एक्स्प्लोर
परभणी जिल्ह्यात महाराष्ट्र विकास आघाडी पॅटर्न यशस्वी
मानवत, गंगाखेड, पालम येथेच निवड प्रक्रिया पार पडली. मात्र इतर सहा ठिकाणी बिनविरोध सभापती आणि उपसभापती निवडी झाल्या ज्यात महाविकास आघाडीचा पॅटर्न पाहायला मिळाला.

परभणी : परभणी जिल्ह्यातील 9 पंचायत समिती सभापती,उपसभापती पदाची निवड शुक्रवारी (27 डिसेंबर) पार पडली. निवडणूक पार पडली जात असताना 9 पैकी 5 ठिकाणी राष्ट्रवादी, 2 ठिकाणी शिवसेना, एका ठिकाणी रासप तर एका ठिकाणी घनदाट मित्रमंडळाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मानवत, गंगाखेड, पालम येथेच निवड प्रक्रिया पार पडली. मात्र इतर सहा ठिकाणी बिनविरोध सभापती आणि उपसभापती निवडी झाल्या ज्यात महाविकास आघाडीचा पॅटर्न पाहायला मिळाला. अशी झाली निवड प्रक्रिया परभणीत पंचायत समितीत शिवसेनेने विद्यमान काँग्रेस च्या सभापतींना भाजप च्या मदतीने बाजूला केले. एकूण 20 सदस्य असलेल्या परभणी पंचायत समितीत शिवसेनेकडे 8, काँग्रेसकडे 8, भाजप 3 आणि माकप 1 असे संख्याबळ असताना शिवसेनेने काँग्रेस सोबत न जाता भाजपच्या 3 सदस्यांना फोडले आणि निवडणूक बिनविरोध होण्यास भाग पाडत स्वतःच दोन्ही पदे आपल्याकडं ठेवली. ज्यामध्ये सभापतीपदी गोकर्णा डुबे, उपसभापती प्रमोद गायकवाड यांची निवड करण्यात आली. पाथरी पंचायत समितीत राष्ट्रवादीकडे बहुमत असल्याने इथली निवडणूक बिनविरोध पार पडली. आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या नेतृत्वात इथे सभापतीपदी कल्पना सदाशिव थोरात यांची तर उपसभापती पदी गंगुबाई डुकरे यांची निवड बिनविरोध करण्यात आली. मानवत पंचायत समितीमध्ये शिवसेनेत 2 गट पडले. ज्यातील दत्तराव जाधव, गीता यादव यांनी बंडखोरी करत अनुपस्थित राहिले. मात्र येथे शिवसेनेने महाविकास आघाडी पॅटर्न राबवत काँग्रेसच्या भगीरथ अवचार आणि सुमन गाडे यांची मदत घेऊन सभापतीपदी प्रमिला उकलकर आणि उपसभापती पदी कमल हिंगे यांची निवड झाली. सोनपेठ पंचायत समितीतील 6 पैकी 5 सदस्य हे राष्ट्रवादी चे तर 1 शिवसेना असल्याने येथेही बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली. ज्यात राष्ट्रवादीच्या मीरा जाधव यांची सभापतीपदी तर उपसभापती शंकर बचाटे यांची निवड बिनविरोध करण्यात आली. गंगाखेड पंचायत समितीच्या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळाली. राष्ट्रीय समाज पक्षाने राष्ट्रवादी 2 आणि शिवसेनेचे 2 सदस्य फोडून पंचायत समितीवर वर्चस्व प्रस्थापित केले. ज्यात रासपच्या छाया मुंडे हा सभापती झाल्या तर उपसभापती पदी राष्ट्रवादीच्या बंडखोर शांताबाई माने यांचा विजय झाला. पुर्णा पंचायत समितीत हि महाविकास आघाडी पॅटर्न राबवण्यात आला. ज्यात सभापतीपद हे राष्ट्रवादीने आपल्याकडे ठेवत अशोक बोकारे यांना सभापती पदी विराजमान केले. तर शिवसेनेच्या रोहिणी काळे उपसभापती झाल्या. पालम पंचायत समिती मध्ये स्थानिक घनदाट मित्र मंडळाने राष्ट्रवादी ला सोडून भाजप चा हात धरला आणि सभापती म्हणून मित्र मंडळाच्या अलका विजय शिंदे तर उपसभापती म्हणून भाजपचे अण्णासाहेब गिरडे यांची निवड करण्यात आली. मागच्या अडीच वर्ष घनदाट मित्र मंडळ आणि राष्ट्रवादीची युती होती. मात्र यावेळी घनदाट मित्र मंडळाने राष्ट्रवादीला सोडून भाजपला जवळ घेतले त्यामुळे इथे घनदाट मित्रमंडळाने धोका दिल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीने दिली आहे. जिंतुर पंचायत समिती मध्ये राष्ट्रवादी ची एकहाती सत्ता असल्याने राष्ट्रवादीच्या वंदना इलग सभापती तर शरद मस्के यांची उपसभापती बिनविरोध निवड करण्यात आली. सेलु पंचायत समितीत 10 पैकी 6 सदस्य हे राष्ट्रवादी चे असल्याने निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाली. ज्यात सभापती म्हणून सुमनबाई गाडेकर तर उपसभापती म्हणून आनंद डोईफोडे यांची बिनविरोध निवड झाली.
आणखी वाचा























