Ahmednagar Foundation Day : जगात फार थोडी शहरं अशी आहेत की ज्यांच्या स्थापना दिवसाची इतिहासात नोंद सापडेल. त्यातलंच एक शहर म्हणजे अहमदनगर. अहमदनगर हे शहर असं आहे की याच्या नावात काना, मात्रा, उकार, वेलांटी असं काहीच नाही. याच अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490 रोजी मलिक अहमद बादशहाने केली.


अहमदनगर शहराच्या स्थापनेला आज 532 वर्ष पूर्ण होत आहे. नगरच्या मलिक अहमद निजामशहाला आताच्या नगर शहरातील भिंगार नाल्यात जहांगीर खानाच्या विरोधात निर्णायक विजय मिळाला होता. जहांगीर खानाला गनिमीकाव्याने त्याने पराभूत करुन, स्वतःच्या स्वाभिमानी राज्याची घोषणा केली. आणि खऱ्या अर्थाने नगर शहराची स्थापना सुरू झाली. तेव्हापासून 28 मे रोजी अहमदनगर शहराचा स्थापना दिन साजरा केला जातो. आज अहमदनगर शहराच्या 532 व्या स्थापना दिनानिमित्ताने शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. अहमदनगरच्या रसिक ग्रुपच्यावतीने भिस्तबाग येथे ऋषभ भळगट या चिमुकल्याच्या बासरी बदनाचे आयोजन करण्यात आले होते.


अहमद निजामशहाने 1490 ते 1494 या चार वर्षांच्या काळात नियोजनबद्धपणे शहर वसवले. इमारती, काटकोनी रस्ते, नहर, बगीचे, बाजार, चौक, मोहल्ले हे सगळे त्या काळात तयार करण्यात आले होते. पर्शियन इतिहासकार फय्यद अली यांनी 'बुऱ्हाणे बशीर' या ग्रंथात नगर शहराचे सौंदर्य हे बगदाद आणि कैरो या शहरांनाही मागे टाकणारे होते असे म्हटले आहे. पण सध्या शहरात धुळीचे साम्राज्य, रस्त्यांची दुरवस्था, जुन्या वास्तूंच्या पडझड अशी झाली आहे. त्यामुळे नगरकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


ज्या अहमद बादशाहाने या शहराची स्थापना केली त्या बादशहाची कबर देखील शहरातील सिना नदीच्या कडेला बागरोजा येथे आहे. मात्र, त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्या कबरीकडे जाण्यासाठी साधा रस्ता देखील नाही.


महत्वाच्या बातम्या :