झेडपी, पंचायत समितीमध्येही जागा वाढणार! गावगाड्याच्या राजकारणातील मोठी बातमी
ZP Panchayat Samiti Election : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
ZP Panchayat Samiti Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महानगरपालिकाप्रमाणेच लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये जागा वाढवण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये साधारणपणे सहा ते सात टक्के जागा वाढणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहणाऱ्या इच्छुकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली आणि निर्णय घेण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी निवडणुकीत या जागा वाढणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील समीकरणांमध्ये मोठा बदल होणार आहे. या वाढलेल्या जागांनुसार राजकीय पक्षांना आपली रणनीती ठरवावी लागणार आहे.
सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 इतकी आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 9 (1) मध्ये सुधारणा करून जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 55 व जास्तीत जास्त 85 असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या सुधारणेमुळे सध्याची जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 2000 वरुन 2248 इतकी होईल. त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्यांची संख्या देखील 4000 वरुन 4496 इतकी होईल.
थेट निवडणुकीद्वारे द्यावयाच्या सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोग निश्चित करणार आहे. मात्र, एखादया जिल्हा परिषदेच्या प्रादेशिक क्षेत्राची लोकसंख्या आणि निवडणूकीव्दारे भरवण्यात येणाऱ्या अशा जिल्हा परिषदेमधील जागांची संख्या यामधील प्रमाण, शक्य असेल तेथवर, राज्यभर सारखेच असेल असे सरकारने स्पष्ट केले आहे.
त्याशिवाय, राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक जाहीर झाल्या आहेत. आरक्षणाचा लाभ घेऊन जे उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांनी अर्ज भरताना जात पडताळणी प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडीटी) जोडण्यात यावे असे कोर्टाचे आदेश आहेत. मात्र, नेहमी प्रमाणे मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.
राज्यात मुंबईसह सध्या 27 महापालिका आणि 379 नगरपालिका- नगरपंचायती आहेत. दर १० वर्षांनी होणाऱ्या जनगणनेच्या आधारे महापालिका- नगरपालिकांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या निश्चित केली जाते.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह