Karnataka CM Swearing In Ceremony : कर्नाटकात काँग्रेसच्या (Congress) विजयानंतर आज कर्नाटकात सिद्धरामय्या (Siddaramaiah) मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतील. तसेच डीके शिवकुमार (DK Shivakumar) हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. या शपथविधीला देशभरातील राजकीय नेते उपस्थित राहतील. परंतु ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) या शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत. तर ठाकरे गटाचे प्रतिनिधी म्हणून राज्यसभा खासदार अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी उपस्थित राहणार आहेत. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.
सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या शपथविधीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील मित्रपक्ष म्हणून काँग्रेसकडून विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना शपथविधीसाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वत: उद्ध ठाकरे यांना फोन करुन निमंत्रण दिलं होतं. परंतु उद्धव ठाकरे शपथविधीला हजर राहणार नसल्याचं समजलं. त्यांच्या अनुपस्थितीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
ममता बॅनर्जी राहणार अनुपस्थित
या शपथविधी सोहळ्यामुळे केंद्रातील सत्ताधारी पक्षाला विरोधकांची मूठ किती घट्ट आहे याचा अंदाज आला असता असं म्हटलं जात आहे. तसेच सत्ताधारी पक्षाला एक वेगळा संदेश गेला असता अशी देखील चर्चा रंगली आहे. परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विरोधकांमध्ये सगळं आलबेल सुरु आहे ना असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
काँग्रेसकडून दिग्गजांची उपस्थिती
काँग्रेसकडून दिग्गज नेत्यांची उपस्थिती या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी हे देखील या सोहळ्यासाठी कर्नाटकात असतील. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा बंगळूरच्या श्री कांतीराव स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. तसेच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील बंगळूरमध्ये होणाऱ्या या शपथविधीसाठी रवाना झाले आहेत.
सिद्धरामय्या दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
सिद्धरामय्या यांच्याकडे काँग्रेसकडून कर्नाटकाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. 75 वर्षीय सिद्धरामय्या हे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. सिद्धरामय्या हे दुसऱ्यांदा कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याआधी त्यांनी 2013 कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
संबंधित बातमी