एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक अचानक रद्द, अजित पवार तडकाफडकी बैठकीतून बाहेर
अचानक ही बैठक रद्द झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आज काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व महत्वाचे नेते शरद पवारांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे बैठकीला उपस्थित झाले होते. या बैठकीतून अजित पवार तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडले
मुंबई : राज्यामध्ये सत्तास्थापनेच्या गोंधळात आता आणखी भर पडली आहे. सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये होणारी समन्वय समितीची बैठक अचानक रद्द झाली आहे. ही बैठक रद्द झाल्याची माहिती सर्वप्रथम राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली. अचानक ही बैठक रद्द झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आज काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व महत्वाचे नेते शरद पवारांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे बैठकीला उपस्थित झाले होते. या बैठकीतून अजित पवार तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडले. तसेच आपण बारामतीकडे निघालो आहोत असे त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
या समन्वय समितीच्या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे आणि जयंत पाटील हे नेते उपस्थित होते. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर माध्यमांनी त्यांना प्रतिक्रियेसाठी घेरल्यानंतर बैठक रद्द झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नंतर बैठक कधी होईल हे आपण सांगू शकत नाही असेही अजित पवार म्हणाले. दरम्यान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही बैठक रद्द झाल्याचे सांगितले. कॉंग्रेसची बैठक संपली आहे. यात प्राथमिक चर्चा केली आहे. आता राष्ट्रवादीचा निरोप आल्यावर बैठकीला जाऊ, असे कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान कुठलाही वाद नसल्याचे देखील चव्हाण म्हणाले. दोन्ही पक्षांमध्ये खूप चांगला समन्वय आहे. आज चर्चा झाली नसली तरी उद्या चर्चा होईल, असे ते म्हणाले.
मला याबाबत काही कल्पना नाही, मी शेवटच्या क्षणी बैठकीत आलो, असे सुनील तटकरे बैठकीनंतर म्हणाले. बैठक रद्द झाल्याची माहिती नाही, असेही ते म्हणाले.
राज्यातील सत्ता संघर्ष अधिकच वाढत चालला आहे. शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन होणार असल्याची चर्चा आहे. तसे प्रयत्न तिन्ही पक्षाकडून होत आहे. मात्र तिन्ही पक्षातील ठोस बोलणी अद्याप होऊ शकले नसल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला नाही. दरम्यान आज राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक रद्द झाल्याने, राजकारणाला पुन्हा वेगळे वळण लागले आहे.
दरम्यान या बैठकीआधी आमची बैठक झाली की शिवसेनेसोबत चर्चा करणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले होते. शिवसेनेनं आम्हाला एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यांची युती तुटल्याची घोषणा होत नाहीये, कदाचित 'पोपट मेला' याची घोषणा कोणी करायची यावर अडलं असेल, असेही ते म्हणाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement