एकच अपत्य असणाऱ्या दाम्पत्याला सरकारी मदत द्यावी ; नितीन राऊत यांची मागणी
दारिद्र्य रेषेखालील दाम्पत्याला एकच अपत्य असेल तर अशा कुटुंबाला महाविकास आघाडी सरकारने वाढीव शासकीय मदत करावी, अशी मागणी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केली आहे.
Nitin Raut : अल्प उत्पन्न गटातील आणि दारिद्र्य रेषेखालील दाम्पत्याला एकच अपत्य असेल तर अशा कुटुंबाला महाविकास आघाडी सरकारने वाढीव शासकीय मदत करावी. शिवाय त्यांच्या शासकीय योजनांच्या लाभामध्ये वाढ करावी, अशी मागणी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.
नागपुरात "आंबेडकर ऑन पॉप्युलेशन पॉलिसी, काँटेंप्रेरी रिलिवेंस" या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात नितीन राऊत बोलत होते. नितीन राऊत यांनी हे पुस्तक लिहिले असून आज राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित होते.
देशाची वाढती लोकसंख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत राज्याच्या आरोग्य विभागाला आणि प्रशासनाला निर्देश द्यावे आणि कुटुंब एका अपत्यापर्यंत मर्यादित ठेवणाऱ्या अल्प उत्पन्न असलेल्या किंवा दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना वाढीव मदत करावी अशी मागणी नितीन राऊत यांनी केली. एकच आपत्य ठेवणाऱ्या कुटुंबाना विविध शासकीय योजनांच्या वाढीव लाभासह एकरकमी प्रोत्साहनपर बक्षीस द्यावे, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आल्याने महाविकास आघाडीचा एक वेगळे रसायन तयार झाले असून हे सर्व जीवाला जीव लावणारे सहकारी असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. राजकारणी अभ्यासू असणे ही दुर्मिळ बाब आहे. मात्र, नितीन राऊत यांनी पुस्तक लिहून तो समज खोटा ठरविल्याचा मला आनंद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आपण सर्व बाबासाहेब आंबेडकर यांचे भक्त आहोत. परंतु, अंधभक्त नाही, सध्या सर्वत्र अंध भक्तांचा सुळसुळाट असल्याची कोपरखळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावली.
महत्वाच्या बातम्या
राज्यघटना दुरूस्त करून ओबीसींची जनगणना करावी ; भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी
सध्या अंध भक्तांचा सुळसुळाट, मुख्यमंत्री ठाकरे यांचा भाजपवर निशाणा