Maharashtra Full Lockdown: राज्यात लवकरच कडक लॉकडाऊन लागू होणार, मुख्यमंत्री करणार घोषणा
पुढील 15 दिवसांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत माहिती देतील. काही वेळात लॉकडाऊन बाबतच्या गाईडलाईन्स जारी होणार आहेत.
मुंबई : राज्यात लॉकडाऊन लागू होणार हे आता निश्चित झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर मंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत माहिती दिली आहे. पुढील 15 दिवसांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत माहिती देतील. काही वेळात लॉकडाऊन बाबतच्या गाईडलाईन्स जारी होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनवर एकमत झालं आहे.
लॉकडाऊन अत्यंत कडक असला पाहिजे. गेल्यावर्षी जसा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता, तसाच हा लॉकडाऊन हवा. राज्यात कडक निर्बंध असतानाही लोक रस्त्यावर फिरत आहेत. कोरोनाची स्थिती चिंताजनक होत आहे. त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कडक लॉकडाऊन लागू करण्याचं आवाहन केलं. लॉकडाऊन आवडीचा विषय नाही मात्र लॉकडाऊनशिवाय आज पर्याय देखील नाही. त्यामुळे मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतील आणि उद्यापासून हा निर्णय लागू करतील, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
राज्यात येत्या काही तासांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लावावा लागेल. राज्यात कडक निर्बंध लागू आहेत, मात्र कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नाहीये. ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे, बेड मिळत नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी येत्या काही तासांत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन आणावा लागेल. लॉकडाऊनबाबतच्या लवकरच जारी केल्या जातील, असं अस्लम शेख यांनी म्हटलं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द
काही करु लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. उद्या रात्रीपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन बाबत घोषणा करतील अशी माहिती राजेश टोपे यांनीही दिली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
लसीकरण मोहिम वेगाने राबविणार : राजेश टोपे
महाविकासआघाडीने लसीकरणाची राज्यात लसीकरणाची मोहिम जोरदार राबवण्यात येणार आहे. लसीकरणासाठी इतर सर्व खर्चात कपात करू परंतु राज्यात लसीकरण वेगाने करण्यात येणार आहे. लसीकरणाची मोहिम राबवण्यासाठी कोव्हीशील्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन लसींबरोबरच परदेशातून इतर लसी घेतल्या पाहिजे आणि लसीकरण वेगाने केले पाहिजे. 18 ते 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरणाची मोहिम वेगाने राबवण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितले