नवी दिल्ली: भारतात कोरोनाचा नवा व्हेरियंट BA.4 आणि BA.5 सापडला असल्याची माहिती समोर आली आहे.  इंडियन सार्स कोव्ह-2 जिनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) या संस्थेने याची पुष्टी दिली आहे. हे दोन्ही व्हेरियंट हे ओमायक्रॉन (Omicron) या व्हेरियंटचे सब-व्हेरियंट आहेत. गेल्या वर्षी देशात ओमायक्रॉन व्हेरियंटने धुमाकूळ घातला होता. आता त्याचे सब व्हेरियंट सापडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 


देशातील कोरोनाची परिस्थिती जरी नियंत्रणात आली असली तरी गेल्या काही दिवसांपासून हळूहळू रुग्णसंख्या वाढत आहे. त्यातच आता BA.4 आणि BA.5 हा नवा व्हेरियंट सापडल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे. 


हाती आलेल्या रिपोर्टनुसार, ओमायक्रॉनच्या BA.2 या व्हेरियंट प्रमाणेच या BA.4 आणि BA.5 ची लक्षणं आहेत. या व्हेरियंटचा देशातील पहिला रुग्ण हा तामिळनाडू आणि दुसरा रुग्ण हा तेलंगणामध्ये सापडला आहे. या व्हेरियंटपासून सुरक्षित रहायचं असेल तर कोरोना लसीच्या बूस्टर डोसची मात्रा घेणं आवश्यक असल्याचं इंडियन सार्स कोव्ह-2 जिनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) ने आपल्या अहवालात म्हटलं आहे. 


ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट BA.4  पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकामध्ये आढळला होता. जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर एक एक करत जवळपास डजनभर देशात पसरला. त्यानंतर या सब व्हेरियंटचा पहिला रुग्ण भारतात आढळला आहे. तज्ज्ञांच्या मते, ओमायक्रॉनचा BA.4 हा व्हेरियंट वेगाने भारतात पसरण्याची शक्यता आहे. 


ओमायक्रॉनचा BA.4 व्हेरियंट अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जातंय. हा व्हेरियंट रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो. दक्षिण आफ्रिकामध्ये कोरोनाचा हाहा:कार झाला होता, त्यामागे BA.4 या व्हेरियंटचाच हात होता. भारतीय शास्त्रज्ञांच्या मते, भारतामध्ये बहुसंख्य लोकांचे लसीकरण झालेय अन् त्यांच्या अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. भारतीय आता कोरोनाविरोधात लढण्यास सक्षम झाले आहेत. त्यामुळे सध्यातरी या नव्या व्हेरियंटचा भारताला जास्त धोका नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले.