मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाचे (Maharashtra Corona Update) सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. मास्कची देखील सक्ती नाही.कोरोना संपलाय, अशी आशा बाळगत असाल तर आज राज्याची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. राज्यात आज बी ए. 4 व्हेरियंटचे चार आणि बी. ए 5 व्हेरियंटचे तीन रूग्ण आढळले आहेत. तसेच गेले तीन दिवस राज्यात नव्याने आढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या देखील पाचशेपार आहे. शनिवारी राज्यात 529 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 325 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात प्रथमच बी ए. 4 आणि 5 व्हेरियंट
राज्यात आज आढळलेले बी ए. व्हेरियंटचे सर्व रुग्ण पुणे शहरातील आहे. यामध्ये चार पुरूषांचा आणि तीन महिलांचा समावेश आहे. सर्व रुग्णांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले असून यातील 9 वर्षाच्या लहान मुलाने लस घेतलेली नाही. सर्व रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून सर्व रुग्णांना घरगुती विलिगीकरणात आहे.
आज एकाही कोरोनाबाधितांचा मृत्यू नाही
राज्यात आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही, राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77,34,734 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.09 टक्के इतके झाले आहे.
राज्यात 2772 सक्रिय रुग्णांची नोंद
राज्यात आज एकूण 2772 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 1929 रुग्ण हे मुंबईमध्ये आढळतात. तर त्या खालोखाल पुण्यामध्ये 318 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
गेल्या 24 तासांत 2685 नवे कोरोनाबाधित
देशातील कोरोना संसर्गात हळूहळू घट होताना दिसत आहे. आधीच्या दिवसाच्या तुलनेत आज नवीन कोरोनाबाधितांमध्ये काहीशी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत 2 हजार 685 नवीन रुग्ण कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 33 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 16 हजारांवर पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 158 कोरोना रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत. यासह आतापर्यंत देशात कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 26 लाख 9 हजार 335 इतकी झाली आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांचा दर 0.04 टक्के झाला आहे.