानंतर 14 मे रोजी पुण्यामध्ये सभा होणार होती. 


सभेला स्थगिती का दिली?


काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भुषण कार्यक्रमादरम्यान उष्माघातामुळे लोकांने जीव गेले होते. त्यानंतर राजकारण पेटलं होतं. आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. त्यानंतर राज्यात तापमानाता पारादेखील वाढत होता. त्यामुळे उन्हाचं कारण देत राज्यातील काही शहरांमधील या सभांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र जून महिन्यात आता या सभांचं आयोजन करण्याची शक्यता आहे. 


मागील काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहे. विरोधी पक्षाकडून या निव़डणुका जाहीर करण्याची मागणीदेखील काही महिन्यांपासून केली जात आहे. मात्र अजूनही या निवडणुका कधी होणार? याचा अंदाज नाही. त्यामुळे येत्या 9 जूनला महाविकास आघाडीकडून एकत्रित मोर्चा काढण्यात येणार आहे. 


स्थानिक नेतेही लागले कामाला...


काही दिवसांपूर्वी मुंबई सिल्वर ओकवर महाविकास आघाडीची बैठक झाली होती. त्यावेळी राज्यातले सगळे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत महाविकास आघाडीच्या धोरणांवर चर्चा झाली. त्यानंतर अनेक शहरातील स्थानिक नेते पक्षाच्या कामाला लागल्याचं दिसत आहे. त्यामुळे पुण्यातील तिन्ही पक्षाचे शहराध्यक्ष एकत्र येऊन मोर्चा काढणार आहेत.