Omicron Subvariant : मुंबई आणि दिल्लीसह भारतामधील प्रमुख शहरांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहाता चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दैनंदिन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे चिंतेत वाढ झाली असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. हैदराबादमध्ये बीए.4 या ओमायक्रॉनच्या उपप्रकाराचा रुग्ण आढळला आहे. ओमायक्रॉनच्या या उपप्रकाराचा भारतातील हा पहिला रुग्ण आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेल्या एका व्यक्तीमध्ये ओमायक्रॉन बीए. 4 हा व्हेरियंट आढळला आहे. हैदराबादमधील रुग्ण समोर आल्यानंतर तज्ज्ञांनी देशात इतर शहरांमध्येही बीए.4 या उपप्रकाराचे रुग्ण आढळण्याची शक्यता वर्तवली आहे.
दक्षिण आफ्रिकामधून हैदराबादला आलेल्या व्यक्ती विमानतळावरील कोरोना चाचणीदरम्यान नमुणे घेण्यात आले होते. जीनोम सिक्वेंसिंगमध्ये त्या व्यक्तीला ओमायक्रॉनच्या बीए.4 या व्हेरियंटची लागण झाल्याचं समोर आले. 9 मे रोजी तो व्यक्ती दक्षिण आफ्रिकामधून हैदराबादला आला होता आणि 16 मे रोजी परत गेला.. बीए. 4 उपप्रकाराची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाची कोणताही लक्षणे आढळली नाहीत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉनचा बीए.4 उपप्रकार पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकामध्ये आढळला होता. जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर एक एक करत जवळपास डजनभर देशात पसरला.. त्यानंतर या उपप्रकाराचा पहिला रुग्ण भारतात आढळला आहे. तज्ज्ञांच्या मते, ओमायक्रॉनचा बीए.4 हा व्हेरियंट वेगाने भारतात पसरण्याची शक्यता आहे.
भारताला किती धोका?
ओमायक्रॉनचा बीए. 4 व्हेरियंट अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जातेय. हा व्हेरियंट रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो. दक्षिण आफ्रिकामधील कोरोना हाहा:कार झाला, त्यामागे बीए.4 या व्हेरियंटचाच हात होता. भारतीय शास्त्रज्ञांच्या मते, भारतामध्ये बहुसंख्य लोकांचे लसीकरण झालेय अन् त्यांच्या अँटीबॉडी तयार झाल्यात. भारतीय आता कोरोनाविरोधात लढण्यास सक्षम झाले आहेत. त्यामुळे या नव्या व्हेरियंटचा भारताला जास्त धोका नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले.
24 तासांत भारतात 2259 नव्या कोरोना रुग्णांची नोंद -
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या आकडेवारीत (Coronavirus) चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 2259 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 20 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. देशभरात सध्याची अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 15044 वर पोहोचली आहे.