Pune Phule Wada News : महात्मा जोतीबा फुले मोठे की नगरसेविकेच्या सासूबाई मोठ्या, असा सवाल उपस्थित करत पुण्यातील समता परिषदेने संताप व्यक्त केला आहे. पुण्यातील भिडे वाड्यातील कमानीवर जोतीबा फुले यांच्या नावापेक्षा मोठं नाव माजी नगरसेविकेच्या सासूबाईंचं नाव असल्याने समता परिषदेचे कार्यकर्ते भडकले आहेत.मात्र पालिकेच्या कारवाईनंतर हा बोर्ड काढण्यात आला आहे. महात्मा फुले वाडा हा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा लोकांसाठी  प्रेरणास्थान आहे अशा प्रकारे जर कोणी नाव देण्याचा प्रयत्न केला तर त्या विरोधात आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करु, असा इशारा समता परिषदेचे कार्यकर्त्यांनी दिला आहे.


काय आहे प्रकरण?
ऐतिहासिक महात्मा फुले वाड्याच्या कमानीवर नगरसेवकांनी चमकेगिरी केल्याचा प्रकार समोर आला. फुले वाड्याच्या कमानीवर फुले यांचं नाव लहान आणि संकल्पना राबवणाऱ्याचं नाव मोठ्या अक्षरात लिहिल्या गेलं आहे. महत्वाचं म्हणजे या फलकावर माजी नगरसेविका विजयालक्ष्मी हरिहर यांच्या सासुबाईंचं नाव सगळ्यात मोठ्या अक्षरात लिहिल्या गेलं आहे. कै. लक्ष्मीबाई नारायण हरिहर असं नगरसेविकेच्या सासूचं नाव आहे. नगरसेविकेच्या या कृत्यामुळे आता सगळीकडे वादाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र या कृत्याकडे प्रशासनाचं लक्ष नसल्याचं देखील समोर आलं आहे.


या फलकाखाली मार्गदर्शक म्हणून खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक यांची नावे आहेत तर संकल्पना म्हणुन माजी महापौर मुरलीधर मोहोळांचं नाव आहे. मी कमान सुशोभीकरणासाठी निधी दिला, मात्र तिथे माझं नाव लावलं आहे, याची मला कल्पना नव्हती, असं स्पष्ट मत माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलं आहे.


कोणत्या संघटनांचा विरोध
महात्मा फुले वाड्यावर सासूचे नाव मोठं लावल्याने त्यांच्या विरोधात अनेकांनी निषेध दर्शवला आहे. त्यात अनेक संघटनांचा समावेश आहे. महात्मा फुले मंडळ, ज्योती मित्र मंडळ, अखिल भारतीय माळी समाज शिक्षण संस्था यांनी आक्षेप घेतला आहे.


पालिकेकडून कारवाई
या सगळ्या प्रकरणाची माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना दिली होती. त्यासंदर्भात त्यांच्याकडे तक्रारदेखील दाखल करण्यात आली होती. त्यांनी कारवाई केल्यानंतर फुले वाड्याच्या कमानीवरचं नाव काढून टाकण्यात आलं आहे.