Maharashtra Government Portfolios : शिंदे गट नावालाच, खरी सत्ता भाजपचीच; 80 टक्के निधी भाजपला मिळणार, शिंदे गटाला फक्त 20 टक्के
Maharashtra Government Portfolios : एकनाथ शिंदे यांना भाजपाने मुख्यमंत्रीपद दिले. खातेवाटपात मात्र सत्तेतला 80 टक्के वाटा भाजपाने स्वत:कडे घेतला आहे.
मुंबई : शिंदे - भाजप सरकारचे लांबलेले मंत्रिमंडळ खातेवाटप (Maharashtra Government Portfolios) अखेर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मार्गी लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खात्यांपेक्षा अधिक महत्त्वाची खाती भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. भाजपाकडे गेलेली खाती पाहता राज्यात खरी सत्ता भाजपाचीच असणार हे उघड आहे. निधी वाटपातले प्रमाण पाहता भाजपाकडे 80 टक्के आणि 20 टक्के शिंदे गटाकडे अशी विभागणी झाली आहे..
स्वांतत्र्यांच्या पूर्वसंध्येला बिगर खात्याचे मंत्री खात्याचे मंत्री झाले. पाच दिवस लांबलेले खाते वाटप झाले. मनावर मोठा दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना भाजपाने मुख्यमंत्रीपद दिले. खातेवाटपात मात्र सत्तेतला 80 टक्के वाटा भाजपाने स्वत:कडे घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार अशी आठ खाती आहेत.
भाजपचे इतर मंत्रीही पॅावरफुल
- राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
- डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
- गिरीष महाजन- ग्राम विकास आणि वैद्यकीय शिक्षण
- रविंद्र चव्हाण - सार्वजनिक, अन्न व नागरी पुरवठा
- मंगलप्रभात लोढा - पर्यटन, महिला व बालविकास
- सुधीर मुनगंटीवार - वन
- चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण
- सुरेश खाडे - कामगार
- अतुल सावे - सहकार
अशी महत्त्वाची खाती भाजपकडे आहेत.
माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेले बजेट पाहिले तर भाजपाच्या मंत्र्यांकडे 80 टक्के निधी दिसतो. मुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचे पद आहेच. पण या पदापेक्षाही जनतेचा थेट संबंध असलेली खाती आपल्याकडे घेण्याचा फॅर्म्युला राज्यात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस काळात राबवला गेला. आता तीच पध्दत यावेळी भाजपाने घेतली आहे.
शिंदे गटाकडे असणारी खाती
- गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता
- दादा भुसे -बंदर व खनिकर्म
- संजय राठोड - अन्न व औषध प्रशासन
- संदीपान भुमरे - रोजगार हमी योजना व फलोत्पादन
अशी दुय्यम खाती आली आहेत. शिंदेगटाकडे त्यातल्या त्यात उदय सामंत यांना उद्योग, तानाजी सावंत यांना सार्वजनिक आरोग्य, अब्दुल सत्तार यांना कृषी तर दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण अशी खाती आहेत. मंत्र्यांचा प्रभाव दाखवतील अशी दोन-तीन खाती शिंदेगटाकडे आहेत. पण मंत्री खूश नाहीत.
मुख्यमंत्र्यांच्या खात्यांपेक्षा अधिक महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री गेली आहेत. पुढेही गृह आणि वित्त अशी महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहिली तर फडणवीस यांची मंत्रालयातली ताकद वाढेल. त्यांचे कार्यालय सर्वात प्रभावशाली राहिल. भाजपाच्या इतर मंत्र्यांनी चमकदार कामगिरी केलीच तर पुढची अडीच वर्षे मुख्यमंत्री शिंदेसेनेचा पण राज्यात मात्र बोलबाला भाजपचा अशी परिस्थिती पाहायला मिळेल.
हे देखील वाचा-