Corona Vaccine Shortage LIVE UPDATES | परभणीत उद्या पुरेल एवढेच लस साठा शिल्लक

महाराष्ट्रात केवळ तीन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा शिल्लक आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सातारा, सांगली आणि गोंदिया जिल्ह्यातील लसीकरण साठ्याअभावी थांबलं आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Apr 2021 09:12 AM
परभणीत उद्या पुरेल एवढेच लस साठा शिल्लक

परभणी जिल्ह्यात उद्या पुरेल एवढाच लससाठा शिल्लक राहिला असून त्यामुळे उद्या बारा लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद करण्याची वेळ आली आहे तर 45 ठिकाणी लस उद्या देण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 4 हजार 850 डोसेस आजपर्यंत मिळाले होते. यातील 95 हजार पेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकुण 57 केंद्रावर लसीकरण केले जात आहे. सध्या 45 केंद्रावर उद्या पुरेल एवढा लस साठा शिल्लक असुन उद्या 12 केंद्रावरील लसीकरण बंद असणार आहे. रविवारी जिल्ह्यासाठीचा नवीन लस साठा उपलब्ध होण्याची शक्यता असल्याची माहिती लसीकरण प्रमुख डॉ. रावजी सोनवणे यांनी दिलीय.

कोरोना लस संपल्यामुळे मुंबईच्या अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात लसीकरण बंद

मुंबईत अंधेरी पूर्वेतील सुप्रसिद्ध सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोना लस संपल्यामुळे आज सकाळपासून लसीकरण बंद आहे. आज संध्याकाळपर्यंत लसीचा साठा उपलब्ध झाला नाही तर उद्या देखील लसीकरण बंद राहिल.

बीकेसीमधलं जम्बो कोविड लसीकरण केंद्र लसीच्या पुरवठ्याअभावी बंद

मुंबईतील सर्वात मोठ कोविड लसीकरण केंद्रही बंद झालं आहे. बीकेसीमधलं जम्बो कोविड लसीकरण केंद्र लसीच्या पुरवठ्याअभावी बंद झालं आहे. सकाळपासून रांगेत उभ्या असलेल्या लोकांना बाहेर येऊन परत जाण्याची विनंती करण्याची वेळ डॉक्टर आणि पोलिसांवर आली आहे.


 
चंद्रपूर जिल्ह्यात 300 कोविशिल्ड आणि 3700 कोवॅक्सिन उपलब्ध, 91 केंद्रावरचे लसीकरण बंद

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या 300 कोविशिल्ड आणि 3700 कोवॅक्सिन उपलब्ध आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 98 पैकी 91 लसीकरण केंद्रांवर लस देण्याचे काम बंद असून फक्त 7 ठिकाणी लस देण्यात येत आहे. जिल्ह्यात 95 ऑक्सिजन बेड्स पैकी केवळ 10 उपलब्ध आहे तर 50 व्हेंटिलेटर बेड्स पैकी 3 उपलब्ध आहेत.

लसीचा साठा नसल्यानं आजपासून बारामतीतील लसीकरण बंद

लस संपल्याने बारामतीतील लसीकरण आजपासून बंद. आतापर्यंत 52 हजार 200 नागरिकांना लस दिली आहे. बारामती तालुक्यात एकूण 32 ठिकाणी लसीकरण सुरु होते. काल दुपारी लस संपली.

मुंबईतील खाजगी कोरोना लसीकरण केंद्रं बंद

मुंबईच्या अनेक खाजगी कोरोना लसीकरण केंद्रात लसीकरण बंद करण्यात आलं आहे. तर अनेक लसीकरण केंद्रात आजच्या पुरताच लसींचा साठा उपलब्ध आहे. दिवसाच्या कुठल्याही क्षणी हे लसीकरण बंद होऊ शकतं. लस घेण्यासाठी लोकांचीही वणवण सुरू झालीय. काही ठिकाणी लोकं जिथं लसीकरण सुरूय तिथं जाऊन लस घेण्याचा प्रयत्न करताना दिसतायत. चेंबूर परिसरातील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये सुरू असलेलं हे लसीकरण कधीही बंद करावं लागेल असं इथल्या डॉक्टरांनी सांगितलं. 

मुंबईतील बीकेसी केंद्रावर नागरिकांची गर्दी, लसीअभावी नागरिकांवर माघारी जाण्याची वेळ

मुंबईतील सर्वात मोठ्या जम्बो वॅक्सिनेशन सेंटरमध्ये कोरोना लसीचे केवळ 160 डोस शिल्लक आहे. बीकेसी केंद्रावर नागरिकांची गर्दी झाली असून बाहेर येऊन त्यांना समजावण्याची वेळ डॉक्टरांवर आली आहे. परिणामी लोक वैतागून  परत जात आहेत.

लस संपल्याने पिंपरी चिंचवडमधील लसीकरण उद्यापासून बंद

लस संपल्याने पिंपरी चिंचवडमधील लसीकरण उद्यापासून बंद. लस आल्यावर पुन्हा सुरुवात होणार.

कल्याण डोंबिवलीमध्ये दोनच दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक

कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असताना आता कोविड लसही पुढील दोनच दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे कोवीड लस लवकरात लवकर उपलब्ध न झाल्यास लसीकरण केंद्र नाईलाजास्तव बंद ठेवावी लागणार असल्याची भीती केडीएमसी आरोग्य केंद्राने वर्तवली आहे. राज्य सरकारकडून केडीएमसीला कोविशील्ड लस उपलब्ध करून दिले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे 9 शासकीय आणि 13 खासगी रुग्णालयांत सध्या कोविड लसीकरण केले जात आहे. लसीकरण सुरू केल्यापासून आतापर्यंत दिवसाला सरासरी 4 हजार 500 नागरिकांचे लसीकरण होत असून आतापर्यंत 80 हजारांच्या आसपास लोकांनाच लस देण्यात आली आहे. तर बुधवारी जवळपास 6 हजार लोकांना लस दिली असून या पार्श्वभूमीवर उपलब्ध साठा केवळ दोनच दिवस पुरेल इतकाच आहे.  रविवारपासून लसीकरण करणे शक्य नसून खासगी रुग्णालयांनाही लस पुरवठा करता येणार नाही. कोविड लसीकरणाचा कल्याण डोंबिवलीतील वेग पाहता पुढील फक्त 2 दिवसच ही लस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. हा साठा संपल्यानंतर नाईलाजास्तव लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागतील अशी माहिती केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली आहे. तसेच आतापर्यंत आपण शासनाकडे 7 लाख लसीचे डोस उपलब्ध करून देण्याची मागणीही केडीएमसीने शासनाकडे केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात 31 लसीकरण केंद्रांवर लसीकरण ठप्प

चंद्रपूर : जिल्ह्यात 31 लसीकरण केंद्रांवर लसीकरण ठप्प, कोवीशिल्ड व कोवॅक्सिन लसींचा साठा संपल्याने लसीकरण बंद, 96 पैकी 65 केंद्रांवर अजून लसीकरण सुरू तर 31 ठिकाणी बंद, जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रांवर लागले लसीकरण बंदचे फलक, लवकरच लसींचा साठा येईल अशी जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती, आतापर्यंत दीड लाख लोकांचं लसीकरण

पुण्यातील सहा खासगी रुग्णालय 100 टक्के ताब्यात

पुण्यातील सहा खासगी रुग्णालय 100 टक्के ताब्यात घेतली असून ती कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आली आहे. 13 फेब्रुवारीला पुण्यात कोरोनाचे 1200 रुग्ण होते आज हा आकडा 46000 हुन अधिक आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती डोस शिल्लक?

उस्मानाबाद : अजून आपल्याकडे 16790 डोस शिल्लक आहेत. रविवार पर्यंत अडचण नाही.


जालना : जालना आणखी 6 दिवस पुरेल एवढे डोस शिल्लक आहेत, दिवसाला 3700 डोस दिले जातात.


बीड : प्रत्येक दिवसाला 3000 लोकांना लस दिली जात होती. आता 9000 लोकांना दिवसाआड लस दिली जाईल. 14 हजार डोस शिल्लक आहेत. 3 ते 4 दिवसाचा साठा. 


परभणी : जिल्ह्यात आतपर्यंत 83 हजार 284 नागरिकांचे लसीकरण पुर्ण झालेले आहे. सध्या 14000 डोस शिल्लक आहेत त्यामुळे पुढचे 3 दिवस तरी काही अडचण नाही


सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात 1 लाख 95 हजार 570 लसीकरण झालं. आतापर्यंत 20 हजार लसी शिल्लक आहेत. आणखी 3 दिवस साठा शिल्लक आहे.

नवी मुंबई , पनवेल मध्ये लसीकरण संपुष्टात. डोस संपल्याने लसीकरण केंद्र बंद

नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगर पालिका क्षेत्रातीस लसींचा डोस संपल्याने लसीकरण बंद करण्याची वेळ दोन्ही शहरांवर आली आहे. नवी मुंबई मध्ये दिवसाला 8 हजारपर्यंत लसीकरण केले जाते. आतापर्यंत 1 लाख 42 हजार लसींचे डोस देण्यात आले आहेत. शहरात 41 ठिकाणी लसीकरण केंद्र असून लस उपलब्ध नसल्याने केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे. सद्या फक्त 4 हजार लसींचे डोस शिल्लक होते. आज रात्रीपर्यंत हाही संपणार असल्याने संपुर्ण शहरातील लसीकरण बंद होणार आहे. दुसरीकडे पनवेल महानगर पालिकेकडेही लस उपलब्ध नसल्याने पनवेल मधील लसीकरण बंद पडले आहेत.

कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये काल रात्री किती लसीकरण झालं?

कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती लसीकरण? काल रात्रीपर्यंत झालेले लसीकरण, स्रोत - कोविन पोर्टल.



1.    अहमदनगर – 2,60,990


2.    अकोला – 1,11,373


3.    अमरावती – 1,79,824


4.    औरंगाबाद – 2,38,784


5.    बीड – 1,32,678


6.    भंडारा – 1,60,717


7.    बुलढाणा – 1,55,977


8.    चंद्रपूर – 1, 50,284


9.    धुळे – 1,02,673


10.  गडचिरोली – 48,938


11.  गोंदिया – 1,12,601


12.  हिंगोली – 46,315


13.  जळगाव – 1,92,752


14.  जालना – 85,033


15.  कोल्हापूर – 5,20,167


16.  लातूर – 1,35,051


17.  मुंबई – 15,23,123


18.  नागपूर – 6,12,869


19.  नांदेड – 1,73,280


20.  नंदुरबार – 69,671


21.  नाशिक – 3,83,940


22.  उस्मानाबाद – 71,026


23.  पालघर – 1,29,500


24.  परभणी – 84,748


25.  पुणे – 12,22,323


26.  रायगड – 1,35,613


27.  रत्नागिरी- 95,437


28.  सांगली – 258763


29.  सातारा – 2,79,486


30.  सिंधुदुर्ग – 69,061


31.  सोलापूर – 1,99,670


32.  ठाणे – 6,64,179


33.  वर्धा – 1,23,147


34.  वाशिम – 86,595


35.  यवतमाळ – 1,41,406

रत्नागिरीतही लसीचा तुटवडा; दोन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या पहिल्या लसीची मात्रा संपली आहे. आताच्या घडीला केवळ दुसऱ्या वेळेची लस दिली जात आहे. असे असताना देखील जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापुरकर यांनी दोन दिवस पुरेल इतके डोस उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. यावेळी नेमके किती डोस आहेत? त्याचे आकडे सांगाल का? असा प्रेश्न विचारल्यानंतर मात्र लसीकरण सुरु आहे. मी एका कार्यक्रमात आहे असे उत्तर देत आकडा सांगण्यास टाळाटाळ केली आहे. 

मुंबईतील 50 टक्के लसीकरण केंद्रे लसपुरवठ्याअभावी बंद, लस न मिळाल्यास परवा मुंबईतील लसीकरण ठप्प होणार

एक दिवसात मुंबईला लस मिळाली नाही तर परवा संपूर्ण मुंबईतील लसीकरण ठप्प होणार आहे. उद्या सर्व खाजगी केंद्रे तर परवा सर्व शासकीय केंद्रे सुद्धा लसपुरवठ्याअभावी बंद होणार आहेत. आज मुंबईतील 50 टक्के लसीकरण केंद्रे लसपुरवठ्याअभावी बंद आहेत. उद्या सर्व खाजगी लसिकरण केंद्र बंद होतील, तर परवापर्यंत संपूर्ण मुंबईतील लसीकरण ठप्प होईल. मुंबईतील 26 खाजगी लसीकरण केंद्र बंद झाली तर, 24 केंद्र आज संधयाकाळपर्यंत बंद होतील. मुंबईत एकूण 120 सेंटर्स आहेत, त्यांपैकी 73 खाजगी सेंटर्स आहेत. यामधील एच.एन.रिलायन्स, ब्रिच कॅन्डी, हबीब, भाटीया, एलिझाबेथ, लायन हॉस्पिटल, सिटी केअर, लाईफलाईन, भाभा हॉस्पिटल ही लसीकरण केंद्र बंद झाली आहेत. 

लस अभावी सिंधुदुर्गातील लसीकरणही बंद होण्याच्या मार्गावर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 61,600 डोस उपलब्ध झाले होते. जिल्ह्यात आतापर्यंत 61 हजार 058 दोन्ही डोस दिले, त्यापैकी आज अखेर 542 डोस उपलब्ध आहेत. 53 हजार 078 जणांना पहिला डोस देण्यात आला. तर 7 हजार 980 जणांनाच दुसरा डोस देता आला. जिल्ह्यात लसीचा नव्या साठ्यासाठी राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे. जिल्ह्यात 38 प्राथमिक आरोग्य केंद, 11 जिल्हा रुग्णालयाअंतर्गत येणारी रुग्णालये, 7 खासगी रुग्णालयात लसीकरण केलं जात आहे. मात्र आज डोस उपलब्ध झाले नाहीत तर पुढील लस मिळेपर्यंत लसीकरण बंद राहणार आहे.

लस उपलब्ध नसल्याने पनवेल महापालिका भागात लसीकरण बंद

पनवेल महानगरपालिकेला लसीचा पुरवठा होत नसल्याने आजपासून लसीकरण बंद करण्यात आले आहे. पनवेल शहरात दिवसाला 2500 पर्यंत लसीकरण करण्यात येते. मात्र कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा संपल्याने लसीकरण बंद झाले आहे. दुसरीकडे कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस 16 मार्चला देण्यात आल्याने दुसरा डोस 16 एप्रिलपासून सुरु होणार आहे. राज्य सरकारकडून पनवेल महानगरपालिकेस लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण बंद करण्याची वेळ आली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 21 केंद्रावर लसीकरण करण्यात येते. यामध्ये 9 शासकीय आणि 12 खाजगी केंद्रांचा सहभाग आहे. आतापर्यंत 63 हजार 879 जणांना पनवेलमध्ये लस देण्यात आली आहे.

मुंबईत दीड दिवसांचाच लसीचा साठा, कोवॅक्सिन लस संपली

मुंबईत सध्या दीड दिवसांचाच कोरोना लसीचा साठा शिल्लक आहे. कोवॅक्सिन लस संपली असून केवळ दुसऱ्या डोसचा राखीव साठाच शिल्लक आहे. कोवॅक्सिनचा पहिला डोस कोणालाही न देण्याच्या सूचना केंद्राला दिल्या आहेत. केवळ दुसऱ्या डोससाठीच कोवॅक्सिनचा राखीव साठा शिल्लक आहे. लस संपेल या भीतीपोटी लसीकरण केंद्रावर रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे.

चंद्रपुरात 4800 लसीचे डोस शिल्लक 

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 48 हजार 914 लोकांचं लसीकरण झालं आहे. जिल्ह्यात आज रोजी 4800 लसीचे डोस शिल्लक आहेत. जिल्ह्यात दररोज 8 हजार लोकांचं लसीकरण शक्य आहे. जिल्ह्यात 96 लसीकरण केंद्रे असून आज पुरेल इतक्याच लसीचे डोस शिल्लक आहेत, काही ठिकाणी लसीकरण लसीअभावी बंद देखील पडू शकतं.

कोल्हापूर लसीचा तुटवडा, अडचणीत भर

कोल्हापूर जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने अडचणीत भर पडली आहे. जिल्ह्यात दररोज 35 हजार डोस लागतात, आता केवळ 19 हजार डोस शिल्लक आहेत. त्यामुळे आज दिवसभरात कोल्हापुरातील लसीकरण कधीही थांबू शकतं. लस संपल्याने महापालिकेने 9 लसीकरण केंद्रे बंद ठेवली. डोस शिल्लक असतील तेवढ्याच नागरिकांना बोलवून लस दिली जाणार आहे. 

साताऱ्यातही लसीकरण थांबलं

सातारा जिल्ह्यातील कोरोना लसीचा एकही डोस शिल्लक नाही. एका आठवड्यात 90 हजार 142 जणांना लस देण्यात आली. सध्या किमान 27 ते 30 हजार जणांचं लसीकरण केलं जात होतं.

एकही डोस नसल्याने सांगलीतील लसीकरण बंद


सांगली जिल्ह्यातील संपूर्ण लसीकरण काल संध्याकाळपासून बंद आहे. कालपर्यंत एकूण 2 लाख 60 हजार लोकांचे लसीकरण झाले. सध्याच्या घडीला लसीचा एकही डोस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद झालं आहे. नवीन लसीचा साठा आज किंवा उद्या मिळेल असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

गोंदियातील लसीकरण कालपासून बंद

गोंदिया जिल्ह्यातील लसीकरण कालपासून बंद आहे. लस संपल्याने आतापर्यंत 1 लाख 8 हजार लोकांना लस देण्यात आली असून 3 लाख जणांना लस देण्याचं उद्दिष्ट होतं. चार दिवसात लस उपलब्ध होईल, अशी माहिती समजते.

अमरावतीमध्ये तीन दिवस पुरतील एवढेच कोरोना लसीचे डोस

राज्यात लसीचा तुटवडा असल्याने आज लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी लोकांची गर्दी होऊ शकते. अमरावतीत तीन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक आहे. याचा परिणाम म्हणजे तीन दिवस पुरणारा साठा एका दिवसावर येऊ शकते.

यवतमाळमध्ये कोरोना लसीचे 16 हजार 720 डोस शिल्लक

यवतमाळ जिल्ह्यात कोरोना लसीचे 16 हजार 720 डोस शिल्लक आहेत. दररोज साधारण 8 हजार लसीची गरज असते. पुढील दोन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. जिल्ह्याची लोकसंख्या 29 लाख असून त्यात 45 वर्षांवरील नागरिक साधारण 9 लाख असतील, तेवढ्याच लसीची मागणी करण्यात आली आहे.

वर्ध्यात पाच दिवसांचा साठा शिल्लक

वर्धा जिल्ह्यात सर्व केंद्रांवर लसीकरण सुरु आहे. कोरोना लसीचे 40 हजार डोस शिल्लक असून पाच दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक आहे. सध्या एक लाख लसींची मागणी केली आहे.

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली जिल्ह्यात कोरोना लसीचा एकही डोस शिल्लक नाही. त्यामुळे लसीकरण पूर्णपणे थांबलं आहे. तर कोल्हापुरातील लसीकरण आज दिवसभरात कधीही ठप्प होऊ शकतं. तर दुसरीकडे विदर्भातील अमरावती, वर्धा, बुलढाणा, गोंदियात सुद्धा लसीचा तुटवडा जाणवतोय. गोंदियातील लसीकरण सुद्धा बंद आहे. इतर जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला कोरोना लसीचा साठा उपलब्ध झाला नाही तर लसीकरण मोहीम अडचणीत येऊ शकते. 


महाराष्ट्रात केवळ तीन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असून केंद्राने लवकरात लवकर लस पुरवावी अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली. या दाव्यावरुन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी एक परिपत्रक पोस्ट करत त्यातून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.