ऑनलाईन परीक्षांच्या नावानं चांगभलं! गडचिरोलीत विद्यार्थ्यांची जंगलामध्ये नेटवर्कसाठी कसरत!
अतिदुर्गम मागास गडचिरोली जिल्ह्यातील विद्यापीठ परीक्षांचे वास्तव. कोरची तालुक्यात इंटरनेट समस्या असल्याने चक्क जंगलात आणि घराच्या छतावर कव्हरेजसाठी विद्यार्थ्यांची धावाधाव. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या विविध ऑनलाईन परीक्षांसाठी विद्यार्थी त्रस्त, या परीक्षांसाठी मागास गडचिरोलीत वेगळी व्यवस्था करण्याची होतेय मागणी...
गडचिरोली : अतिदुर्गम- मागास आणि दळणवळणाच्या सोयी अपुऱ्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीने उत्तम ऑनलाइन परीक्षांचे संयोजन केले असल्याची शाबासकी दिली जात होती. मात्र याच जिल्ह्यातील कोरची तालुक्यात इंटरनेट अडचणीमुळे विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देताना त्रस्त झाले आहेत. कोरची तालुक्यात विजेचा लपंडाव आणि इंटरनेट कमकुवत असल्याने विद्यार्थ्यांनी कव्हरेजसाठी चक्क जंगलात अथवा घराच्या छतावर धाव घेतल्याचे चित्र आहे.
बेडगाव परिसरात काही विद्यार्थिनींनी गटागटाने चक्क जंगलात बसून ऑनलाईन परीक्षा दिली. कोरची तालुक्यात सातत्याने इंटरनेट कमकुवत असल्याची तक्रार केली जात आहे. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा बाबत गोंधळाची स्थिती आहे. परीक्षा ऑनलाईन होत असल्या तरी अशीच स्थिती राहिली तर विद्यार्थी ज्ञानाच्या बाबतीत ऑफलाईन राहण्याची शक्यता आहे.
अतिदुर्गम मागास गडचिरोलीत ऑनलाइन परीक्षांच्या बाबतीत वेगळी सुविधा निर्माण करण्याची अथवा परीक्षा पुन्हा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. गोंडवाना विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 8 मार्च ते 27 मार्च पर्यंत तालुक्यातील बी.ए. व बी.एस.सी. च्या विद्यार्थ्यांची परीक्षा 75 मिनिटांची असून त्याकरिता 50 प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
परंतु परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंटरनेट विस्कळीत झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला दिसून आला. काही विद्यार्थी छत्तीसगड राज्यात तर काही लगतच्या देवरी, वडसा, चिचगड सारख्या ठिकाणी इंटरनेट अभावी परीक्षेकरिता गेले होते. विस्कळीत झालेल्या इंटरनेटच्या सुविधेमुळे बहुतेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागले. सध्यातरी विद्यापीठ प्रशासनाकडे यासाठी कुठलेही उत्तर नाही.