माझे शिवरायांवरील वक्तव्य प्राथमिक माहितीच्या आधारे, आता नवीन तथ्य समजलं; राज्यपालांची सारवासारव
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांच्या संबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर आता त्यांनी खुलासा केला आहे.
जळगाव: समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता त्यावर सारवासारव केली आहे. शिवाजी महाराजांच्यावरील आपलं वक्तव्य हे प्राथमिक माहितीच्या आधारे होतं. आता त्यासंबंधी नवीन तथ्य समजलं असल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे. ते जळगावात बोलत होते.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यभर संतापाचं वातावरण पसरलं होतं. आता स्पष्टीकरण देताना राज्यपाल म्हणाले की, शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे प्रेरणा स्थान आहेत. समर्थ रामदास हे शिवाजी महाराज यांचे गुरू असल्याची प्राथमिक शिक्षण घेताना मला माहिती मिळाली होती. मात्र आता काही नवीन तथ्य मला सांगण्यात आले आहे. आता तेच पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करू.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे रविवारपासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. राज्यपालांनी जैन उद्योग समूहाला भेट देण्यासह उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जलतरण तलावाचे शुभारंभ केला. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी?
समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला गुरू मिळाला तो यशस्वी होतो असंही कोश्यारी म्हणाले होते. औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, मराठी राजभाषा दिन आणि श्री दास नवमी निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या:
- 'समर्थांविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?' राज्यपाल कोश्यारींचं वादग्रस्त वक्तव्य, राष्ट्रवादी आक्रमक
- Governor Controversial Statement LIVE : राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य, शिवप्रेमींमध्ये संताप! वाचा प्रत्येक अपडेट
- शिवप्रेमींमध्ये संताप! राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करावं : खासदार उदयनराजे