(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कौतुकास्पद! बारामतीची आर्या तावरे फोर्ब्स'च्या यादीत झळकली
आर्याने क्राऊड फंडींग ही नवीन संकल्पना आणली आणि बांधकाम व्यवसायातील विविध अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला.
बारामती : जगप्रसिद्ध फोर्ब्ज मासिकात मूळ बारामतीकर असलेल्या आर्या तावरेचा फोर्ब्ज आर्थिक बाबींविषयक मासिकात पहिल्या तीसमध्ये समावेश झाला आहे. युरोपमधील तीस वर्षांखाली प्रभावशाली पहिल्या तीस व्यक्तींमध्ये आर्याला स्थान मिळाले आहे.
मूळची बारामतीकर असलेली आर्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. आर्या कल्याण तावरेचा फोर्ब्ज या आर्थिक बाबींविषयक मासिकात पहिल्या तीस व्यक्तींमध्ये समावेश झाला आहे. आर्याने पुण्यात प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेतले आहे. पुढील शिक्षणासाठी आर्या लंडनला गेली आहे. आर्याला लहानपणापासून लॉन टेनिस खेळण्याची आवड होती.आर्या ही प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कल्याण तावरे यांची कन्या आहे.कल्याण तावरे यांच्या पुण्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी साईट सुरू आहेत.आर्याने लंडन विद्यापीठात अर्बन प्लॅनिंग अँड रिअल इस्टेट अँड फायनान्स हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर नोकरी करताना तेथील बांधकाम व्यावसायिकांना निधी उभारणीसाठी ज्या अडचणी येत होत्या त्याचा अभ्यास करत आर्या हिने स्वताःची स्टार्ट अप कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला.
नव उद्योजकांना उद्योग सुरू करताना सुरुवातीला तिला निधी उभा करण्यात अडचण निर्माण झाली. परंतु आर्याने निधी उभारणीची अडचण दूर करण्यासाठी तिने क्राऊड फंडींग ही नवीन संकल्पना आणली आणि त्याला यश मिळाले. फ्यूचरब्रीक या नावाने तिने कंपनी सुरु करुन बांधकाम व्यवसायातील विविध अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. आज तिच्या हाताखाली ब्रिटीश लोक काम करतात ही अभिमानास्पद बाब आहे. लंडनमध्ये काम करताना तेथील व्यावसायिकांना ज्या अडचणी येत होत्या निधी कमी पडत होता त्याचा अचूक अभ्यास करुन आर्या हिने फ्यूचरब्रीकच्या माध्यमातून त्यातून मार्ग काढला. युरोपमधील तीस वर्षांखाली प्रभावशाली पहिल्या तीस व्यक्तींमध्ये आर्याला स्थान मिळाले आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. याआधी देखील आर्याला ब्रिटिश सरकारकडून स्टार्टअपसाठी दिला जाणारा 25 वयोगटातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
संबंधित बातम्या :